Last Update:
 
मुख्य पान

'अवकाळी'ने 85 हजार हेक्‍टरवरील पिकांची हानी
- (प्रतिनिधी)
Monday, March 20, 2017 AT 01:36 PM (IST)
Tags: Agrowon,  Farming,  Hailstorm,  Pune
पुणे : राज्यात नुकत्याच झालेल्या वादळी पाऊस व गारपिटीमुळे 85 हजार हेक्‍टरवरील पिकांची हानी झाल्याचा आतापर्यंतचा प्राथमिक अंदाज आहे. पिकांच्या पंचनाम्याची कामे गावपातळीवर वेगाने सुरू झाली आहेत, अशी माहिती राज्याचे कृषी विस्तार संचालक डॉ. सु. ल. जाधव यांनी दिली. 

वादळी वारे, अवकाळी पाऊस, गारपीट अशा तीन बाबींमुळे काही जिल्ह्यांमधील पिकांची हानी झाली आहे. आम्हाला प्राप्त होत असलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आतापर्यंत 80 ते 85 हजार हेक्‍टरवरील पिकांना नैसर्गिक आपत्तीचा तडाखा बसलेला आहे. यात द्राक्ष, केळी, संत्रा या पिकांचादेखील समावेश आहे. 

उस्मानाबाद, बीड, परभणी, चंद्रपूर, सोलापूर, लातूर या जिल्ह्यांमधील अनेक गावांमध्ये नुकसान झालेले आहे. त्यापैकी लातूर व बीड जिल्ह्यांतील नुकसान अधिक आहे. रब्बी हंगामातील गहू, हरभरा व काही भागात ज्वारीचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. 

राज्याच्या काही भागांत गारपीट व अवकाळी पाऊस होण्याची शक्‍यता असल्याचे अंदाज आठवडाभर आधीच जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे काही गावांमध्ये शेतकऱ्यांनी काळजी घेतली होती. गव्हाची मळणी करून घेणे किंवा द्राक्ष, टरबूजावर आच्छादन टाकण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला; मात्र असे उपाय व्यापक क्षेत्रावर अशक्‍य असल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले आहे, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. 

2014 व 2015 मध्ये राज्यात गारपिटीमुळे नुकसान झाले होते. आता पुन्हा नुकसान झाल्यामुळे अवकाळी पावसासारखेच गारपिटीमुळे होणारे नुकसान ही नियमित बाब झाल्याचे दिसून येते. जागतिक तापमानवाढीमुळे गारपीट समस्येला भविष्यात सतत तोंड द्यावे लागेल, असेही कृषी विभागाला वाटते. 

दरम्यान, पंचनाम्याची कामे पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला अहवाल जातील. त्यानंतर राज्य शासनाकडून मदतीचा धोरणात्मक निर्णय जाहीर होईल. यासाठी अनेक दिवसांचा कालावधी लागेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा पंचनामा करून घ्यावा, असे कृषी विभागाने नमूद केले आहे.


 
 
About Us | Contact Us | Advertise With Us | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: