Last Update:
 
मुख्य पान

देशाला मिळणार स्वतंत्र अन्नप्रक्रिया धोरण
-
Wednesday, February 15, 2017 AT 06:00 AM (IST)
Tags: pune,   maharashtra
उद्योगाच्या समस्या सुटण्यासाठी मिळणार कायमस्वरूपी उपाय

पुणे - देशासाठी लागू होणाऱ्या अन्नप्रक्रिया धोरणाचा मसुदा तयार झाला आहे. यामुळे कृषी क्षेत्रातील प्रक्रिया उद्योगांसमोरील समस्या दूर करण्यासाठी उपाययोजना उपलब्ध होतील, अशी उद्योग सूत्रांचे म्हणणे आहे.

दर वर्षी दीड लाख कोटीच्या पुढे उलाढाल असलेल्या अन्नप्रक्रिया उद्योगासाठी धोरण अस्तित्वात नाही, त्यामुळे कृषी आणि उद्योग मंत्रालयामध्ये अन्नप्रक्रियेच्या समस्या हाताळताना संभ्रमाचे वातावरण असते. प्रक्रिया उद्योगांनादेखील समस्या सोडविण्यासाठी कोणतीही सुटसुटीत नियमावली उपलब्ध नाही.

केंद्रीय अन्नप्रक्रिया मंत्रालयाचे सचिव अविनाश श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत अलीकडेच झालेल्या बैठकीत अन्नप्रक्रिया धोरणाचा आदर्श मसुदा मांडला गेला. कृषी प्रक्रिया व निर्यातीत आघाडीवर असलेल्या महाराष्ट्राला स्वतःचे अन्न प्रक्रिया धोरण अजूनही तयार करता आलेले नाही. केंद्र सरकारचे धोरण तयार झाल्यानंतर महाराष्ट्राच्या धोरण निर्मितीला दिशा मिळणार आहे.

मसुदा समितीमध्ये "सीआयआय'च्या वतीने काम करणारे विजयकुमार चोले म्हणाले, की अपेडासह नाबार्ड, सीआयआय व अन्न प्रक्रिया मंत्रालयाच्या प्रतिनिधींनी मसुद्यावर चर्चा केली. अन्नप्रक्रिया धोरणासाठी येत्या काही दिवसांत पुन्हा एक बैठक घेतली जाणार आहे. या धोरणाला अंतिम रूप दिल्यानंतर सर्व राज्यांसाठी धोरण पाठविले जाईल, त्यामुळे कोणत्याही राज्याला स्वतःचे अन्नप्रक्रिया धोरण तयार करण्यातील अडचणी दूर होतील. केंद्र सरकारचे नवे "आदर्श अन्नप्रक्रिया धोरण' एक मार्गदर्शक म्हणून इतर राज्यांसाठी उपयुक्त ठरेल.

केंद्रीय अन्नप्रक्रिया धोरण अस्तित्वात नसल्यामुळे सध्या देशभर गोंधळाची स्थिती आहे. त्यात काही राज्यांचे स्वतंत्र धोरण असून, त्यात एकसारखेपणा नाही. हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाना, तेलंगणा, राज्यस्थान, आंध्र प्रदेश आदी राज्यांच्या अन्नप्रक्रिया धोरणात एकवाक्‍यता नाही. श्री. चोले यांनी मसुदा समितीच्या बैठकीत सर्व राज्यांच्या अन्नप्रक्रिया उद्योगांना उपयुक्त ठरणाऱ्या सूचना मांडल्या. या सूचनांवर विचार करण्याचे संकेत अन्नप्रक्रिया मंत्रालयाने दिले आहेत.

अन्नप्रक्रिया धोरणासाठी आलेल्या सूचना....
- प्रत्येक राज्यात अन्न प्रक्रियेसाठी स्वतंत्र विभाग
- अन्नप्रक्रिया उद्योगांना सेवा, परवानगीसाठी एक खिडकी कामकाज
- कामगार कायदे व नियमावलींमध्ये सुटसुटीतपणा
- अन्नप्रक्रिया उद्योग वाढीसाठी स्वयंनियमनाची तरतूद
- अन्नप्रक्रियेसाठी पुरवठा साखळी मजबूत करणे

उलाढाल दोन लाख कोटींपुढे जाणार

देशातील अन्नप्रक्रिया उद्योगाची उलाढाल सध्या एक लाख 60 हजार कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. कृषी क्षेत्रातील घडामोडींमुळे येत्या दशकाच्या आत ही उलाढाल दोन लाख कोटींच्या पुढे जाण्याची शक्‍यता आहे. देशाच्या एकूण निर्यातीत 11 टक्के वाटा अन्नप्रक्रिया उद्योगाचा आहे. देशाच्या उत्पादनातील एकूण सकल उत्पादनात (जीडीपी) 11 टक्के वाटा या क्षेत्राचा आहे. अन्नप्रक्रिया उद्योगामधून 13 टक्के नोंदणीकृत, तर 11 टक्के अनोंदणीकृत रोजगार निर्मिती केली जाते.

 
 
About Us | Contact Us | Advertise With Us | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: