Last Update:
 
ऍग्रो स्पेशल

आंतरपीक भाजीपाल्यातून गडगूळ यांना गवसले तंत्र
-
Monday, August 20, 2012 AT 01:45 AM (IST)
Tags: agro special

क्षेत्र तुटपुंजे असणे हीदेखील शेतकऱ्यांसाठी प्रतिकूल संधी असू शकते. औरंगाबाद जिल्ह्यातील धोंडिराम गडगूळ यांनी याच संधीचे सोने करीत भाजीपाला पिकांना आंतरपिके बनवीत त्यातून सातत्याने उत्पन्न मिळत राहील असा उपाय शोधला आहे. पिकांचे अवशेष, सेंद्रिय घटकांचा वापर, ठिबक सिंचन, साऱ्या कुटुंबाचा कष्टाला हातभार अशा विविध उपायांमधून त्यांनी आपली थोडीच असलेली जमीन उत्पन्नक्षम केली आहे.
प्रदीप अजमेरा

औरंगाबादजवळील जमिनीचा भाव कोटी रुपयांचा आहे, त्यामुळे उपलब्ध जमिनीतील चार-पाच गुंठे जमीन जरी विकली, तरी काही दिवस तरी जीवन आरामदायक होईल अशी परिस्थिती येऊन जाते; परंतु जमीन विकून आजचा उदरनिर्वाह जरी झाला, तरी भावी पिढीसाठी काहीच शिल्लक राहणार नाही. त्याऐवजी मन लावून शेती केली तर कायमस्वरूपी उत्पन्न घेता येऊ शकते, शिवाय जमीन आपलीच राहते ही गोष्ट वेगळी.

औरंगाबाद तालुक्‍यातील करोडी येथील धोंडिराम बाजीराव गडगूळ यांची शेतीवर असलेली अशीच अपार निष्ठा त्यांच्या प्रगतीला कारणीभूत ठरली आहे. गडगूळ आपला मुलगा उद्धव, सून पूजा यांच्या मदतीने शेतीचे नियोजन चांगल्या प्रकारे करतात. संपूर्ण कुटुंबच शेतात मनापासून काम करते. पारंपरिक पद्धतीने कापूस एके कापूस अशी पीकपद्धती घेण्याऐवजी विविध भाजीपाला घेण्यावर त्यांचा भर असतो. उत्पादित भाजीपाला आपल्या शेतापासून सुमारे 18 किलोमीटर अंतरावर असलेल्या औरंगाबाद येथील बाजारपेठेत ते स्वतःच विक्री करतात. उत्पादनाबरोबरच विक्रीचे नियोजनही त्यांनी योग्य पद्धतीने आखले आहे.

अल्प जमिनीत भरपूर पिके
गडगूळ यांची गावाला लागूनच केवळ तीन एकर जमीन आहे. हलकी ते मध्यम स्वरूपाचा पोत असलेली व पाण्याचा चांगला निचरा होणारी ही जमीन उत्पादन मात्र भरपूर देते. कारण जमिनीचा पोत सुधारण्याकडे गडगूळ यांचे सतत लक्ष असते. अल्प भूधारक शेतकरी असल्याने त्या जमिनीचा जास्तीत जास्त उपयोग करण्याकडे त्यांचा कल आहे. साहजिकच कमी क्षेत्रातून अधिक उत्पन्न घेण्याचे नियोजन करताना त्यांनी आंतरपिकांचा पर्याय निवडला. एकात एक पिके घेऊन जैवविविधता तर वाढवलीच, शिवाय जमिनीचा काटेकोर उपयोगही केला. उत्पादन सातत्याने वाढविले. सुमारे दोन एकरांत 12 बाय 8 फूट अंतरावर डाळिंबाची मागील वर्षी लागवड केली. नवीन बागेत सुरवातीला कांदे घेतले. काढणी वेळी भाव अत्यंत कमी होता. तो बाजारात विकणे परवडत नव्हते, त्यामुळे सर्व कांदे शेतातच छोटीशी चाळ बनवून साठवून ठेवले. आता स्वतःच औरंगाबादच्या बाजारपेठेत थोडे-थोडे करून विकत आहेत. आजपर्यंत कांद्यापासून जे उत्पन्न मिळाले, ते यापूर्वी त्यांना कोणत्याच पिकापासून मिळाले नव्हते, असे गडगूळ कबूल करतात. कांदा पिकाने त्यांना नवी दिशा दाखविली. आतापर्यंत अर्धाच हिस्सा कांदा विकला असून, त्यापासून 40 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. साठविलेल्या कांद्यापासून आणखी तेवढीच रक्कम हाती येण्याची त्यांची अपेक्षा आहे.

दोन वर्षांपूर्वी तेवढ्याच क्षेत्रात ते कापूस व तूर एवढीच पिके घेत होते. जास्तीत जास्त 25 क्विंटल कापूस तीन एकर क्षेत्रातून मिळायचा. दोन ते तीन क्विंटल तूर मिळायची. त्यापासून एक लाख दहा हजारांपर्यंत उत्पन्न मिळत होते. सर्व खर्च वजा जाऊन 80 हजार रुपयांचे निव्वळ उत्पन्न पदरात पडत होते; मात्र आता कांदा पिकापासूनच एक एकर क्षेत्रात खर्च वजा जाता 70 हजार रुपये मिळाले. याशिवाय 30 गुंठे क्षेत्रातून 3200 क्विंटल म्हणजेच 160 क्रेट एवढे काकडीचे उत्पादन मिळाले. किलोला साधारणतः 13 रुपये सरासरी दर मिळाला. त्यापासून 41 हजार 600 रुपये मिळाले. कमी कालावधीत व कमी खर्चात काकडी चांगले उत्पन्न देऊन गेली.

आंतरपीक म्हणून भाजीपाला
सध्या डाळिंब पिकात त्यांच्याकडे फुलकोबी, पत्ताकोबी, टोमॅटो, मिरची अशी विविध पिके थोड्या थोड्या क्षेत्रावर आहेत. "फैजाबादी पतली' नावाने लोकप्रिय मिरचीला बाजारात चांगला उठाव असतो, त्यासाठी विशेष काळजी घेण्याचीही गरज पडत नाही. आता मिरची निघायला सुरवात झाली आहे. सुमारे तीन तोडे झाले असून, सध्या किलोला 40 रुपये भाव सुरू आहे. अजून बराच कालावधीसाठी मिरचीचे उत्पादन निघेल.

आधीच जमीन कमी व उत्पन्नाचे तेवढे एकच साधन असल्याने आंतरपिकांद्वारे एकाच वेळी दोन पिके घेण्याचा गडगूळ यांचा प्रयत्न स्तुत्य असाच आहे. डाळिंब घेऊन उत्पादनाची दोन वर्षे वाट पाहण्यापेक्षा आंतरपिकातून उत्पन्न मिळवून खर्च भागवला जातो आणि कुटुंबाचा निर्वाह चांगल्या प्रकारे करता येतो, हे गडगूळ यांना समजले आहे. काकडीनंतर यंदाच्या उन्हाळी हंगामात फुलकोबी पिकातून त्यांनी सुमारे 80 थैल्या (प्रति दहा किलो) उत्पादन घेतले. प्रति थैली 160 रुपये भाव मिळाला. आताही हे पीक त्यांनी घेतले आहे. आंतरपिकाच्या भाजीपाला पिकांपासून कमी दिवसांत 30 ते 35 हजार रुपये त्यांना मिळाले आहेत. भाजीपाला पिकांच्या उत्पादनासाठी थोडे जास्त कष्ट घ्यावे लागतात; मात्र पैसाही इतर पिकांच्या तुलनेत चांगला मिळतो. विशेष म्हणजे साऱ्या कुटुंबाचा हातभार शेताला चांगल्या प्रकारे लागून नियोजन सुलभ होते.

शेणखताचा वापर
गडगूळ यांच्याकडे एक म्हैस, दोन गाई व अन्य मिळून नऊ जनावरे आहेत. त्यापासून मोठ्या प्रमाणात शेण मिळते; परंतु तीन एकर क्षेत्राला तेवढे शेणखत पुरेसे होत नाही, त्यामुळे दरवर्षी बाहेरून ते विकत घ्यावे लागते. दोन किलोमीटर परिसरात दूध व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांकडून शेणखत उपलब्ध केले जाते, त्यामुळे वाहतुकीचा खर्चही कमी होतो. जमिनीचा पोत चांगला ठेवायचा असेल तर शेणखत व कंपोस्ट खत अतिशय गरजेचे आहे. सध्याच्या शेणखताच्या खड्ड्यात गांडुळेही सोडली असल्याने काही प्रमाणात गांडूळ खतही उपलब्ध होते. शेतातील काडीकचरा शेतातच कुजविला जातो. या वर्षी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बांधावर खतवाटप योजनेमधून रासायनिक खतही गावात उपलब्ध झाले. त्याचा फायदा गडगूळ यांना मिळाला. त्यामुळे खतासाठी वणवण करीत फिरण्याचे काम पडले नाही. ही चांगली योजना असून, याद्वारे शेतकरी एकत्र येऊन नियोजन करण्याच्या कामाला चांगले वळण मिळाल्याचे गडगूळ सांगतात. शेणखत हे जमिनीचे सक्षम अन्न असून, रासायनिक खत हे सलाईनसारखे आहे असे ते म्हणतात.

विहीर व ठिबक सिंचन
एक विहीर असून त्यास आतापर्यंत तरी बऱ्यापैकी पाणी आहे. पावसाळ्यात भरपूर पाणी येत असले तरी कमी पाऊसमानामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खालावली, त्यामुळे विहिरीतील पाणीही कमी पडले. आता मोकळे पाणी देणे शक्‍यच नव्हते, त्यामुळे संपूर्ण क्षेत्राला ठिबक करून घेतले. आजही ठिबकसाठीची मोटार चार ते पाच तास चालते. तेवढे पाणी पिकासाठी पुरेसे होते. उपलब्ध जमिनीचा व उपलब्ध पाण्याचा अतिशय चांगला वापर करून नियोजनबद्ध पद्धतीने भाजीपाला पिकविला जातो. भाजीपाला आंतरपीक असल्याने त्यासाठी मात्र अधूनमधून मोकळे पाणी सोडले जाते. कमी वेळात येणारा भाजीपाला असल्याने त्याचे अवशेषही जमिनीत मोठ्या प्रमाणात पडून तेथेच कुजले जातात, त्यामुळे जमिनीची जलधारण क्षमता चांगली झाली आहे.

कृषी विभागाची मदत
डाळिंब लागवडीसाठी रोजगार हमी योजनेशी निगडित फळझाडे लागवड योजनेतून, तर ठिबक सिंचनासाठी सूक्ष्म सिंचन योजनेद्वारे कृषी विभागाने गडगूळ यांना मदत केली आहे. कृषी सहायक सुधाकर पाटील व प्रभारी मंडळ कृषी अधिकारी प्रशांत गोसावी यांचे मार्गदर्शन त्यांना मिळते. डाळिंब व भाजीपाला लागवडीची प्रेरणा जडगाव (जि. औरंगाबाद) येथील प्रयोगशील शेतकरी विठ्ठल भोसले यांच्याकडून त्यांना मिळाली आहे.

संपर्क - राम गडगूळ - 9850686225
(लेखक औरंगाबाद कृषी विभागात कृषी पर्यवेक्षक आहेत.)




 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: