Last Update:
 
मुख्य पान

वडांगळीत एकाच दिवशी साजरा होतो दोनदा पोळा
-
Friday, August 17, 2012 AT 02:00 AM (IST)

राजेंद्र भ. खुळे
वडांगळी, जि. नाशिक - बैलपोळा शेतकऱ्याचा महत्त्वाचा सण. गाव, प्रांतनिहाय साजरा करण्याची परंपरा वेगवेगळी असते. काही ठिकाणी केवळ बैलांना सजवून, पुरणपोळ्यांचा नैवेद्य भरवून मारुतीचे दर्शन घडवितात; तर काही ठिकाणी गावभर मिरवणूक काढली जाते. मात्र, वडांगळी (ता. सिन्नर, जि. नाशिक) येथे एकाच दिवशी दोनदा पोळा भरविला जातो. ही परंपरा अद्यापही टिकून आहे.

वडांगळी साधारण चार हजार लोकसंख्येचं गाव. सतीमाता यात्रेत बोकडबळी, जावयाची गाढवावरून धिंड आदी प्रथा - परंपरांमुळे राज्यभर परिचित. येथे वरचा व खालचा वाडा असे दोन भाग पडले आहेत. दोन्ही वाड्यांचा एकाच दिवशी; परंतु वेगवेगळ्या वेळी दोनदा पोळा भरविला जातो. प्रथम वरच्या वाड्याचा पोळा असतो. तो दुपारी चारला भरविला जातो. वरच्या वाड्यातील शेतकरी पहाटेपासूनच पोळ्याच्या तयारीला सुरवात करतात. त्यात बैलांच्या दिवसभरातील चाऱ्याची व्यवस्था, बैलांच्या शिंगांचा रंग काढणे, पाणी असल्यास नदीवर नेऊन अंघोळ घालणे आदी कामे सकाळी दहापर्यंत उरकली जातात. त्यानंतर बैलांना घरासमोर आणून त्यांच्या शिंगांना रंगरंगोटी, छंब्बी-गोंडे लावणे, अंगावर रंगांची वेगवेगळी डिझाईन काढणे आदी सजावट केली जाते. तोपर्यंत महिलावर्ग स्वयंपाक करतो.

दुपारी दोनच्या दरम्यान गावातील ब्राह्मण व गुरव प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी जाऊन बैलांची पूजा म्हणून बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य भरविला जातो. शेतकरी दुपारचे जेवण घेऊन वामकुक्षी घेतात, तोपर्यंत दुपारचे चार होतात. त्यानंतर मिरवणुकीची तयारी सुरू होते. गावाच्या वरच्या वेशीला (दरवर्षी ठरलेली जागा) सर्व शेतकरी बैल एकत्र आणतात. युवा शेतकरी प्रति बैल वर्गणी (दहा रुपये किंवा अधिक) गोळा करून त्यातून वाजंत्री, गुलाल आणला जातो. मिरवणुकीच्या अग्रभागी "मानकरी' आपले बैल आणतो. गुलालाची उधळण करीत वाद्याच्या गजरात पोळ्यास प्रारंभ होतो. वाद्याच्या तालावर जल्लोषात मिरवणूक सुरू होते. उत्साही युवकांचे पाय थिरकायला लागतात. संपूर्ण गावातून बैलांना मिरविले जाते. मिरवणूक मारुती मंदिराजवळ आल्यानंतर प्रत्येक शेतकरी मारुतीला नारळ फोडतो. वाजत गाजत मिरवणूक खालच्या वेशीला जाते. तेथेच वरच्या वाड्याच्या पोळ्याचे विसर्जन होते. खालचा वाड्याच्या पोळ्याची तयारी पूर्ण झालेली असते. पोळ्याची सुरवात खालच्या वेशीपासून होते. त्यात सर्व समाजांतील शेतकरी सहभागी होतात. सायंकाळी सहाला खालच्या वेशीचा पोळा भरविला जातो. जल्लोषात संपूर्ण गावातून बैलांना मिरवत वरच्या वेशीला पोळ्याची सांगता होते. दोन्ही पोळ्यांमध्ये गावातील सर्व नागरिक सहभागी होऊन आनंद लुटतात.

"मानकरी'
पोळ्याच्या मिरवणुकीत अग्रभागी असलेल्या बैलमालकास मानकरी म्हणतात. काही गावांमध्ये "बोली' लावून मानकरी ठरविला जातो. वडांगळीत वरच्या वाड्यातील (कै.) भास्कर पाटील (पूर्वीचे पोलिस पाटील) आणि खालच्या वाड्यात बाबूराव खुळे (मानकरी) यांना पिढी परंपरेनुसार मान मिळतो. सध्या त्यांच्याकडे बैल नसले, तरी ते मातीचे बैल घेऊन मिरवणुकीत अग्रभागी असतात.


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: