aagricultural stories in marathi, agro plus, cattle tips | Agrowon

गाय-वासराच्या संगोपनातील महत्त्वाच्या टिप्स
अजय गवळी, डॉ. विशाल केदारी
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

भारत हा कृषिप्रधान देश असून, पशुसंवर्धन हे संस्कृतीतून रुजत आलेले आहे. आपल्या संस्कृतीमध्ये गोवत्स द्वादशीला गायीसह वासराचे पूजन केले जाते. हा दिवाळीचा पहिला दिवस मानला जातो. या दिनाच्या निमित्ताने आपण गाय आणि तिच्या वासराच्या संगोपनातील महत्त्वाच्या घटकांचा वेध घेऊ.

दारामध्ये गाय किंवा बैल असणे हे ग्रामीण भागामध्ये आजही तालेवारपणाचे लक्षण मानले जाते. आपल्या संस्कृतीमध्ये गायीचे महत्त्व मोठे आहे. तसेच ग्रामीण भागातील स्वयंरोजगाराची मोठी क्षमता या व्यवसायात आहे. त्यामुळे जनावरांच्या संगोपनाचा शास्रोक्त पद्धतीने विचार करणे आर्थिकदृष्ट्याही फायद्याचे ठरते.

भारत हा कृषिप्रधान देश असून, पशुसंवर्धन हे संस्कृतीतून रुजत आलेले आहे. आपल्या संस्कृतीमध्ये गोवत्स द्वादशीला गायीसह वासराचे पूजन केले जाते. हा दिवाळीचा पहिला दिवस मानला जातो. या दिनाच्या निमित्ताने आपण गाय आणि तिच्या वासराच्या संगोपनातील महत्त्वाच्या घटकांचा वेध घेऊ.

दारामध्ये गाय किंवा बैल असणे हे ग्रामीण भागामध्ये आजही तालेवारपणाचे लक्षण मानले जाते. आपल्या संस्कृतीमध्ये गायीचे महत्त्व मोठे आहे. तसेच ग्रामीण भागातील स्वयंरोजगाराची मोठी क्षमता या व्यवसायात आहे. त्यामुळे जनावरांच्या संगोपनाचा शास्रोक्त पद्धतीने विचार करणे आर्थिकदृष्ट्याही फायद्याचे ठरते.

गाई-म्हशींची निवड व निरोगीपणाची लक्षणे :

 • खरेदीवेळी गाई/म्हशीची निवड करताना जात, त्या जातीचे गुणधर्म, रंग, रूप, शरीराची बांधणी व जनावराची वंशावळ पाहावी.
 • जनावरांची खरेदी शक्यतो पशुपालकाकडे केल्यास त्याच्याकडून जनावरांच्या नोंदी, उदा. जन्म, गाभण काळ, वेतातील अंतर, सरासरी दूध उत्पादन, पहिला माज, दिलेल्या वासरांची संख्या, लसीकरण यांची माहिती मिळू शकते.
 • जनावरांची कास मऊ असावी तसेच लोंबणारी नसावी.
 • जनावराचे चार ही सड सारख्या आकाराचे, हातात धरून दूध काढण्यास योग्य असावेत. चारपेक्षा जास्त सड असलेले जनावर घेणे टाळावे.
 • चारही सडातून दूध येते का? जनावर दूध काढताना त्रास देते का? हे तपासून घेणे आवश्यक ठरेल.
 • गाई-म्हशींच्या काही वेगळ्या सवयी असल्यास त्या विचारून घ्याव्यात.
 • जनावरे शक्यतो गाभण किंवा दुसऱ्या, तिसऱ्या वेताच्या घ्याव्यात. त्यांचे वय सरासरी चार वर्षांपर्यंत असावे. कमरेची हाडे दूर असावीत, त्यामुळे गर्भाची वाढ व प्रसूती व्यवस्थित होते.
 • गाय किंवा म्हैस निरोगी असावी. निरोगीपणाची ओळख तिची मऊ व चमकदार त्वचा, ओलसर नाकपुडी यावरून पाहता येते. डोळे चकाकणारे, शुभ्र, पाणीदार, पांढरे असावेत. त्वचेला स्पर्श केला असता त्याक्षणी त्वचा मऊ, गरम लागायला हवी. निरोगी जनावर हा कायम कान टवकारून, सावध, चाणाक्ष दिसते.
 • निरोगी जनावर हे मस्त, हुंदळत चालते तर रोगी जनावर मंद स्थितीत एकाच जागेवर बसून राहते.
 • जनावर खरेदी करण्यापूर्वी थोडे अंतर चालवून पाहावे. पायात किंवा चालण्यात काही दोष असल्यास कळतात.

निवारा :

 • सध्याच्या व भविष्यात वाढणाऱ्या जनावरांची संख्या लक्षात घेऊन गोठ्याचा आराखडा करावा. प्रत्येक जनावरासाठी साधारणतः ६५ ते ७५ चौ. फूट जागा असावी.
 • बांधणीच्या तोंडासमोर तोंड किंवा शेपटीकडे शेपटी अशा दोन पद्धतीपैकी योग्य अशा एकाची निवड करावी.
 • गाई-म्हशींना व्यायामासाठी मोकळी जागा असावी. गोठ्याजवळ चौकटी जाळीचा वापर करून कुंपण करावे.
 • गोठ्यात भरपूर प्रकाश, खेळती हवा असावी. गव्हाणी ही टिकाऊ व पक्क्या करून घ्याव्यात. गोठ्याचे छप्पर मध्यभागी १५ फूट व बाजूस ६ ते ८ फूट असावे.
 • खाली पक्की व जनावराच्या मागील बाजूस उतार असलेली जमीन तयार करावी. शेवटी मूत्रवाहक नाली असावी. गोठा स्वच्छतेनंतरचे पाणी शेतापर्यंत जाईल, अशी व्यवस्था करावी.

संतुलित आहार :

 • जनावरांच्या आहारात हिरवा चारा, सुकी वैरण व पशुखाद्य यांचे प्रमाण शास्त्रीयपणे ठरवावे. जनावरांना त्यांच्या शारीरिक वजनाच्या २.५ ते ३ टक्क्यांपर्यंत कोरडा आहार आवश्यक असतो. उदा. चारशे किलो वजनाच्या गाईला शुष्क आहार १२ किलोपर्यंत द्यावा. त्यातील दोन तृतीयांश भाग हिरवा चारा आणि एक तृतीयांश भाग वैरणीच्या स्वरूपात द्यावा.
 • जनावरांना प्रत्येक लिटर दुधासाठी ३०० ते ४०० ग्राम पशुखाद्याची गरज असते. दुधावाटे बाहेर पडणाऱ्या कॅल्शियम, फॉस्फरस अशा घटकांच्या भरपाईसाठी खाद्यासमवेत ५० ते १०० ग्रॅम क्षारमिश्रण द्यावे.
 • दुभत्या गाई-म्हशींना दिवसातून चार ते पाच वेळा चारा, वैरण घालावी. पशुखाद्य सकाळी व सायंकाळी अशा दोन्ही वेळेस धारा काढताना दूध उत्पादनानुसार द्यावे. क्षारांची गरज भागविण्यासाठी क्षारांच्या चाटणविटा खुंट्यांना लावून ठेवाव्यात.

जनावरांच्या संगोपनातील महत्त्वाचे मुद्दे ः

 • मुद्देसूद नियमित नोंदी ठेवाव्यात. उदा. गाय माजावर केव्हा आली, गाय केव्हा व्यायली, विताना आलेल्या अडचणी, औषधे, व्याल्यानंतर पुन्हा माजावर येण्याची वेळ, गाभण राहण्यासाठी किती वेळा भरवावी लागली, जनावरातील भाकड काळ, दोन वितातील अंतर व वापरलेल्या वळूची सविस्तर असणारी माहिती ठेवावी.
 • सातत्याने निरीक्षण करत राहावे. गायीचा एक माज न ओळखल्यास भाकडकाळ २१ दिवसांनी वाढतो. परिणामी तेवढा काळ पालनपोषणाचा खर्च वाढतो. एकूण आयुष्यात गायीपासून कमी वासरे मिळतात.

माजावर आलेल्या गायीला केव्हा भरावे?
गाय सुमारे २१ दिवसांच्या अंतराने माजावर येते. माजाची लक्षणे दिसल्यापासून सुमारे १० ते १८ तासांत भरवावे. काही वेळेस २० ते २१ दिवसांनीसुद्धा जनावर माज दाखवत नाही व काही जनावरे दुसऱ्या-तिसऱ्या महिन्यात माजावर येतात. अशा गाईची पशुवैद्यकीयांकडून तपासणी करून औषधोपचार करून घ्यावा.

गाभण गाईचे संगोपन :

 • गाभण गाईंना शेवटच्या अडीच महिन्यांच्या काळात दीड किलो समतोल खाद्याचा अधिक पुरवठा करावा.
 • विण्यांच्या अगोदर मोकळे फिरायला द्यावे.
 • प्रत्यक्ष गाई वितेवेळी दुरूनच तिच्यावर लक्ष ठेवावे.
 • गोठ्यात टोकदार दगड व खिळे असू नयेत.

नाळ कापताना घ्यावयाची निगा व काळजी :

 • नवजात वासरू बाहेर आल्यानंतर स्वच्छ करून, त्याची नाळ बेंबीपासून दीड ते दोन इंच लांब कापावी. निर्जंतुक कात्री वापरावी.
 • कापलेल्या भागाच्या तोंडावर टिंक्चर आयोडीनचा बोळा घट्ट बांधावा.
 • दोन दिवसांनी वरील बोळा काढून त्यावर बेन्झींनचा बोळा लावावा. हळूहळू नाळ सुकून जाते.
 • ४-५ दिवसांनी बेंबीजवळ खोबरेल तेलाचा बोळा लावावा. त्यानंतर पंधरा दिवसांच्या आतच नाळ आपोआपच गळून जाते.

वासरांचे संगोपन :

 • वासरू जन्मल्यानंतर गाय त्याच्या नाकातील कानातील व तोंडातील सर्व चिकट पदार्थ स्वच्छ करते.
 • वासराचे कोवळे खूर लवकरात लवकर काढावे.
 • जर नाळ आपोआप तुटली, वरीलप्रमाणे औषधोपचार करावा.
 • वासरू जन्मल्यानंतर सुमारे एक तासाच्या आत त्याच्या वजनाच्या ८ ते १० टक्के दूध चिक पाजावा.
 • शिंगे वाढू नयेत म्हणून ७ ते १० दिवसाच्या आत शिंगे काढावीत. लाल तापलेल्या लोखंडाने शिंगे नाहीशी करावीत.
 • वासराला दूध पाजल्यानंतर थोडा वेळ तोंडाला मुसकी बांधावी.

लसीकरण :
जनावरांना रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी वेळेवर लसीकरण करून घ्यावे. लसीकरणामुळे घटसर्प, फऱ्या, लाळ्या-खुरकत, फाशी (काळ पुळी), ब्रुसेलोसीस, आय. बी. आर, थायलेरियासीस यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव रोखता येतो.

पशुवैद्यकीय सल्ला :
कोणत्याही आजाराचे लक्षण आढळल्यास किंवा एखाद्या जनावराचे विसंगत लक्षण दिसल्यास त्वरीत पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा. वरील बाबींचे काटेकोर पालन केल्यास गाय आणि वासरू यांचे आरोग्य जपता येईल. खऱ्या अर्थाने वसुबारस साजरी केली, असे म्हणता येईल.

संपर्क ः अजय गवळी, ८००७४४१७०२.
(सहायक प्राध्यापक, पशू जैवतंत्रज्ञान विभाग, के. के. वाघ कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय, नाशिक.)

इतर कृषिपूरक
ओळखा लिस्टेरिओसिस आजाराची लक्षणेजनावरापासून माणसास होणारे आजार प्रामुख्याने...
पशुसल्लावाढत्या तापमानात जनावरांच्या आहार...
प्रजननक्षमता सक्षम करण्यासाठी...सुयोग्य व समतोल आहारातून जनावरांना ऊर्जा, प्रथिने...
जनावरांमध्ये प्रसूतीनंतर येणाऱ्या समस्याजनावर गाभण असताना व विताना जर व्यवस्थित लक्ष दिले...
प्रक्रियेमुळे वाढेल ऊस वाढ्याची...वाढ्यातील आॅक्झलेट या घटकामुळे जनावराच्या शरीरात...
वर्षभर हिरव्या चाऱ्यासाठी ः मुरघासपावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर हिरव्या चाऱ्याचे...
चाराटंचाई काळात जनावरांसाठी हाय फायबर...चाराटंचाईच्या काळात फक्त जनावरे जगवणे महत्त्वाचे...
जनावरांना खाद्यामार्फत जास्तीची ऊर्जा...जनावरांनी खाल्लेल्या आहारापासून शरीरास लागणारी...
चाऱ्याच्या उपलब्धतेनुसार जनावरांचे पोषणवयस्क व दुधाळ जनावरांना केवळ चारा व कडबा खाण्यास...
प्रक्रियेतून सकस चाऱ्याची निर्मितीचाराप्रक्रियेमुळे जनावरांचे पचन सुधारून शरीरात...
नवजात वासरांचे पोषणनवजात वासरे कालवडींचे वैज्ञानिक पद्धतीने पालन...
गायी, म्हशींतील प्रजनन व्यवस्थापनगायी, म्हशी नियमित माजावर येण्यासाठी योग्य समतोल...
सुक्या चाऱ्याची निर्मिती, साठवणूक,...अधिक वैरणीचा मुरघास करून किंवा सुकवून साठवून...
पशूसल्ला    थंड वातावरणामुळे जनावरांच्या...
उसाच्या वाढ्याची पौष्टिकता वाढवाजनावरांच्या आहारात सतत वाढ्याचा समावेश केल्यामुळे...
पशू आजारांवर प्राथमिक उपचारासाठी औषधी...जनावरांच्या आजारामुळे मिळणाऱ्या कमी उत्पादनामुळे...
मुक्त संचार गोठ्यामध्ये गव्हाण,...मुक्त संचार गोठ्यात कायमस्वरूपी पाण्याची उपलब्धता...
शस्त्रक्रियेमुळे बरी होते जनावरांतील...आजच्या तंत्रज्ञानाच्या युगातही शेतीची बरीचशी कामे...
गोठ्याचे कुंपण, बांधकामावर नको जास्त...गोठा बांधकामाचे नियोजन करताना लोखंडी वस्तू...
जनावरांच्या चांगल्या आरोग्यासाठी कमी...कमी खर्चाचा मुक्त संचार गोठा करताना आपल्याकडे...