Last Update:
 
मुख्य पान

जिल्हा परिषदांसाठी उत्साहात मतदान
-
Friday, February 17, 2017 AT 05:45 AM (IST)
Tags: mumbai,   maharashtra,   election
- ११ हजार ९८९ उमेदवारांचे भवितव्य यंत्रात बंद
- पहिल्या टप्प्यात अपवाद वगळता मतदान शांततेत


मुंबई - मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्यातील १५ जिल्हा परिषदा आणि १६५ पंचायत समित्यांसाठी गुरुवारी (ता.१६) पहिल्या टप्प्यातील मतदान उत्साहात पार पडले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी ६० टक्के मतदान झाले होते. दुपारनंतर मतदानासाठी लागलेल्या रांगा पाहता मतदानात वाढ होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. पहिल्या टप्प्यात अनेक व्हीआयपी मतदारांनी आपापल्या मतदारसंघामध्ये मतदानाचा हक्क बजावला. विविध कारणांमुळे काही ठिकाणी ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घातला. अपवाद वगळता राज्यात इतरत्र शांततेत मतदान पार पडले.

जिल्हा परिषदांच्या ८५५ आणि १६५ पंचायत समित्यांच्या १,७१२ जागांसाठी ही निवडणूक झाली. एकूण ११ हजार ९८९ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. या ठिकाणी कोणाची सत्ता असणार याचा निर्णय येत्या २३ फेब्रुवारीला होणार आहे. पहिल्या टप्प्यातील हे मतदान अहमदनगर, औरंगाबाद, बीड, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, वर्धा, आणि यवतमाळ या पंधरा जिल्हा परिषदांसाठी झाले. तसेच या जिल्ह्यांमधील १६५ पंचायत समित्यांसाठीही या वेळी मतदान झाले. त्यासाठी २४ हजार मतदान केंद्रांची आणि ४८ हजार मतदान यंत्रांची व्यवस्था करण्यात आली होती. याठिकाणी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान सुरू झाले. सकाळच्या सत्रात राज्यात सर्वत्रच उत्साहात मतदान सुरू होते. दुपारनंतर पुन्हा एकदा चुरशीने मतदान होत असल्याचे दिसून येत होते. त्यानुसार सायंकाळी पाच वाजेपर्यंत राज्यात सरासरी ६० टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, मतदानाची वेळ सायंकाळी साडेपाचपर्यंतची असल्याने मतदानात मोठी वाढ होईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

गडचिरोली जिल्ह्यात मात्र सकाळी साडेसात ते दुपारी तीन वाजेपर्यंतच मतदानाची होती. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने दीड लाख कर्मचारी तैनात केले होते. मतदानावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने पोलिसांनी चोख बंदोबस्ताची व्यवस्था केली होती. गृहरक्षक दलाचे जवानही तैनात होते. आवश्यकतेनुसार राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्याही सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रांबाबत पुरेशी काळजी घेतली गेली होती.

दरम्यान, परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात भिडले. तसेच काही ठिकाणी विकासकामे आणि इतर मुद्यांवरून ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घातल्याचे दिसून आले. ठिकठिकाणच्या छाप्यात लाखो रुपयांचा दारूसाठाही जप्त करण्यात आला.

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप हे चारही प्रमुख पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले होतेच. त्याशिवाय अनेक ठिकाणी विविध स्थानिक आघाड्यांमुळे या निवडणुकीत चुरस दिसत होती. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह भाजपचे केंद्रीय मंत्री, भाजप-शिवसेनेचे मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, राज्यमंत्री, आमदार, खासदार विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते प्रचारात थेट उतरले होते. एकूणच या निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

दुसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी
राज्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांसाठी दोन टप्प्यांत मतदान होत आहे. दुसऱ्या टप्प्यात ११ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या ११८ पंचायत समित्यांसाठी मंगळवारी ता.२१ रोजी मतदान होणार आहे. याचदिवशी १० महानगरपालिकांसाठी सुद्धा मतदान होणार आहे. गडचिरोली जिल्हा परिषदेचा दोन्ही टप्प्यात समावेश असून दुसऱ्या टप्प्यात ४ पंचायत समित्या आणि त्यातील निवडणूक विभागांचा समावेश आहे. सर्वच ठिकाणची मतमोजणी गुरुवारी (ता.२३) फेब्रुवारी रोजी होणार आहे.

दिवसभरातील घडामोडी
- मंत्री पंकजा मुंडे, खा. डॉ. प्रीतम मुंडे यांच्यासह मुंडे कुटुंबीयांचे नाथ्रा येथे मतदान
- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथे बजावला मतदानाचा हक्क
- माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचीही सहकुटुंब मुक्ताईनगरात मतदानाला हजेरी
- मराठवाड्यातील १५ गावांचा मतदानावर बहिष्कार
- यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यात कळसा येथे मतदान केंद्राबाहेर हाणामारी
- भाजप कार्यकर्त्यांकडून काँग्रेसच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण
- कुर्ऱ्हेपानाचे (भुसावळ) येथे भाजप उमेदवार समर्थकांवर हल्ल्याचा प्रयत्न
- निवडणूक - मतदार याद्यांमध्ये घोळ, शिरसोली (जि. जळगाव) गावात काही मतदार मतदानापासून वंचित
- दिग्रस तालुक्यातील (जि. यवतमाळ) कळसा येथे निवडणूक मतदान केंद्राबाहेर हाणामारी. काँग्रेस कार्यकर्त्याला भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण
- पांगरमल ((जि. नगर) येथे बनावट दारूमुळे ७ जणांचा मृत्यू प्रकरण, ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार, मतदान केंद्रावर शुकशुकाट
- लातूरमध्ये काँग्रेस उमेदवाराच्या कॉलेजमध्ये सापडल्या दारूच्या बाटल्या

पाच वाजेपर्यंतचे सरासरी मतदान
विभाग--- टक्केवारी
मराठवाडा---
विदर्भ---
जळगाव---
नगर---
 
 
About Us | Contact Us | Advertise With Us | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: