झायगोग्रामा मित्रकीटकाद्वारे गाजर गवताचे नियंत्रण
-
Monday, August 20, 2012 AT 02:15 AM (IST)
गाजर गवतामुळे अंग खाजणे, दमा, श्वसनाचा त्रास, सर्दी इत्यादी प्रतिकूल परिणाम मानवी आरोग्यावर होत आहेत. शेतात व बांधावर गाजर गवत वाढते, त्याचा पीक व्यवस्थापनामध्ये अडथळा होतो. हे लक्षात घेऊन मित्रकीटक झायगोग्रामा भुंग्यांद्वारे गाजर गवताचे जैविक नियंत्रण करणे आर्थिकदृष्ट्या व पर्यावरणीयदृष्ट्या फायद्याचे आहे.
डॉ. एन. के. भुते
गाजर गवत हे एक परदेशी उपद्रवी तण आहे. याला इंग्रजीमध्ये शास्त्रीय भाषेत "पार्थेनियम हिस्टेरिफोरस' असे नाव आहे, तर आपल्याकडे कॉंग्रेस गवत, पांढरी फुले किंवा गाजराच्या पाल्यासारखे असल्यामुळे "गाजर गवत' या नावाने ओळखले जाते. या तणाचे मूळ उगमस्थान उत्तर अमेरिकेतील मेक्सिको आहे. दुष्काळसदृश परिस्थितीमध्ये भारतात आयात केलेल्या गव्हाद्वारे या तणाचा प्रसार झाला. सद्य परिस्थितीत गाजर गवत हे एक अत्यंत उपद्रवी तण आहे.
गाजर गवतामुळे होणारे दुष्परिणाम -
1) गाजर गवताच्या स्पर्शामुळे ऍलर्जी विकार, अंग खाजणे, दमा, श्वसनाचा त्रास, सर्दी, शिंका, श्वसनेंद्रियाचे विकार, त्वचाविकार, अंग सुजणे इत्यादी दुष्परिणाम आढळून येतात.
2) दुभत्या जनावराने गाजर गवत खाल्ले असल्यास दुधाला कडू चव येते. अशा दुधाच्या सेवनामुळे मळमळ, डोकेदुखी आदीचा त्रास संभवतो.
3) शेतातील पिकाबरोबर अन्नासाठी स्पर्धा केल्यामुळे उत्पादनात घट आणि पडीक जमिनीतील जनावरांच्या चराई क्षेत्रात घट होते.
4) यातील मुळांद्वारे जमिनीत विषारी रसायने सोडल्यामुळे पीक उत्पादनात घट होते.
गाजर गवताचा प्रसार -
गाजर गवत हे बहुतेक पडीक जमिनीत, शहरातील मोकळ्या जागेत, औद्योगिक वसाहती, महामार्ग, रेल्वेमार्ग, राज्य रस्ते आणि महामार्गांच्या दुतर्फा, नदी, नाले, तलाव, डबके इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळून येते; तसेच शेतातील जवळपास सर्वच पिकांमध्ये उदा. कापूस, तूर, ज्वारी, भुईमूग, ऊस, भाजीपाला पिके आणि फळपिकांमध्ये त्याचा आढळ होतो. गाजर गवताचे वैशिष्ट्य म्हणजे भरपूर बियाणे तयार होण्याची क्षमता. या बियांचा प्रसार मुख्यतः शेणखताद्वारे, हवेद्वारे, नदी-नाले यातील पाण्याद्वारे, सांडपाण्याद्वारे, वाहनांच्या टायरद्वारे, शेतीतील अवजारे, अप्रत्यक्षरीत्या माणसांद्वारे इत्यादी कारणांमुळे होतो.
गाजर गवताच्या जैविक नियंत्रणाची गरज -
गाजर गवत हे विषारी असल्यामुळे उपटण्यासाठी मजूरवर्ग सहसा तयार होत नाही. रासायनिक तणनाशके ही महागडी असल्यामुळे वारंवार त्यांचा वापर करणे आर्थिकदृष्ट्या न परवडणारे आहे. सार्वजनिक क्षेत्रातील गाजर गवत नियंत्रित करणे खर्चिक आहे. रासायनिक तणनाशकांचा वापर हा पर्यावरणासाठी हानिकारक आहे, तसेच या पद्धतीचे नियंत्रण हे प्रभावी नाही, त्यामुळे झायगोग्रामा या मित्रकीटकाद्वारे गाजर गवताचे जैविक नियंत्रण करणे आर्थिकदृष्ट्या व पर्यावरणीयदृष्ट्या फायद्याचे आहे.
झायगोग्रामा भुंग्याची ओळख -
मेक्सिकोस्थित गाजर गवतावर उपजीविका करणारा हा झायगोग्रामा भुंगेरा मेक्सिकोतून आयात करण्यात आला, म्हणूनच या भुंग्याला "मेक्सिकन भुंगा' असे म्हणतात. या किडीचे प्रौढ भुंगे पांढरे असून, त्यावर काळसर रंगाच्या सरळ आणि नागमोडी रेषा असतात. या रेषा त्रिशुलाकार असल्यामुळे काही ठिकाणी यांना त्रिशूल भुंगे असेही म्हणतात. प्रौढ भुंगे आकाराने मध्यम, सहा मि.मी. लांब असून, मादी भुंगे नरापेक्षा आकाराने मोठे असतात.
झायगोग्रामा भुंग्याचा जीवनक्रम -
मादी भुंगे अलग-अलग अथवा गुच्छात पानाच्या खालील बाजूवर साधारणपणे 2000 अंडी घालतात. अंड्यांचा रंग फिकट पिवळा असून, अंड्यांतून अळ्या बाहेर पडण्याच्या वेळी लालसर होतो. अंडी अवस्थेचा कालावधी चार ते सहा दिवसांचा असून, अळ्यांच्या चार अवस्था दहा ते अकरा दिवसांत पूर्ण होतात; तर कोषावस्था नऊ ते दहा दिवसांची असते. या भुंग्यांचा एकूण कालावधी दोन ते तीन महिन्यांचा असून, ते गाजर गवताच्या पानांवर उपजीविका करतात.
झायगोग्रामाद्वारे गाजर गवत नियंत्रण -
अंड्यांतून बाहेर निघालेल्या अळ्या गाजर गवतावरील शेंड्याची पाने खातात. प्रथम अळ्या शेवटच्या कळ्या, सहकळ्या आणि नंतर पानाच्या कडेने खातात. तरुण अळ्या झाडाची वाढ आणि फुले येण्याचे थांबवितात. पूर्ण वाढलेल्या अळ्या रंगाने पिवळ्या पडतात आणि कसलीही हालचाल न करता सूक्ष्म होऊन जमिनीवर कोषावस्थेत जाण्यासाठी पडतात. कोषांमधून नऊ ते दहा दिवसांनी भुंगे जमिनीतून निघतात. पावसाळ्यात जून ते ऑक्टोबरपर्यंत भुंगे गाजरगवत फस्त करतात. भुंगे आणि अळ्या फक्त गाजर गवतावरच जगतात. भुंगे व अळ्यांची गाजर गवत खाण्याची गती कमी असल्यामुळे आणि गाजर गवताची वाढ लवकर होत असल्यामुळे गाजर गवताचे ताबडतोब नियंत्रण दिसून येत नाही; परंतु अन्नसाखळीतील घटक असल्यामुळे हे भुंगे महत्त्वाचे आहेत. गाजर गवत उपलब्ध नसल्यास भुंगे जमिनीत सुप्तावस्थेत जातात. नोव्हेंबरनंतर भुंगे जमिनीत सात ते आठ महिने दडून बसतात आणि पुढील वर्षी पावसाळ्यात सुरवातीच्या पावसानंतर जमिनीतून निघून गाजर गवताचा नाश करण्यास सुरवात करतात.
हे भुंगे एखाद्या वातावरणात, एखाद्या ठिकाणी स्थित झाले, की पुढच्या वर्षी पुनःपुन्हा भुंगे सोडण्याची गरज पडत नाही. गाजर गवताच्या उच्चाटनासाठी शेतात प्रति हेक्टरी 500 भुंगे सोडल्यास हे भुंगे स्थिर होऊन गाजर गवताचे प्रभावी नियंत्रण करतात. शक्यतोवर मनुष्यप्राण्याचा अडथळा होणार नाही अशी जागा भुंगे सोडण्यासाठी निवडावी. झायगोग्रामामुळे मनुष्यप्राण्याला कोणताही त्रास होत नाही, उलट उपद्रवी गाजर गवतावर झायगोग्रामा आपली उपजीविका करून मनुष्यप्राण्यावर एक प्रकारे उपकारच करतात. प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा झायगोग्रामामुळे गाजर गवताचे प्रभावी नियंत्रण पाहावयास मिळते. झायगोग्रामा भुंगे कृषी कीटकशास्त्र विभाग, आनंद निकेतन कृषी महाविद्यालय, आनंदवन, वरोरा आणि कृषी कीटकशास्त्र विभाग, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी (02452 - 228235) येथे उपलब्ध आहेत.
संपर्क - डॉ. एन. के. भुते - 7588082033
(लेखक आनंद निकेतन कृषी महाविद्यालय,
आनंदवन, वरोरा, जि. चंद्रपूर येथे सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)