Last Update:
 
ऍग्रो मार्केट

हरभऱ्याची आवक सुरू
- (प्रतिनिधी)
Monday, March 20, 2017 AT 01:49 PM (IST)
Tags: Agrowon,  Farming,  Agro Money
राज्यात नवीन हरभऱ्याची आवक वेगाने वाढत आहे. चांगल्या मालाची भावपातळी प्रतिक्विंटल पाच हजार रुपयांच्या आसपास आहे. कृषी खात्याच्या आकडेवारीनुसार राज्यातील हरभरा पेरा १४ लाख हेक्टरवरून यंदा १८ लाख हेक्टरपर्यंत गेला आहे. 

लातूर मार्केटला मार्चच्या पहिल्याच आठवड्यात दररोज १०-१५ हजार क्विंटल हरभऱ्याची आवक झाली. ४७०० ते ४८०० रुपये प्रतिक्विंटल या पातळीवर भाव राहिला. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात हरभरा काढणीने वेग घेतल्यामुळे दररोज २० हजार क्विंटलच्या पुढे आवक गेली. अकोला मार्केटला सध्या दोन ते अडीच हजार क्विंटल माल येत असून, भावपातळी ४६०० रुपये ते ४९०० रुपयांपर्यंत आहे. स्टॉकिस्ट मंडळींनी यंदा चांगला स्टॉक केला असून, त्यांना पुढे भाव वाढण्याची आशा आहे. आता फक्त राजस्थान व मध्य प्रदेशातील मालाचा अंदाज येणे बाकी आहे. हा अंदाज लक्षात आल्यानंतर मिल उद्योगाची मागणी स्थिरावेल व त्यानंतर भावपातळीचा अंदाज येईल. 

राजस्थान आणि मध्य प्रदेश येथून अजून माल विक्रीसाठी सुरू झालेला नाही. त्यामुळे उत्तर भारत आणि दक्षिणेतील मिल उद्योगाला महाराष्ट्राच्या मालावर अवलंबून राहावे लागत आहे. दिल्लीत प्रतिक्विंटल ५५०० रुपये दराने हरभरा आणि ६५०० ते ६८०० रुपये प्रतिक्विंटल दराने चनाडाळ विकली जात आहे. उत्तर भारतातील हरभरा उत्पादक पट्ट्यातून नवीन मालाचा पुरवठा होत नसल्यामुळेच चनाडाळ अजूनही तेजीत आहे. त्यामुळे मिल उद्योगातून मागणी टिकून आहे, असे सूत्रांनी सांगितले. राजस्थान व मध्य प्रदेशात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत पीक चांगले आहे. राजस्थानातून नवा माल बाजारात येण्यास अजूनही दोन आठवडे लागतील. तेथे स्टॉकमध्येदेखील जुना माल नाही. त्यामुळे नवीन हरभऱ्याचे भाव किमान ४५०० रुपये प्रतिक्विंटल निघतील, अशी व्यापाऱ्यांची अटकळ आहे. 

मिल उद्योगातून सध्या चनाडाळीचा होणारा पुरवठा बघता महाराष्ट्रातील हरभऱ्यापासून तयार केलेल्या चनाडाळीची विक्री पुणे भागात ६४ ते ६६ रुपये प्रतिकिलोने सुरू आहे. इंदोर चनाडाळ ७० रुपयांपर्यंत विकली जात आहे. सध्याच्या स्थितीत ५५ रुपयांच्या खाली चनाडाळ विकली जाणार नाही, असा जाणकारांचा अंदाज आहे.


 
 
About Us | Contact Us | Advertise With Us | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: