Last Update:
 
मुख्य पान

तीन लाख महिलांना उद्योगासाठी प्रशिक्षण देणार
-
Friday, April 21, 2017 AT 06:00 AM (IST)
Tags: mumbai,   maharashtra,   farmers
मुंबई : राज्यातील तीन लाख महिलांना `अन्नपूर्णा` उपक्रमाच्या माध्यमातून उद्योजिका म्हणून घडविले जाईल. त्यांनी तयार केलेले पदार्थ उत्तमच असतील, असा विश्वास व्यक्त करत या पदार्थांना जगभरात बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन `सकाळ माध्यम समूहा`चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी गुरुवारी (ता. २०) येथे दिले. अन्नधान्याच्या किमती वाढल्या म्हणून तक्रार करण्याऐवजी उद्योजक बनणे हेच उत्तम असल्याचे त्यांनी या वेळी आवर्जून सांगितले. 

तनिष्का अधिवेशनात `अन्नपूर्णा` उपक्रमाची घोषणा करण्यात आली. `पॅलेडियम` या सल्लागार समूहाच्या मदतीने `डिलिव्हरिंग चेंज फोरम`च्या (डीसीएफ) वतीने हा उपक्रम राज्यात राबविण्यात येणार आहे. या वेळी पॅलेडियमच्या कतार येथील संचालक बार्बरा स्टॅनकोविकोवा, भाजपच्या प्रवक्त्या व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सल्लागार श्वेता शालिनी, डीसीएफचे वरिष्ठ अधिकारी गौरव डाकर उपस्थित होते. `अन्नपूर्णा` उपक्रमातून सुरवातील तीन लाख महिलांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यभर हा उपक्रम राबविला जाईल. 

अभिजित पवार म्हणाले, की स्थानिक विशेष पदार्थांची निवड करून त्यासाठी बाजारपेठ कशी मिळवायची, पॅकेजिंग, मार्केटिंगसाठी खर्चाची तयारी कशी करायची याचा निर्णय या उपक्रमात घेण्यात येईल. आपण अन्नधान्याला किंमत देत नाही. अनावश्यक गोष्टी महागात घेतो. कांदे महाग झाले म्हणून तक्रार करण्यापेक्षा उद्योजक होऊन स्वतःचे उत्पन्न वाढवण्यावर भर दिला पाहिजे. पगार वाढत नसेल तर उद्योग करायला काय हरकत आहे, असा प्रश्न उपस्थित करून पवार यांनी महिलांना उद्योजक होण्याचे महत्त्व पटवून दिले. 

बार्बरा स्टेनकोविकोवा यांनी या उपक्रमाची माहिती देताना सांगितले, की महाराष्ट्रातील उत्पादन या उपक्रमांतर्गत तयार केले जातील. त्यात दर्जा आणि अन्नसुरक्षेवर भर दिला जाईल. लोकल इकोसिस्टिमला पूरक उद्योग निर्माण केले जातील. महिलांचा विकास, त्यांच्यात उद्योजकतेची ऊर्जा निर्माण करण्यावर यातून भर देण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या. 

महिलांना स्वयंसिद्ध करून कुटुंबाचे राहणीमान उंचावणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. दक्षिण अमेरिकेतही येथील पदार्थ पाठवण्यात येतील. इतर देशांमध्येही या वस्तू पाठवण्याचा प्रयत्न असेल. यासाठी `नायके` कंपनीने मदतीचे आश्वासन दिले आहे. अमेरिका, यू.के. आणि ऑस्ट्रेलियातील सरकारकडूनही मदत केली जाते. यंत्राच्या साह्याने बनवलेल्या उत्पादनापेक्षा हाताने बनवलेल्या उत्पादनाला जगात अधिक मागणी आणि किंमत आहे, मात्र भारतात उलटे चित्र आहे. आपण हाताने बनवलेले पदार्थ जगभर पाठवू, असा विश्वास या वेळी अभिजित पवार यांनी व्यक्त केला. राज्याच्या विभागानुसार तेथे उत्पादित होऊ शकणाऱ्या पदार्थांची यादी तयार करण्यात आली. त्याचे या वेळी सादरीकरण झाले. हा धागा पकडून श्वेता शालिनी म्हणाल्या, की हाताने बनवलेल्या पदार्थांच्या दर्जाबाबत संशय घेतला जातो, पण त्याच्या पाकिटावर सुरक्षेची हमी दिली गेली तर त्या पदार्थांना चांगली किंमत मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्या म्हणाल्या, की भारत हा पिरॅमिडसारखा देश आहे. टोकाला १० टक्के, मधल्या भागात ३० टक्के आणि सर्वात खालच्या स्तरावर ६० टक्के नागरिक आहेत. या प्रत्येकाला विचारात घेऊन पदार्थ तयार करायला हवेत, त्यांचे ब्रँडिंग व्हायला हवे. त्यातून नक्कीच यश मिळेल.

समाजाच्या हितासाठी सरकारची मदत घ्यायला हरकत नाही. सरकारने आपल्याला मदत करण्याची तयारी दाखवली आहे. यातून आरोग्यदायी उत्पादने तयार केली जातील. सहावी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वविकासासाठी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यानंतर पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम राबविला जाईल. गुगलसोबत करार करून महिलांसाठी एक उपक्रम राबविण्यात येईल. त्याची सुरवात मेच्या अखेरपर्यंत होईल.
- अभिजित पवार,
व्यवस्थापकीय संचालक, सकाळ माध्यम समूह

महिलांना स्वयंसिद्ध बनविण्यासाठी मार्ग दाखविण्याचे काम केले जाणार आहे. त्यासाठी योग्य प्रशिक्षण देऊन तीन-चार महिन्यांत महिलांनी तयार केलेल्या पदार्थांना बाजारपेठ निर्माण करून देण्यात येईल. यासाठी तज्ज्ञांची मदत घेऊन यातील सर्व अडचणी सोडवल्या जातील.
- बार्बरा स्टॅनकोविकोवा,
संचालक, पॅलेडियम, कतार

पुढील १५ वर्षे देशासाठी महत्त्वाची आहेत. या काळात अधिक वेगाने प्रगती करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. समाजहितासाठीच्या सूचनांचे नेहमीच स्वागत केले जाते. महिलांच्या सक्षमीकरणावर भर आहेच. त्यासाठी नक्कीच अधिक प्रयत्न करू.
- श्वेता शालिनी,
मुख्यमंत्र्यांच्या सल्लागार 
 
About Us | Contact Us | Advertise With Us | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: