Last Update:
 
प्रादेशिक

विज्ञान आश्रमाने तयार केली "तेलाची घाणी'
टीम ऍग्रोवन
Wednesday, December 05, 2012 AT 02:30 AM (IST)
पुणे : स्टॉलवर ठेवलेले छोटे यंत्र, हायड्रॉलिक पंपाने एक जण यंत्राची हाताळणी करतोय आणि यंत्राच्या तळाला शेंगदाण्याचे तेल हळूहळू जमतंय. शेतकरीही उत्सुकतेने याची विचारपूस करताहेत... हे यंत्र होते अनुपम तेलघाणी.

पाबळ (जि. पुणे) येथील विज्ञान आश्रमातील तज्ज्ञांनी विकसित केलेली तेलाची घाणी शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या घाणीबाबत माहिती देताना विज्ञान आश्रमातील तज्ज्ञ अनिल गाढे म्हणाले, की ग्रामीण भागातील विजेची समस्या लक्षात घेऊन आम्ही हायड्रॉलिक तंत्रज्ञानाचा वापर करून लहान क्षमतेची तेलाची घाणी विकसित केली आहे. ही तेल घाणी चालविण्यासाठी विजेची गरज नाही. यंत्र लहान असल्याने व्यवस्थापन खर्च कमी आहे. या यंत्राच्या प्रक्रियेत उष्णता तयार होत नाही, त्यामुळे तेलाच्या गुणवत्तेवर परिणाम होत नाही. यातून निघणारे तेल शुद्ध असल्याने फिल्टरची गरज नाही. या घाणीसाठी तीन चौरस फुटाची जागा लागते. जवळपास 70 टक्‍क्‍यांपर्यंत या घाणीची क्षमता आहे. या घाणीतून शेंगदाणे, तिळाचा जो चोथा उरतो, त्यापासून आम्ही लो फॅट चिक्की, लाडू आणि करंजी तयार केली आहे. या घाणीतून शेंगदाणे, सूर्यफूल, तीळ, खोबरे, जवस, एरंडी, कडुनिंबाचे तेल काढता येते. साधारणपणे एका तासात एक किलो शेंगदाण्यापासून 300 मि.लि., खोबऱ्याचे 400 मि.लि., जवसाचे 150 मि.लि., एरंडीचे 400 मि.लि., कडुनिंब 140 मि.लि. तेल या घाणीतून निघते. या तेल घाणीची किंमत सुमारे 25 हजार इतकी आहे. महिला बचत गटांसाठी ही घाणी फायदेशीर ठरेल.

संपर्क - 02168-292326
विज्ञान आश्रम, पाबळ, ता. शिरूर, जि. पुणे


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2011 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: