Last Update:
 
मुख्य पान

अडत बंद; वसुली सुरूच
-
Friday, February 17, 2017 AT 06:00 AM (IST)
Tags: nashik,   maharashtra,   farmers
 - नाशिक बाजार समितीतील चित्र, शेतकरी त्रस्त
- दररोज बेहिशेबी लाखो रुपयांची सर्रास होते लूट
- अडत कार्यालयातून परस्पर वळवली जाते अडत


नाशिक - राज्य शासनाने धडक निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या मानेवरील अडतीचे जोखड हटविले आहे. मात्र, वर्षानुवर्षे शेतकऱ्यांकडून अडत वसुलीची सवय लागलेल्या बाजार समितीतील घटकांना हा निर्णय पचलेला दिसत नाही. नाशिक बाजार समितीत दररोज शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांकडून लाखो रुपयांची बेहिशेबी वसुली सर्रास केली जात अाहे. पणन खात्याने पुढाकार घेऊन ही लूट थांबवावी व कायदा मोडणाऱ्यांना पायबंद घालावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

शेतकऱ्यांच्या हिशेबपट्टीवर ‘अडत’ हा शब्द येणार नाही याची काळजी घेतली जाते. प्रत्यक्षात मात्र हफ्ता वसुलीसारखे शेतकऱ्याकडून १० टक्क्यांपेक्षा जास्त वसुली केली जात आहे. अडतबंदीचा निर्णय होऊनही मागील दीड महिन्यात शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची लूट नाशिक बाजार समितीत झाली आहे. वालपापडी विकली गेली. हिशेबपट्टीत अडत लिहिलेली नाही. मात्र, अडत्याने शेतकऱ्याच्या हातात रक्कम पडण्यापूर्वीच तब्बल १० टक्के अडत वसूल केली. यावर शेतकऱ्याने बाजार समितीत तक्रार नेल्यानंतर उलट अडत्यानेच शेतकऱ्याला धमकावून पुन्हा माझ्या अडतीत माल आणू नकोस, असे सुनावले. ही घटना नाशिक बाजार समितीत नुकतीच घडलीय. मात्र, ही घटना तशी नवीन नाही. हे तर नेहमीचच झालंय, असे बाजारात शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांनी सांगितले. हिशेबपट्टीवरून अडत शब्द काढला गेला असला, तरी अडत्यांकडून मात्र दररोज बेहिशेबी लाखो रुपये हफ्ता वसुली केल्यासारखे सर्रास लुटले जात आहेत.

तक्रार केल्यास धमकावण्याचा प्रकार
वालपापडी, घेवडा, गाजर असा प्रत्येक प्रकारचा भाजीपाला घेऊन येणारा शेतकरी सातत्याने वेठीस धरला जात आहे. त्याबाबत तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांची बाजारातील संघटित घटक कोंडी करीत असल्याने त्याबाबत कुणीच आवाज उठवत नसल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांकडून तक्रार येत नसल्याने सगळं काही आलबेल असल्याचेच बाजार समिती प्रशासनाकडून सांगितले जात आहे.

अडत्यांचेच वर्चस्व
नाशिक बाजार समितीत ठराविक अडतेच बाजार समिती चालवतात असे बोलले जाते. अडत्यांचाच बाजार समितीचे संचालक व प्रशासनावरही प्रभाव असल्याने त्यांच्या विरोधात कुणी जात नाही अशी स्थिती आहे. अडत ही खरेदीदार व्यापाऱ्यांकडूनच वसूल करावी असे बाजार समिती कायद्यातही आहे. मात्र, मागील ५६ वर्षे शेतकऱ्यांकडूनच वसुली करण्यात आली. याबाबत शेतकऱ्यांमधून अनेकदा आंदोलनेही झाली आहेत.

तेच अडते तेच व्यापारी..
बहुतांश अडतदार हेच व्यापारी आहेत. तसेच, अडत्याच्या घरातील व्यक्तीच व्यापारी असल्याने या निर्णयाचा भार पहिल्यांदाच अडते व व्यापाऱ्यांवर पडला. या स्थितीत अडत्यांनी सुरवातीपासून शासनाच्या निर्णयास विरोध सुरू केला. बाजार बंदचे हत्यारही उपसले. मात्र, राज्य शासनाने निर्णय मागे न घेतल्याने अडत्यांनी आता शेतकऱ्यांनाच वेठीस धरले आहे. हफ्ता वसुली केल्यासारखी वसुली केली जात असताना हिशेबपट्टीत मात्र त्याचा कोणताही उल्लेख नसल्याने तोंड दाबून बुक्‍क्‍याचा मार मिळत असल्याची तीव्र प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहे.

ठराविक अडत्यांच्याच ताब्यात सगळी बाजार समिती आहे. त्यांनीच वसुली केली तर तक्रार करायची तरी कुणाकडे? बाजार समितीकडे तक्रार घेऊन गेल्यावर उलट मलाच अडत्याने धमकावून उद्यापासून माझ्या अडतीत माल आणू नकोस म्हणून सुनावले. आम्ही शेतकरी आहोत का चोर आहोत, तेच कळत नाही.
- नाशिक बाजार समितीत माल घेऊन आलेला एक शेतकरी

संबंधित प्रकाराची नीट चौकशी करू. अडते व व्यापाऱ्यांना बोलावून त्यांना तंबी देतो. अडवणूक करणाऱ्या अडते व व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
- अरुण काळे, सचिव, नाशिक बाजार समिती

अडतबंदीच्या निर्णयाचा कोणताच फायदा शेतकऱ्याला झाला नाही. नाशिक बाजार समितीतील आता होणारी वसुली पाहता, पहिली अडत बरी होती, असं आता वाटायला लागलंय.
- नाशिक बाजार समितीत माल घेऊन आलेला एक शेतकरी 
 
About Us | Contact Us | Advertise With Us | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: