Last Update:
 
मुख्य पान

सांगली बेदाण्याला हवे ‘क्लस्टर’
-
Thursday, February 16, 2017 AT 06:00 AM (IST)
Tags: sangli,   maharashtra
देशांतर्गत आणि आतंरराष्ट्रीय बाजारपेठ काबीज करण्याची क्षमता

शीतल मासाळ
सांगली : जिल्ह्याच्या अर्थकारणात सुमारे 1700 कोटींची वार्षिक उलाढाल असणाऱ्या ‘सांगली बेदाण्या’ला व्यावसायिक वृद्धीसाठी स्वतंत्र क्लस्टरची आवश्‍यकता अाहे. ‘सांगली बेदाणा’ म्हणून गेल्या वर्षीच भौगोलिक मानांकनही (जिओग्रॉफिकल इंडिकेशन) मिळाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही जाण्याचा मार्ग सुकर झाला अाहे. येथील बेदाणा बाजारपेठ टिकवून ठेवणे आणि विस्तारत नेणे यासाठीचे धोरणात्मक निर्णयाची मागणी करण्यात येत असून, याबाबत दखल न घेतली गेल्यास हळदीप्रमाणेच या बाजारपेठेचा परराज्यात स्थलांतराचा धोका आहे.

सांगलीची क्षमता
जगात बेदाणा उत्पादनात भारताचा पहिल्या दहा क्रमांकात वाटा आहे. महाराष्ट्रात वर्षाकाठी दीड-पावणेदोन लाख बेदाणा -----टन----- उत्पादन होते. यात निव्वळ सांगली जिल्ह्यात १ लाख टनांचा वाटा आहे. उत्पादनाबरोबरच सांगली-तासगावची उलाढाल 1500 ते 1700 कोटी इतकी आहे. जिल्ह्यात एक लाख एकरांवर क्षेत्र द्राक्ष क्षेत्र अाहे. शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवणाऱ्या या पीकाबाबत इथला शेतकरी सतत प्रयोगशील राहिला आहे. मात्र टेबल ग्रेप्सच्या निर्यात, जेवढी होते, त्यातुलनेत बेदाणा निर्यातही उपेक्षितच राहिली अाहे.

तंत्रज्ञानात आघाडी हवी
पारंपरिक पद्धतीने बेदाणा तयार करताना स्वच्छता, प्रतवारी, प्रक्रिया आदीबाबत तंत्रज्ञानाचा वापर जिल्ह्यात वाढला आहे. त्यातून वेळ, श्रम आणि उत्पादन खर्चात बचत होते. प्रतवारीसाठी संगणकीकृत अशी कॅमेरा कलर सॉर्टर यंत्रणा, ट्रे पॅकिंग, बेदाणा वॉशिंग, काडी स्वच्छ करणे यातही नवनवीन यंत्रसामग्री सतत अपडेट होत असून, ते तंत्र शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न होणे अावश्‍यक अाहे.

साठवण क्षमतेसाठी प्राेत्साहन हवे
सोलापूर आणि कर्नाटक सीमा भागातून मोठ्या प्रमाणात बेदाणा येतो. जत तालुक्‍यांतील बेदाण्याची गुणवत्ता सर्वोत्तम आहे. सीमा भागात तयार होणारा बेदाणा स्टोअरेजसाठी सांगली जिल्ह्यात कसा येईल या दृष्टीने विशेष प्रयत्न हवेत. त्यासाठी तुलनात्मक अल्पदरात स्टोअरेजची सुविधा निर्माण होण्याची गरज व्यक्त केली जात अाहे. जिल्ह्यात सध्या 71 शीतगृहांमध्ये एक लाख 5 हजार मेट्रिक टन साठवणक्षमता आहे. ही संख्या वाढणे अावश्‍यक अाहे. या शीतगृहांसाठी रस्ते, वीज, पाणी पायाभूत सुविधांचे जाळे तयार करावे लागतील. शीतगृहांसाठी शेतीच्या दरात आता वीज उपलब्ध झाल्यास प्रोत्साहन मिळेल. उत्पादक शेतकऱ्यांसाठी बाजार समितीच्या वतीने नाममात्र किमतीत निवास व्यवस्था, ओळखपत्रे देणे असे प्रयत्न गरजेचे आहेत.

देशांतर्गत ‘बँडिंग’ हवे
उत्तर प्रदेश, गुजरात, पंजाब, दिल्ली, मध्य प्रदेश तसेच दक्षिणेकडील राज्यांमध्ये सांगली जिल्ह्यातील बेदाणा विक्रीसाठी जातो. देशातील बाजारपेठच हीसुद्धा एक मोठी संधी आहे. त्यासाठी विश्‍वासार्ह यंत्रणा निर्माण करणे, दिल्लीसारख्या महानगरांमध्ये सणासुदीच्या काळात सांगली बेदाण्याची प्रदर्शने भरवणे, तिथल्या बाजारपेठेत बेदाण्याची कायमस्वरूपी उपलब्धता व्हावी यासाठी पुढाकार हवा. मध्यंतरी चेंबरने व्यापार वृद्धीसाठी तरुणांना प्रोत्साहित करणारी कार्यशाळा घ्याव्यात, अशा अपेक्षा बेदाणा उत्पादक व प्रक्रिया उद्योजकांनी व्यक्त केल्या अाहेत.

क्लस्टर होणे अावश्‍यक
सांगली, तासगाव परिसर हा बेदाणा क्‍लस्टरचा विचार यापूर्वीही बोलून दाखविण्यात आला आहे. हा विस्तार जिथे नैसर्गिकरीत्या बेदाणानिर्मितीचे शेड आहेत अशा ढालगाव, केरेवाडी आणि कवठेमहांकाळ, जत तालुक्‍यापर्यंत नेता येईल. निर्यातक्षम बेदाणा तयार करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावातील प्रयोगशील शेतकऱ्यांची निवड करून त्यांच्या माध्यमातून गावपातळीवरच प्रशिक्षण आणि मार्गदर्शनाची सुविधा तयार केली पाहिजे.

निर्यातीला हवी चालना
आखाती देशासह जर्मनी, श्रीलंका, नेदरलॅंड, संयुक्‍त अरब अमिरात अशा 80 देशात गतवर्षी 27 हजार मेट्रिक टन बेदाण्याची भारतातून निर्यात झाली आहे. या वर्षी बांगलादेशी व्यापारी प्रथमच सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर द्राक्षे खरेदी करत आहेत. यंदा बेदाण्याचे उत्पादन किंचितसे घटणार असल्याने दर चांगले राहतील अशी आशा आहे. मात्र दरातील चढ-उतार कमी होण्यासाठी निर्यातीला प्रोत्साहन मिळणे आवश्‍यक आहे. 
 
About Us | Contact Us | Advertise With Us | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: