Last Update:
 
मुख्य पान

डाळिंबाच्या समस्या शिवारातच अडकल्या
-
Saturday, March 18, 2017 AT 06:15 AM (IST)
Tags: solapur,   maharashtra,  fruit
उपायांद्वारे त्यांना बाहेरची वाट मिळणार कधी?
यंत्रणांची अनस्था संपणार कधी?


- तेलकट डाग, मर रोगांवर ठोस उपायांची गरज
- नव्या वाणावरील संशोधनही ‘प्रयोगा’तच
- निर्यातील अडथळे, प्रक्रिया उद्योगावर हवे काम
- उत्पादनाचा वाटा ५० टक्के, निर्यात अवघी पाच टक्के

सुदर्शन सुतार

सोलापूर : कोरडवाहू भागाचे अर्थकारण बदलणाऱ्या डाळिंब पिकातील समस्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. तेलकट डाग आणि मरसारख्या रोगावर कायमस्वरुपी उपाय मिळालेला नाही. प्रतिकारक्षम नव्या वाणाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. पण संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ अजूनही ‘प्रयोगा’तच आहेत. जगभरातील एकूण डाळिंब उत्पादनात ५० टक्के वाटा भारताचा आहे. पण निर्यात अवघी ५ टक्के होते. उत्पादनासह निर्यातीचा टक्का वाढणे आणि प्रक्रिया उद्योगात संधी शोधणे आवश्‍यक आहे. पण या सगळ्यासाठी यंत्रणांची अनास्था संपणार कधी? हा मूळ प्रश्‍न आहे.

भारतासह स्पेन, इराण, अफगाणिस्तान, इजिप्त, पाकिस्तान आणि अमेरिका हे प्रमुख डाळिंब उत्पादक देश आहेत. जगभरातील एकूण दहा लाख मेट्रिक टन डाळिंब उत्पादनामध्ये भारतात सुमारे पाच लाख मेट्रिक टनापर्यंत उत्पादन होते. डाळिंब उत्पादनातील आघाडीचा देश म्हणून भारताकडे पाहिले जाते. त्यातही महाराष्ट्राचे स्थान अव्वल आहे. सुमारे ८० टक्के उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होते. भारताचा प्रतिस्पर्धी असलेल्या स्पेन आणि इराणलाही उत्पादनामध्ये भारत मागे टाकतो आहे. पण अलीकडे उत्पादनातील ही आघाडी रोगराईमुळे खालावते की काय? अशी शंका निर्माण झाली आहे. वास्तविक, डाळिंबाच्या उत्पादनात पहिला क्रमांक असताना, निर्यातीत मात्र भारत मागे आहे. निर्यातीसाठी आवश्‍यक असणाऱ्या सोई-सुविधा, सवलती आणि प्रोत्साहनाचा अभाव हे याचे मुख्य कारण आहेच. पण डाळिंबाची गुणवत्ता हा मुद्दाही या निर्यातीतील अडसर ठरतो आहे. शिवाय डाळिंबाचे मूल्यवर्धन होण्यासाठी प्रक्रिया उद्योगात मोठी संधी आहे. पण त्यासाठी संबंधित यंत्रणा हलायला हव्यात, त्या जागच्या हलायलाच तयार नाहीत, असे आजचे चित्र आहे.

जमेची बाजू, पण वास्तव कठीण
देशात एक लाख तीस हजार हेक्टर क्षेत्र देशात आहे. त्यातील एक लाख हेक्‍टर क्षेत्र एकट्या महाराष्ट्राचे आहे. उर्वरित क्षेत्रात आंध्र प्रदेश, राजस्थान, गुजरात, कर्नाटक या राज्यांचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रातील जमीन आणि एकूण हवामान विशेषतः कोरडवाहू भागातील वातावरण डाळिंबाला पोषक असल्याने वर्षभर डाळिंब घेतले जाते, ही जमेची बाजू असताना डाळिंबातील तेलकट डाग आणि मरच्या समस्येमुळे अनेक भागांत डाळिंब बागा उखडल्या जात आहेत. अनेक वर्षांपासून मर आणि तेलकट डाग रोग डाळिंब बागांची पाठ सोडायला तयार नाही. शिवाय सलग दोन-तीन वर्षांच्या दुष्काळाचाही फटका बसला. साहजिकच, निर्यातीमध्ये सातत्य राखणे कठीण होते आहे. गेल्या काही वर्षांतील चढ-उतारावरून ते लक्षात येते.

संशोधन केंद्र ‘प्रयोगा'तच
तेलकट डाग आणि मरसारख्या रोगावरील दीर्घकालीन उपाय आणि नवीन वाण ही शेतकऱ्यांची सध्याची गरज आहे. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने सुपर भगवा वाण काढून आघाडी घेतली. पण फक्त डाळिंबावरील संशोधनासाठी सोलापुरात राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र उभारून आज बारा वर्षे लोटली. पण संशोधन केंद्र अजूनही ‘प्रयोगात'च आहे. वास्तविक, नवीन वाणांवरील संशोधन, कीड-रोगांवरील दीर्घकालीन उपाय, या मूलभूत समस्येवर केंद्राने सर्वाधिक लक्ष देण्याची गरज अाहे. शेतकऱ्यांशी थेट संवाद हा तर अभावानेच होतो आहे.

पुण्यात आज डाळिंब संघाचे वार्षिक अधिवेशन
अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक व संशोधन संघाचे वार्षिक अधिवेशन आणि राष्ट्रीय परिसंवादाचे आज (शनिवारी) पुण्यात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते उद्‌घाटन होत आहे. बाजार समितीतील निसर्ग मंगल कार्यालयात सकाळी दहा वाजता उद्‌घाटनाचा मुख्य कार्यक्रम होईल. राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर अध्यक्षस्थानी असतील. सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख, कृषी आयुक्त विकास देशमुख, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. के. पी. विश्‍वनाथा, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे संचालक डॉ. आर. के. पाल, जैन इरिगेशन सिस्टिमचे अध्यक्ष अशोक जैन, अपेडाचे डॉ. सी. बी. सिंह, कृषी पणन मंडळाचे सरव्यवस्थापक मिलिंद आकरे आदी मान्यवर या वेळी उपस्थित राहतील. या कार्यक्रमात डाळिंबाचे गुणवत्तापूर्ण उत्पादन घेणारे शेतकरी, उत्कृष्ट कामगिरी करणारे शास्त्रज्ञ, पत्रकार यांचा या वेळी सन्मान करण्यात येणार आहे. त्यानंतर दिवसभर आणि उद्या रविवारी (ता. १९) शेतकऱ्यांसाठी डाळिंबावरील तांत्रिक चर्चासत्रे होणार आहेत.
 
 
About Us | Contact Us | Advertise With Us | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: