Last Update:
 
मुख्य पान

पशुपालनातून अधिक सक्षमतेसाठी सखोल योजना : जानकर
-
Tuesday, March 21, 2017 AT 05:45 AM (IST)
Tags: pune,   maharashtra,   farmers
पुणे - पशुधन विकासातून शेतकऱ्यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढू शकते. पशुपालनातून शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्यासाठी मागेल त्याला पाेल्ट्री शेड, मत्स्यबीज आणि शेळ्या- मेंढ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांना या याेजनेचा लाभ मिळण्यासाठी सखाेल याेजना आखण्यात येत आहे, अशी माहिती राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी दिली.

अहिल्यादेवी शेळी- मेंढी महामंडळाची साेमवारी (ता. २०) आढावा बैठक झाली. या वेळी पशुसंवर्धन आयुक्त कांतीलाल उमाप, शेळी- मेंढी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय परकाळे उपस्थित हाेते. या वेळी मंत्री जानकर यांनी पशुसंवर्धन विभागाच्या विविध प्रस्तावित याेजनांची माहिती दिली.

श्री. जानकर म्हणाले, की शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी पशुधन संगाेपन हमखास व्यवसाय आहे. शेतकऱ्यांना पशुधन सांभाळण्यासाठी सवलती देण्यात येणार आहेत. पशुधनामध्ये केवळ गाय, म्हैस, शेळ्या, बकऱ्या, पाेल्ट्री यांचा विचार केला जाताे. मात्र, मत्स्यपालन हा वेगाने वाढणारा व्यवसाय असून, शेततळे असणाऱ्या शेतकऱ्यांना मत्स्यबीज, पाेल्ट्री शेड आणि शेळ्या-मेंढ्या देण्याची प्रभावी याेजना पशुसंवर्धन विभागाच्या वतीने आखण्यात येत आहे. याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लवकरच ही याेजना जाहीर करण्यात येईल. या याेजनेमध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्राेत्साहन देण्यासाठीची तरतूद करण्यात येणार आहे.

पशुखाद्याबाबत महामंडळ स्वयंपूर्ण करण्यासाठी महामंडळाच्या वतीने पशुखाद्य कंपनी स्थापन करण्यात येणार आहे. विविध पशुधनाच्या खाद्यनिर्मितीबाबत उद्याेगमंत्री देसाई यांच्याशी चर्चा झाली अाहे. महामंडळाकडे माेठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध आहे. या जागेवर पशुखाद्याचा कारखाना उभारण्यात येणार आहे, असेही जानकर यांनी स्पष्ट केले.

राज्यासह परराज्यांतील शेतकरी आणि पशुपालकांना पशुपालनाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी दहीवडी, पडेगाव आणि पाेहरा या तीन ठिकाणी मॉडेल फार्म उभारण्यात येणार आहे. या मॉडेलमधून राज्याचा पॅटर्न ठरला पाहिजे, अशा सूचनादेखील अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. 
 
About Us | Contact Us | Advertise With Us | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: