Last Update:
 
Search Tag:     Section:  
 
  From Date:     To Date:    
Total Results: 95
पंचायतीत बसलो आहे. दुपारची वेळ आहे. निवडून आलो आहे. वडील तीन वेळा हरले आहेत. मी पहिल्यांदाच निवडून आलो. सर्वांत तरुण आहे. पदवीधर आहे. गावात दोन गट आहेत. हे गट परंपरेने चालत आले आहेत. गावातील प्रत्येक घर कुठल्या गटात आहे, हे डोळे मिटून कोणीही सांगेल, अशी परिस्थिती होती. ही गटबाजी घराणेशाहीतून वाटचाल करीत आली आहे. प्रत्येक जातही या गटबाजीत सामील आहे. गावात अशी परिस्थिती होती, की तुम्ही कुठल्यातरी एका गटात असला पाहिजे. कोणतंही काम असेल तर पहिल्यांदा हा इसम कोणत्या गटात आहे, हेच बघितलं जात होतं. यात कोणालाही वावगं वाटत नाही. याचं कारण याची सवय झाली आहे. एखाद्या गोष्टीची सवय झाली म्हणजे ती अंगवळणी पडते. अंगवळणी पडलेली गोष्ट नैतिक आहे, असंच वाटतं. अशा सगळ्या परिस्थितीमुळे गावातील वातावरण गढूळ बनलं आहे. या गढूळ वातावरणातून कोणी गावाला बाहेर काढेल, असं कुणी स्वप्नही पाहिलं नव्हतं. स्वप्न तरी कसं काय पाहणार? कारण जे मनी वसे तेच स्वप्नी दिसे. जर मनातच आलं नाही, तर स्वप्नात तरी कसं काय दिसणार? स्वप्न हा भास आहे. गावात दोन गट असणं हे मोठ्या नेत्यांना फायद्याचं असतं.
Wednesday, June 19, 2013 AT 05:15 AM (IST)
घरात बसलो होतो. सगळे रानात गेले होते. आता पूर्वीसारखं काम झेपत नाही. वय झालं आहे. कळू लागल्यापासून शेतात राबतो आहे. कित्येक उन्हाळे- पावसाळे पाहिले. मी एकुलता आहे. चुलत्यांना सात मुलं होती. एकूण चाळीस एकर शेती होती. माझे वडील मी चौथीत असताना वारले. आईने आपल्या माहेरी जाणं पसंत केलं. मला घेऊन ती माझ्या मामांकडेच राहिली. माझे सगळे शिक्षणही मामांच्या गावी पुढे शहरात झाले. आमची शेती चुलतेच बघत. ते स्वभावाने चांगले होते. ते असेपर्यंत जो काही वाटा आहे, तो माझ्या आईकडे आणून देत. सगळा हिशेबही ठेवत. ते माझ्या आईला हिशेबही दाखवत. माझी आई हिशेब बघत नव्हती. माझ्या आईला माझे चुलते फार मान देत. माझ्या वडिलांच्या वयात आणि त्यांच्या वयात बारा वर्षांचं अंतर होतं. ते दोघे सावत्र भाऊ होते. सख्ख्या भावापेक्षाही त्यांचं एकमेकांवर प्रेम होतं. माझ्या वडिलांनी भाऊबंधकीतून शेती सोडवून घेतली. माझे चुलते साधेभोळे होते. त्यांना हे जमलं नसतं. त्यांना माझ्या आईनेही गावीच राहावं असं वाटायचं पण तिने आपल्या माहेरी राहणं पसंत केलं. माझी आई शेतीतून जो वाटा मिळेल, तो आपल्या भावाकडे देत असे. त्यातूनच त्यांनी प्रगती केली.
Tuesday, June 18, 2013 AT 05:00 AM (IST)
गावात ग्रामसभेत ठराव केला आहे, कोणी शेती बाहेरच्यांना विकायची नाही. गावात एकाने जादा पैसा मिळतो म्हणून शेती विकली. पाच एकर शेती विकली. दोघा भावांत पटत नव्हतं, त्यामुळे त्यांनी एका गुंडाला शेती विकली. तो सराईत गुंड असल्याने त्याला शेती पिकविण्याची गरजच नाही. तेथे त्याने एक घर बांधलं आहे. तेथे लपून- छपून असणारे गुंड वेळोवेळी येऊन राहतात. गुंडांचा ठावठिकाणा काही फार काळ लपून राहत नाही. त्यांना पकडून नेतात. आता हे गुन्हेगारच असतात. त्यामुळे वर्तमानपत्रात त्याची बातमी येते. साहजिकच गावाचाही उल्लेख बातमीत होतो. याचा एक परिणाम असा झाला आहे, सगळीकडे आमच्या गावाची बदनामी होत आहे. अशी वाईट गुन्हेगारीची कामं गावाने कधीच केली नाहीत. गावावर वारकरी संप्रदायाचा प्रभाव आहे. तो फार जुना आहे. गावात कुणी मांसाहारही करत नाही. व्यसनाला इथे कधीच थारा नाही. यासाठी कुणी प्रयत्न केला आहे असं नाही, गावाला असं एक वळणच पडलं आहे. व्यसनाला गावात प्रतिष्ठा नाही. गाव म्हटल्यावर एखाद्‌दुसरा माणूस काहीतरी व्यसन करीत असेल पण त्यालाही कोणी व्यसन का करतोस, अशी दमदाटी करीत नाही. एवढंच नव्हे, उघडपणे कोणीही कोणतंही व्यसन करत नाही.
Saturday, June 15, 2013 AT 05:30 AM (IST)
घरातून बाहेर पडत होतो. रानात निघालो होतो. दिवस कासराभर आला होता. तसा मला उशीरच झाला होता. आज माझी पाण्याची पाळी आहे. तीन भावांत सामाईक विहीर आहे. तिघांनी एकाच वेळी मोटर सुरू केली, तर विहिरीचं पाणी तीन तासांत उपसून होतं. पूर्वी असंच आम्ही पाणी उपसत होतो. उन्हाळ्यात विहिरीला पाणी कमी असतं. खरं तर गावात आमची अशी एकच विहीर आहे, जिला दुष्काळातही भरपूर पाणी असतं. विहिरीला लहान लहान मुंगळी झरे आहेत. हे सगळे जिवंत झरे आहेत. आमच्या आजोबांनी ही विहीर खोदली आहे. या विहिरीवर आमची त्या वेळी वीस एकर बागायती शेती होती. आजोबांनी पानमळा पिकवून नाव आणि पैसा कमवला. वडिलांनी जे कमावलं, ते मुलांनी टिकवून ठेवलं. त्यात वाढ झाली नाही. वाढ जरी झाली नसली, तरी एक गुंठाही शेती मुलांनी विकली नाही. आमची तिसरी पिढी आहे. आम्ही तिघेही शेतीच कसतो. आमच्या वाट्याला पाच- पाच एकर शेती आली आहे. आता सगळा ऊसच असतो. गावाशेजारी साखर कारखाना झाला आहे. ऊस कारखान्याला घालतो. आमच्या पोटापुरतं आम्हाला शेतीतून मिळतं. आमची भूक तशी कमी आहे. गरजाही मर्यादित आहेत. मला एकच मुलगी आहे. यंदा दहावीची परीक्षा चांगल्या गुणांनी पास झाली. मुलगीही गुणी आहे.
Friday, June 14, 2013 AT 05:00 AM (IST)
कुटुंबाच्या जबाबदारीतून मुक्त झालो. खरं तर कुटुंबाची जबाबदारी कधीच संपत नाही पण कधी तरी थांबलं पाहिजे. पण आपण कधी थांबायचं हे कळावं लागतं. ते काही सगळ्यांना कळत नाही. मला अलीकडे एक जाणवू लागलं आहे. आपली आता कुटुंबाला गरज नाही. जो तो आपापल्या मार्गाला लागला आहे. कारण नसताना, सगळ्यात आपली लुडबूड नको. मला असंही जाणवू लागलं आहे, कुटुंबातील लोकांना आपला उपयोग होण्यापेक्षा उपद्रव होतो आहे, त्यामुळे कामात अडथळा तयार होत आहे. याचं कारण दोन पिढींतील अंतर वाढलं आहे. आता तर घरात चार पिढ्या आहेत. चौथ्या पिढीची भाषाही आम्हाला समजत नाही. आम्हाला वाटतं, ते सगळं चुकीचं करीत आहेत. आम्ही तुमच्याएवढे असताना असं वागत नव्हतो, हे आम्ही त्यांना सांगतो. हे काही त्यांना पटत नाही. त्यामुळे कारण नसताना प्रश्‍न तयार होत आहेत. मला तर असं वाटू लागलं आहे, की ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या मार्गाने जाऊ दिलं पाहिजे. यातून त्यांच्याकडून चुकाही होऊ शकतात, त्यांना नुकसान होऊ शकेल. ठोकर बसल्याशिवाय शहाणपणही येणार नाही. ज्याचा त्याने अनुभव घेतला पाहिजे. आम्ही जो विचार करीत आहोत, तो तर इतका जुना झाला आहे. तो मार्ग कोणीच आता अवलंबत नाही.
Thursday, June 13, 2013 AT 04:15 AM (IST)
1 2 3 4 5 ...
 
 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2013 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: