Last Update:
 
मुख्य पान

कमाल तापमानाने राज्यात गाठला उच्चांक
-
Wednesday, April 19, 2017 AT 04:15 AM (IST)
Tags: pune,   maharashtra,   tempreture
चंद्रपूरचा पारा ४५.९ अंशांवर

पुणे - राज्यात गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे कमाल तापमानाने उच्चांक गाठला आहे. मंगळवारी (ता. १८) चंद्रपूर येथे ४५.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. येत्या शनिवारपर्यत (ता. २२) राज्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज असल्याचे पुणे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

सध्या गोव्यासह, संपूर्ण राज्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. आजपासून राज्यात आकाश मुख्यत निरभ्र राहण्याची शक्यता आहे. राज्यात कोरडे वातावरण असल्याने कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत चार अंशांपर्यंत वाढ झाली आहे.

विदर्भ तापला - 
गेल्या चोवीस तासामध्ये विदर्भातील बहुतांशी भागात उष्णेतेची लाट असल्याने विदर्भातील सर्वच प्रमुख शहरांचा पारा ४५.९ अंशांपर्यंत पोचला. त्यामुळे चंद्रपूर येथे तापमानाने उच्चांक गाठला आहे. त्यापाठोपाठ अकोला येथे ४४.८ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. उर्वरित अमरावती ४४.२, गोंदिया ४३.५, नागपूर ४४.०, ब्रह्मपुरी ४४.२, वर्धा ४४.५, परभणी ४४.०, यवतमाळमध्ये ४३.० अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.

मराठवाडा ४१ अंशांजवळ - 
मराठवाड्याला उष्णतेच्या लाटेचा परिणाम झाल्याने काही प्रमाणात तापमान वाढले आहे. सध्या मराठवाड्यातील बीड येथे ४३.४ अंश सेल्सिअस तापमान होते. औरंगाबाद येथे ४१.६, बुलडाणा ४१.३ अंश सेल्सिअस तापमान होते. पुढील चार ते पाच दिवसांत येथील कमाल तापमानात काही प्रमाणात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्राच उष्णता वाढणार - 
राज्यात कोरडे हवामान राहणार असल्याने पुन्हा मध्य महाराष्ट्र उष्णतेने तापणार असल्याचा अंदाज हवामान विभागाचा आहे. मध्य महाराष्ट्रातील जळगाव येथे ४४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद मंगळवारी झाली. तर महाबळेश्वरमध्ये सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली आहे. येथे कमाल तापमान ३४.२ अंशांवर होते. मालेगामध्ये ४२.२, नाशिक ३९.२, पुणे ३९.४, सातारा ४०.७, कोल्हापूर ३५.८, सांगलीमध्ये ३९.० अंश सेल्सिअस तापमान होते.

रत्नागिरीत सर्वांत कमी तापमान - 
कोकणात सर्वांत कमी कमाल तापमान असल्याची नोंद रत्नागिरीमध्ये झाली आहे. येथे सरासरी ३२.१ अंश सेल्सिअस तापमान होते. मुंबईजवळ असलेल्या सांताक्रूझमध्ये ३३.१ अंश सेल्सिअसची नोंद झाली. त्यापाठोपाठ मुंबई (कुलाबा) येथे ३४.१, अलिबाग ३४.५, डहाणू ३४.८ अंश सेल्सिअस तापमान होते. 
 
About Us | Contact Us | Advertise With Us | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: