Last Update:
 
मुख्य पान

तूर भिजली
-
Friday, March 17, 2017 AT 06:15 AM (IST)
-मराठवाडा, विदर्भात आर्द्रता वाढण्याचा धोका
-गारपीट, अवकाळी पावसाने शेतकरी चिंता‘तूर‘


औरंगाबाद  मराठवाड्यातील परभणी, लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यातील काही भागांत बुधवारी (ता. १५) अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली तूर भिजल्याचे समोर आले आहे. दिवसभरात थांबून-थांबून येत असलेल्या या पावसामुळे हवेतील आर्द्रता वाढली असून, ढगाळ वातावरणाचा तुरीवर परिणाम होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत. तसेच काही प्रमाणात भिजलेल्या तुरीच्या खरेदीचा प्रश्‍नही आता एेरणीवर येणार अाहे. 

चार जिल्ह्यांत अवकाळी पावसाने बुधवारी चांगलाच कहर केला. या पावसामुळे लातूर जिल्ह्यातील जवळपास सर्वच केंद्रांवर शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली एक ते दोन टक्‍के तूर भिजल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, परांडा, वाशी, उमरगा व लोहारा आदी केंद्रांवर विक्रीसाठी आलेली शेतकऱ्यांची तूर मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसामुळे भिजल्याची प्राथमिक माहिती आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई वगळता जवळपास सर्वच केंद्रांवर जवळपास ७५०० क्‍विंटल तूर भिजली आहे. यामध्ये खरेदी केलेल्या जवळपास तीन हजार क्‍विंटल, तर शेतकऱ्यांच्या जवळपास साडेचार हजार क्‍विंटल तुरीचा समावेश अाहे. किमान चारशे ते पाचशे पोती तूर पावसामुळे काही प्रमाणात भिजल्याचा अंदाज असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अंदाजामुळे मोठ्या नुकसानीपासून वाचविण्यात यश
हवामान खात्याच्या अंदाजामुळे तूर विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांना एकतर तूर विक्रीसाठी आणू नका किंवा आणली तर पाऊस आल्यास ती झाकून ठेवण्याची तजवीजही सोबत करून ठेवा, अशा सूचना उस्मानाबाद जिल्ह्यातील तूर खरेदी करणाऱ्या यंत्रणेच्या वतीने देण्यात आल्या होत्या. सोबतच बाजार समित्यांनाही विक्रीसाठी आणलेल्या व खरेदी केलेल्या मालाला आवश्‍यक त्या सुविधा पुरविण्याचे सूचित केले होते, अशी माहिती हमीदराने तूर खरेदी करणाऱ्या यंत्रणेतील सूत्रांनी दिली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तूर भिजण्यापासून वाचविण्यात यश आल्याचे सूत्रांचे म्हणने आहे.

दृष्टिक्षेपात
-उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वच केंद्रांवर सुमारे तीन ते चार हजार क्‍विंटल तूर आवश्‍यक ती तजवीज करूनही भिजण्यापासून वाचविता आली नाही.
-लातूर जिल्ह्यातील जवळपास सर्वच केंद्रांवर शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली एक ते दोन टक्‍के तूर भिजली.
-बीड जिल्ह्यातील गेवराई वगळता जवळपास सर्वच केंद्रांवर जवळपास ७५०० क्‍विंटल तूर भिजली आहे.
-नांदेड जिल्ह्यात पावसाचे वातावरण तयार झाले होते. परंतु पाऊस आला नाही. खबरदारी म्हणून यंत्रणेने खरेदी केलेला माल तातडीने वेअर हाउसला हलविण्यास सुरवात झाली आहे.
-जालना जिल्ह्यात पावसाची तुरळक सर आली, मात्र आधीच तयारी केल्यामुळे नुकसान झाले नाही. 
 
About Us | Contact Us | Advertise With Us | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: