Last Update:
 
ऍग्रो व्हिजन

सौर ऊर्जेच्या कार्यक्षम वापरासाठी सोलर हिटर विकसित
-
Thursday, June 06, 2013 AT 04:15 AM (IST)
Tags: agro vision

लंबवर्तुळाकार परावर्तकाचा (पॅराबोलिक रिफ्लेक्‍टरचा) वापर करत सौर ऊर्जेचा अधिक कार्यक्षमपणे वापर करणारा हिटर ईशान्य प्रादेशिक शास्त्र आणि तंत्रज्ञान संस्थेतील अभियांत्रिकीच्या तीन विद्यार्थ्यांनी विकसित केला आहे. या सोलर हिटरमुळे पदार्थ शिजविण्यासाठी आवश्‍यक उष्णता कमी वेळामध्ये उपलब्ध होते.

सुमन पावो, विकास गौतम आणि जुवेल त्रिपुरा हे अभियांत्रिकीचे विद्यार्थी आहेत. पाण्याच्या ड्रमभोवती पॅराबोलिक (लंबवर्तुळाकार) आकाराच्या परावर्तकाचा वापर त्यांनी केला आहे. त्यामुळे सूर्यकिरणांचे एका विशिष्ट जागेवर एकत्रीकरण होते. एकत्रीकरणामुळे ऊर्जेची कार्यक्षमता वाढून कमी वेळामध्ये अधिक तापमान मिळवणे शक्‍य होते. याबाबत माहिती देताना सुमन पावो यांनी सांगितले, की या सोलर हिटरमध्ये पॅराबोलिक आकाराची ऍल्युमिनिअम डिश वापरली आहे. सूर्यप्रकाशाचे परावर्तन ड्रममध्ये होते, त्यामुळे निर्माण झालेल्या उष्णतेमुळे पदार्थ शिजण्यास मदत होते. या पॅरोबोलिक रिफ्लेक्‍टरमुळे पाण्याचे तापमान 139 अंश सेल्सिअसपर्यंत पोचते. हे तापमान कडधान्य आणि भाज्या शिजविण्यासाठी पुरेसे असते. पावसाळ्यामध्ये या ड्रमचा वापर पावसाचे पाणी साठविण्यासाठीही होऊ शकत असल्याचे पावो यांनी सांगितले.

पावो यांनी पुढे सांगितले, की पृथ्वीवर सूर्यापासून सातत्याने ऊर्जेचा एक प्रवाह येत असतो. भारतीय उपखंडामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये प्रति वर्ग मीटर जागेमध्ये सुमारे एक हजार वॉट ऊर्जा प्रति सेकंद उपलब्ध होते. मात्र, ही ऊर्जा विस्तृतपणे पसरली जाते, ती सरळपणे उष्णता मिळविण्यासाठी वापरता येत नाही. ज्याप्रमाणे भिंगांच्या साह्याने प्रकाशाचे एकत्रीकरण केल्यास कागद किंवा लाकूड जाळणे शक्‍य होते. असाच प्रकार आम्ही पॅराबोलिक रिफ्लेक्‍टरच्या वापरातून साधला आहे.

असे आहेत सोलर हिटरचे फायदे
- या नव्या सोलर हिटरचा वापर पाणी उकळण्यासाठी, शिजविण्यासाठी, तळण्यासारख्या स्वयंपाकातील क्रियांसाठी करणे शक्‍य आहे.
- ही ऊर्जा स्वच्छ असून यातून कोणतेही प्रदूषण होत नाही.
- ज्या प्रक्रियांमध्ये उकळलेल्या पाण्याचा वापर केला जातो, अशा व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रासाठी हा सोलर हिटर अधिक उपयुक्त ठरू शकतो.
- सुरवातीला एका वेळी भांडवल गुंतवल्यानंतर हे उपकरण कायमस्वरूपी ऊर्जा उपलब्ध करून देते, तसेच त्याच्या वापरासाठी फार कौशल्याची आवश्‍यकता नाही.
- सौर कुकर हे पर्यावरणाला पूरक असून अन्य खनिज इंधनावर माणसांचे अवलंबित्व कमी करण्यास मदत करू शकतील. तसेच, कार्बन मोनोक्‍साईडचे उत्सर्जन कमी करण्यास उपयुक्त ठरतील.
- या उपकरणामध्ये शिजवलेल्या पदार्थांची चव व स्वाद तसाच राहत असून, पदार्थ जळण्याची शक्‍यता अत्यंत कमी राहते.


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2013 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: