Last Update:
 
मुख्य पान

खत खरेदीसाठी आधार अंगठाच
-
Tuesday, April 18, 2017 AT 06:00 AM (IST)
Tags: pune,   maharashtra,   farmers
राज्यात एक जूनपासून पॉस मशिनद्वारे खते विक्री

पुणे - राज्यात एक जूनपासून शेतकऱ्यांना रासायानिक खतांची विक्री पॉस (पॉइंट ऑफ सेल) मशिनच्या माध्यमातून करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. आधार क्रमांक असलेल्या शेतकऱ्याच्या अंगठ्याचा ठसा पॉस मशिनवर घेतल्याशिवाय कोणत्याही कंपनीला अनुदान मिळणार नाही, अशी भूमिका शासनाने घेतली आहे.

शेतकऱ्याच्या नावाखाली कंपन्यांकडून खत विक्रीत होणारी अनागोंदी थांबविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ‘राज्यातील सर्व शेतकऱ्यांना एक जूनपासून पॉस मशिनच्या माध्यमातूनच खताची विक्री होईल. शेतकऱ्यांच्या ताब्यात खताची गोणी गेल्याशिवाय कोणत्याही कंपनीला अनुदान मिळणार नाही. कंपन्यांकडून राज्यात १९ हजार ३६६ खत विक्रेत्यांना पॉस मशिन दिल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक गोणीचा हिशेब सरकारला मिळणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

राज्यात नाशिक व रायगड जिल्ह्यात आधार संलग्न पॉस मशिनवर खत विक्रीचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात आला होता. कृषी खात्याचे प्रधान सचिव विजयकुमार यांनी या योजनेची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे चालू खरिपात राज्यात ३२ लाख टन खतांची विक्री या मशिनच्या माध्यमातून होईल.

खत उत्पादक कंपन्यांना यापूर्वी रेल्वे रेकने खत पोचते केल्यानंतर ८५ टक्के अनुदान लगेच मिळत होते. खताचा रेक पोचला; पण या रेकमधले खत शेतकऱ्यांना मिळाले की नाही याची तपासणी न करताच अनुदानवाटप केले जात होते. सरकारने ही पद्धत आता आधार संलग्न पॉस मशिनच्या साहाय्याने बंद केली आहे. खत दुकानदाराकडे शेतकरी गेल्यानंतर त्याने मागितलेल्या खताची नोंद पॉस मशिनमध्ये केली जाईल, त्यानंतर शेतकऱ्याच्या अंगठ्याचा ठसा घेतला जाईल. मशिनमधून स्लीप बाहेर आल्यानंतर शेतकऱ्याला खताची विक्री होणार आहे. ‘विकलेल्या खताची नोंद त्वरित संबंधित कंपनी व शासनाच्या सर्व्हरवर होईल. त्यामुळे शेतकऱ्याच्या आधार संलग्न क्रमांकावर विकल्या गेलेल्या खतापुरतेच अनुदानवाटप होईल,’ असे सूत्रांनी स्पष्ट केले.

मशिनवर फक्त वाटपाचीच नोंद
खत विक्रीची अचूक नोंद ठेवण्यापुरताच वापर पॉस मशिनचा होणार आहे. या मशिनचा संबंध आर्थिक व्यवहाराशी नसेल. शेतकऱ्याला खताची विक्री उधारीत केलेली असो की रोखीत केलेली असो; फक्त वाटपाचीच नोंद पॉस मशिनवर होणार आहे. या मशिनवर नोंद व शेतकऱ्याचा अंगठा न घेतल्यास कंपनीला अनुदान मिळणारच नाही, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

पॉस मशिनवर आधारित खत वितरणाला राज्यातील सर्व विक्रेत्यांनी पाठिंबा दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांचा फायदाच होणार आहे. मशिनचा खर्च देखील कंपन्याच करीत असल्यामुळे विक्रेत्यांना आक्षेप असण्याचे काहीच कारण नाही. उलट विक्रीच्या नोंदीत पारदर्शकता येईल.
- प्रकाश कवडे, अध्यक्ष, महाराष्ट्र ॲग्रो इनपुट ॲण्ड फर्टिलायझर्स डीलर असोसिएशन 
 
About Us | Contact Us | Advertise With Us | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: