Last Update:
 
मुख्य पान

कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करा
-
Tuesday, March 21, 2017 AT 06:00 AM (IST)
संसदेत कॉंग्रेसची मागणी, महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यांबाबत चिंता व्यक्त

नवी दिल्ली - गेल्या काही वर्षांत हवामान बदलाचा शेती क्षेत्राला फटका बसला आहे. तसेच सततच्या दुष्काळाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले अाहे. यामुळे देशभरात शेतकरी आत्महत्या होत आहेत. महाराष्ट्रात तर गेल्या दोन महिन्यांत ११७ शेतकऱ्यांनी जीवन संपविले आहे. ही अतिशय चिंताजनक बाब असून, शेतीमालाला रास्त दर मिळत नसल्याचा हा परिणाम आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी केंद्र सरकारने उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीवेळी दिलेले शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करावे, अशी आग्रही मागणी सोमवारी (ता. २०) संसदेच्या दोन्ही सदनात कॉंग्रेसच्या सदस्यांनी केली.

लोकसभेत २०१६-१७ साठी पूरक मागण्यांच्या निधीसाठी चर्चा करतेवेळी कॉंग्रेसचे खासदार के. सी. वेणूगोपाल म्हणाले, की देशातील अनेक राज्य दुष्काळाच्या विळख्यात अडकली आहेत. हवामान बदलाचा फटकाही शेतीला बसला असून, पीक उत्पादकतेवरही प्रतिकूल परिणाम झाला आहे. या कठीण काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीवेळी केंद्र सरकारने शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. शेतकरी हितासाठी आता ते आश्वासन केंद्राने पूर्ण करणे आवश्यक असून, देशातील सर्व शेतकऱ्यांचे कृषीकर्ज माफ केले पाहिजे.

राज्यसभेत शून्‍य प्रहरावेळी यासंदर्भात मुद्दा उपस्थित करताना कॉंग्रेसचे प्रमोद तिवारी म्हणाले, की चालू वर्षात महाराष्ट्रात ११७ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे. सातत्याने दुष्काळी स्थिती आणि शेतीमालास रास्त भाव नसणे ही त्यामागची कारणे आहेत. राज्य सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात येईल असे म्हटले होते. मात्र त्यादृष्टीने अद्याप काहीही पावले उचलली गेली नाहीत. उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे सरकार आल्यास पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत याविषयी निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. येथे मंत्रिमंडळाची पहिली बैठक होऊनही कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आलेला नाही.

कॉंग्रेसच्या रजनी पाटील यांनीही शेतकरी आत्महत्या आणि कर्जमाफीचा प्रश्न उपस्थित केला.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान दिलेल्या शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन सरकारने पूर्ण करावे. शेतकऱ्यांच्या हिताच्या उपाययोजना करण्यावर सरकारने भर द्यायला हवा.
-के. सी. वेणूगोपाल, कॉंग्रेसचे खासदार, लोकसभा

महाराष्ट्रातील ११७ शेतकरी आत्महत्यांपैकी ४६ प्रकरणात भरपाई देण्यात आली आहे. तर ५८ प्रकरणांवर विचार सुरू असून १३ प्रकरणे भरपाईपासून खारीज करण्यात आली आहेत. राज्य सरकार कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करण्यात अयशस्वी झाली आहे.
-प्रमोद तिवारी, कॉंग्रेसचे खासदार, राज्यसभा 
 
About Us | Contact Us | Advertise With Us | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: