Last Update:
 
राज्य

ज्येष्ठ इतिहास संशोधक सुरेश जोशी यांचे निधन
- (प्रतिनिधी)
Wednesday, October 17, 2012 AT 02:15 AM (IST)
Tags: history,   nagar,   suresh joshi
नगर - ज्येष्ठ इतिहास संशोधक व ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयाचे माजी कार्यकारी विश्‍वस्त सुरेश दामोदर जोशी (वय 82) यांचे काल (मंगळवार, ता. 16) दुपारी पुणे येथे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

वृद्धापकाळ व आजारपण यामुळे गेल्या जानेवारीमध्ये वस्तुसंग्रहालयाच्या कार्यकारी विश्‍वस्तपदाचे काम जोशी यांनी थांबविले. चार- पाच दिवसांपूर्वी घरात फिरताना ते पडले. त्यानंतर पुण्यात मुलाकडे ते राहत होते. आजारपण व अशक्तपणामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांचे निधन झाले. "ऍग्रोवन'चे वितरण विभागाचे उपव्यवस्थापक चंद्रशेखर जोशी यांचे ते वडील होत.

सुरेश जोशी यांचा जन्म वांबोरी (ता. राहुरी) येथे 27 फेब्रुवारी 1932 रोजी झाला. त्यांचे वडील दामोदर जोशी मोडी लिपीचे जाणकार व संग्रहालयशास्त्राचे अभ्यासक होते. त्यांचीच प्रेरणा घेऊन सुरेश जोशी यांनी विद्यार्थिदशेपासून इतिहास संशोधन सुरू केले. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार, सरदार आबासाहेब मुजुमदार, सरदार बाबासाहेब मिरीकर, प्राचार्य थॉमस बार्नबस आदी दिग्गजांच्या सहवासात त्यांनी काम केले.

ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयाशी जोशी यांचा तब्बल 45 वर्षे संबंध आला, तेच त्यांचे जणू जीवन बनले. "निजामाची राजधानी - अहमदनगर', "इतिशोध', "दिवाण पळशीकर दप्तर - खंड एक', "निवृत्ती- मुक्ताई संवाद (ज्ञानबोध)', "ऐसी लढाई झालीच नाही', "इतिहास संशोधन प्रदीप', "जिल्ह्यातील स्वातंत्र्यसंग्राम' आदी पुस्तके त्यांनी लिहिली. संग्रहालयातर्फे त्यांनी प्रा. नानासाहेब नारळकर, रा. ब. हिवरगावकर, जी. एम. शाह, वा. द. कस्तुरे, डॉ. जिन्सीवाले असे विविध पुरस्कारही सुरू केले. डॉ. जिन्सीवाले व्याख्यानमालेतून ऐतिहासिक विषयांवर तज्ज्ञांची व्याख्याने नगरला आयोजित केली.

वयाची 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल नगर महापालिकेतर्फे त्यांना मानपत्र देण्यात आले होते. ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयात त्यांनी पाचशेहून अधिक दुर्मिळ वस्तूंचा संग्रह केला आहे. यात गणेश दालन, मूर्तिशास्त्र विभाग, दुर्मिळ ग्रंथ- पोथ्या- हस्तलिखिते, ताम्र- पाषाणकालीन मातीची भांडी, त्याकाळचे स्त्रियांचे अलंकार, छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ, छत्रपती संभाजी महाराजांचे दुर्मिळ छायाचित्र आदींचा समावेश आहे.


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: