Last Update:
 
मुख्य पान

शुभेच्छांच्या वर्षात "ऍग्रोवन'चा वर्धापन दिन साजरा
-
Friday, April 21, 2017 AT 06:15 AM (IST)
Tags: pune,   maharashtra,   farmers,   growon
- राज्यभर "कृषी ज्ञान जागरा'द्वारे तपपूर्ती साजरी

पुणे - देशविदेशातील कृषिविषयक घडामोडींसह कोरडवाहू शेतीपासून ते हरितगृहातील निर्यातक्षम शेतीमधील तंत्र, कौशल्य, धोरणात्मक माहिती पुरवत दीपस्तंभासमान कार्य करणाऱ्या "ऍग्रोवन'चा वर्धापन दिन उत्साहात पार पडला. दूरध्वनी, फॅक्‍स, ई-मेल या संपर्क माध्यमांसह समाजमाध्यमातील ट्‌विटर, व्हॉट्‌सअप, फेसबुकवर ऍग्रोवनच्या वाचकांनी शुभेच्छांचा वर्षाव झाला. बाराव्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील विविध गावांमध्ये पीकनिहाय चर्चासत्रांचे "कृषी जागर' मेळावे घेत ऍग्रोवनने तपपूर्ती साजरी केली.

ऍग्रोवनकडून आपल्या बारा वर्षांचा प्रवासात शेतकऱ्यांसाठी कृषिविषयक 70 हजार पानांपेक्षा जादा माहितीची निर्मिती करण्याची कामगिरी झाली आहे. शेतकऱ्यांना समृद्धीच्या शिवारात पोचविण्यासाठी माहिती, प्रदर्शने, मेळावे, परिसंवाद, प्रशिक्षण शिबिरे अशा विविध माध्यमातून ऍग्रोवनची टीम झटते आहे. तोच धागा पकडून वर्धापन दिनाच्या निमित्ताने ऍग्रोवनला राज्यभरातून भरभरून शुभेच्छा मिळत होत्या.

कृषी क्षेत्रातील अभ्यासक, लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकारी, कृषी विद्यापीठांमधील शास्त्रज्ञ, खते-बियाणे-कीडनाशक उत्पादक कंपन्यांमधील प्रतिनिधी तसेच कृषी उद्योग क्षेत्रातील अधिकारी आणि सर्वांत महत्त्वाचा ठरलेल्या शेतकरी राजाच्या गावागावांतून ऍग्रोवन परिवाराला शुभेच्छा मिळत होत्या. आमचा गाव, आमचा शिवार समृद्ध करण्यासाठी ऍग्रोवनकडून पुरविली जाणारी माहिती लाखमोलाची ठरली, अशा शब्दांत काही शेतकऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

माजी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, एकनाथ खडसे आदींनी ट्‌विटरवरून ऍग्रोवनला शुभेच्छा दिल्या. राज्यभरात तपपूर्तीच्या निमित्ताने झालेल्या मेळाव्यांमध्ये देखील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे ऍग्रोवनचा गौरव केला. तपपूर्ती निमित्ताने सातारा जिल्ह्यात झालेल्या ऍग्रोवनच्या कार्यक्रमात एका शेतकऱ्याने, "मी शेतकरी कुटुंबातून शिकून चांगला पगार घेणारा शिक्षक बनलो. मात्र नोकरीपेक्षा शेती फायद्याची असल्याचे सांगणारा ऍग्रोवन माझा प्रेरणास्थान बनला. मी नोकरीचा राजीनामा देऊन आज पूर्णवेळ शेतकरी बनलो आहे.'

कृषी पत्रकारितेच्या माध्यमातून यशस्वी वर्तमानपत्र चालविण्याबरोबरच शेतकऱ्यांसाठी कायम शास्त्रज्ञ व तज्ज्ञांना बांधावर नेण्याची भूमिका ठेवणारे ऍग्रोवन हे देशातील एकमेव वर्तमान ठरले आहे. नाशिक, नगर, सोलापूर, औरंगाबाद, जळगाव, सांगली, पुणे, सातारा, कोल्हापूर, अमरावती, यवतमाळ, नांदेड जिल्ह्यांमध्ये 12 कार्यक्रम ऍग्रोवनकडून घेण्यात आले. विविध तज्ज्ञ, शास्ज्ञज्ञ, कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी या वेळी शेतकऱ्यांशी हितगुज केले. 


 
 
About Us | Contact Us | Advertise With Us | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: