Last Update:
 
मुख्य पान

हुर्रेऽऽ मॉन्सून ९६ टक्क्यांपर्यंत
-
Wednesday, April 19, 2017 AT 06:15 AM (IST)
Tags: new delhi,   mhaharashtra,   rain
भारतीय हवामान विभागाचा अंदाज, पाऊस राहणार सरासरीएवढा

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून उष्णतेने होरपळणाऱ्या नागरिकांसाठी आणि शेतीसाठी भारतीय हवामान विभागाने दिलासादायक घोषणा केली आहे. यंदा मॉन्सून सरासरीएवढा राहणार अाहे, तसेच पावसाचे प्रमाण ९६ टक्क्यांपर्यंत राहील, असा पहिला अंदाज मंगळवारी (ता. १८) आयएमडीचे महासंचालक के. जे. रमेश यांनी जाहीर केला आहे.

सरासरी १ जूनला मॉन्सून केरळात दाखल होतो, यानंतर ७ जूनला तो महाराष्ट्रात व १५ जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापून उत्तर भारताकडे मार्गक्रमण करत असतो. मॉन्सूनचे परतणेसुद्धा वेळेतच होण्याचे संकेतही मिळाले अाहेत. मंगळवारी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत याविषयी माहिती देताना रमेश म्हणाले, की तूर्त अल निनोचा प्रभाव जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर काळात राहणार नसल्याने पाऊसकाळ सुरळित पार पडण्याची आशा आहे. देशाच्या एकूण वार्षिक पावसात ७० टक्के वाटा हा एकट्या मॉन्सूनचा (नैर्ऋत्य मोसमी वारे) अाहे.

देशात एकूण लोकसंख्येपैकी ६८ टक्के लोकसंख्या ही ग्रामीण भागामध्ये असून, एकूण मनुष्यबळापैकी निम्मे मनुष्यबळ हे रोजगारासाठी कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. यादृष्टीने मॉन्सून हा भारतीय शेतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरतो. गेल्या वर्षी देशात ९७ टक्क्यांपर्यंत पाऊस झाला होता. यंदाही सरासरीएवढ्या पावसाचा अंदाज व्यक्त झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

यंदा सरासरीएवढा पाऊस होणार असून पूर्व भागांमध्ये पावसाचे प्रमाण समाधानकारक राहणार आहे. देशाची अर्थव्यवस्था आणि शेतीसाठी हा पाऊस पूरक ठरेल अशी आशा आहे.
-के. जे. रमेश, महासंचालक, भारतीय हवामान विभाग 
 
About Us | Contact Us | Advertise With Us | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: