Last Update:
 
ऍग्रो प्लस

बैलांना होतो फुफ्फुसदाह, आम्लपित्त
-
Friday, August 17, 2012 AT 02:00 AM (IST)
Tags: agro plus

आज बैलपोळा. या निमित्ताने बैलांना पुरणपोळी - भाताचा नैवेद्य दिला जातो; परंतु हा नैवेद्य अति प्रमाणात दिला गेल्यास त्याचा बैलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. बैलांच्या आहारात बदल झाल्याने त्यांना आम्लपित्त, फुफ्फुसदाह यासारखे आजार होऊ शकतात. या आजारांची लक्षणे तपासून पशुतज्ज्ञांकडून तातडीने उपचार करावेत.
डॉ. व्ही. व्ही. अक्केवार, डॉ. मीरा साखरे

फुफ्फुसदाह -
श्‍वसनसंस्था ही प्राणवायू घेण्यासाठी असते; परंतु बैलांना द्रवपदार्थ नाकातून, तोंडातून चुकीच्या पद्धतीने पाजल्यामुळे फुफ्फुसदाह होतो. पशुपालकांचा असा गैरसमज असतो, की बैलांना नाकातून तेल पाजल्यामुळे ते ठसकते, त्यामुळे त्यांचा श्‍वसनमार्ग मोकळा होऊन ते अधिक तंदुरुस्त होतात. अशा प्रकारामुळे गंभीर परिस्थितीला तोंड द्यावे लागते आणि परिणामी बैल दगावू शकतो. फुफ्फुसात जास्त तेल गेल्यास जनावर पूर्ववत होण्याचे प्रमाण खूपच कमी असते. याव्यतिरिक्त अंघोळीसाठी बैलांना पाण्यात जास्त वेळ पोहू दिल्यास किंवा पलट्या मारल्यास बैलांना ठसका लागतो. कुठल्याही आजारात डॉक्‍टरांनी दिलेले पातळ औषध किंवा गोळी चुकीच्या पद्धतीने पाजल्यामुळेही फुफ्फुसदाह होऊ शकतो. द्रव वस्तू अति जोरात पाजल्यावर किंवा पाजताना जनावरांना ठसका लागतो.

लक्षणे - या आजारात चुकीच्या पद्धतीने पाजलेले द्रावण हे फुफ्फुसामध्ये साचून राहते, फुफ्फुसातील पेशींना इजा पोचते, पेशींची काम करण्याची क्षमता कमी झाल्यामुळे पुढील लक्षणे दिसून येतात. श्‍वासोच्छ्वासास त्रास होतो, श्‍वसनाची गती वाढते, प्राणवायूच्या कमतरतेमुळे जनावराची त्वचा काळवंडते, चारा खाणे - पाणी पिणे कमी होणे, नाकातून चिकट - पांढरट स्राव गळत राहतो, छातीत त्रास झाल्यामुळे जनावर बसायचे टाळून जास्त वेळ उभेच राहते. जनावर चालताना किंवा काम करताना धापा टाकते, काम करण्याची क्षमता कमी होते.
उपचार - वरील लक्षणे दिसल्यास बैलास पूर्ण आराम द्यावा. स्वच्छ, कोरड्या, हवेशीर ठिकाणी बांधावे. जड कामास लावू नये. नाकाद्वारे कोणतेही औषध पाजू नये. पाण्यात जास्त वेळ अंघोळ घालू नये.
पातेल्यात एक - दोन लिटर गरम पाणी घेऊन त्यात 10-12 थेंब निलगिरी तेल टाकावे. या पाण्याच्या वाफेमुळे श्‍वसनमार्ग मोकळा होण्यास मदत होते. लवकरात लवकर पशुवैद्यकाकडून योग्य तो उपचार करून घ्यावा. पशुवैद्यकाच्या सूचनेनुसार तोंडावाटे औषधी पाजावीत.
बैलपोळ्याच्या निमित्ताने काही आजार उद्‌भवू शकतात; पण ते नीट समजून घेऊन ते कसे टाळता येतील याचा प्रयत्न करावा.

आम्लपित्त -
आम्लपित्त हा जवळपास सर्वच प्रकारच्या जनावरांत आढळून येणारा चयापचयाचा आजार आहे. यामध्ये जनावराच्या पचनक्रियेत बिघाड झाल्यामुळे पोटात अधिक प्रमाणात वायू आणि पाणी साचते. हा विकार मुख्यतः आहारात होणारा अचानक बदल, जसे - भरपूर प्रमाणात तृणधान्य खाल्ल्यास, शिळे - कुजलेले अन्न, भाजीपाला, फळे इत्यादी खाल्ल्यास होतो. पुरणपोळी, भात जास्त प्रमाणात खाऊ घातल्यास पचनक्रिया बिघडते.
या आजारात जास्तीचे अन्न खाल्ल्यामुळे ते जनावरास पचन होत नाही. परिणामी पोटातील मित्रजिवाणूंची संख्या कमी होते आणि लॅक्‍टिक ऍसिड (आम्ल) तयार करणाऱ्या जिवाणूंची संख्या वाढते. पोटातील सामू कमी झाल्यामुळे जनावरे वेगवेगळी लक्षणे दाखवितात.
 
लक्षणे - चारा - पाणी कमी प्रमाणात घेते, रवंथ करणे बंद होते, पोटाचा आकार वाढतो, डावी मखाळी फुगते, पोटावर दाबले असता खळखळ आवाज येतो, श्‍वास घेण्यास त्रास होतो, डोळे खोल जातात, जनावरास चालायला त्रास होतो. तीव्र स्वरूपाच्या आजारात जनावर जमिनीवर पडते आणि उपचाराअभावी जनावर दगावते. जनावराच्या शरीरात लॅक्‍टिक आम्ल रक्तात मिसळते आणि आजार गंभीर होऊ शकतो.
उपचार - पोटातील सामू पूर्ववत करण्यासाठी खाण्याचा सोडा 100 ते 150 ग्रॅम पाण्यात टाकून हळुवार पाजावा. सलाइनद्वारे इंजेक्‍शने द्यावीत. जनावरास नैवेद्य म्हणूनच कमी प्रमाणात पुरणपोळी खाऊ घालावी. बैलांना चांगल्या प्रतीचा खुराक क्षारमिश्रण मिसळून द्यावा.

डॉ. अक्केवार - 9421292329
(पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी)



 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: