Last Update:
 
मुख्य पान

कांदा निपटाऱ्यातील अडचणी १५ मार्चपर्यंत राहण्याची शक्यता
-
Thursday, February 16, 2017 AT 06:00 AM (IST)
Tags: nashik,   maharashtra,   farmers
नाशिक - कांद्याची दुप्पट आवक, राज्याबाहेर माल जाण्यात येत असलेला अडथळा, मालाचा निपटारा करण्यात येत असलेल्या अडचणींची परिस्थिती किमान १५ मार्चपर्यंत राहणार आहे. या काळात प्रतिक्विंटल ३०० ते ६०० व सरासरी ४५० रुपये हे सध्याचेच दर स्थिर राहतील, असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. 
 
जिल्ह्यातील १५ बाजार समित्या व ४५ उपबाजारांत सध्या दर रोज २ क्विंटल कांद्याची आवक होत आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही आवक दुप्पट होत आहे. सद्यःस्थितीत सुरू असलेला पोळ कांदा हा साठवता येणारा नसल्याने हा कांदा काढणीनंतर लगेच बाजारात आणण्याशिवाय पर्याय नसतो. हा माल १५ मार्चपर्यंत चालेल. त्यानंतर उन्हाळ कांद्याची आवक सुरू होईल. पुणे विभागात तर उन्हाळ कांद्याची आवक सुरू झाली आहे. कांद्याची आवक वाढलेली असतानाच आलेल्या कांद्याचा निपटारा होत नसल्याने व्यापारीही अडचणीत सापडले आहेत. पुरेशा वॅगन्स उपलब्ध होत नसल्याने मालाचा निपटारा होत नसल्याचे चित्र आहे. 
 
नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील म्हणाले, की यंदा लाल व पोळ कांद्याची उत्पादकता दीड पटीपर्यंत वाढली आहे. त्यामुळे ही आवक वाढली आहे. पोळ कांद्यानंतर लगेचच उन्हाळ कांदा सुरू होईल. या स्थितीत कांद्याचे सध्याचेच दर अजून महिनाभर तरी राहतील.

यंदा लागवडीचाही खर्च फिटत नसल्याने कांदा उत्पादक मोठ्या संकटातून जात आहेत. कमाल दर ६०० पर्यंत दाखवला जात आहे. मात्र तो क्वचित एखाद्या शेतकऱ्याला मिळत आहे. त्यामुळे हताश शेतकरी आता शेतातील कांदा पेटवून देत आहे. शासन मात्र याची कोणतीही दखल घेत नाही.
-संतू पाटील झांबरे, कांदा उत्पादक, येवला 
 
About Us | Contact Us | Advertise With Us | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: