मराठवाड्यात पंचवीस लाखांवर कर्जमाफीसाठी नोंदणी

कर्जमाफी प्रक्रिया
कर्जमाफी प्रक्रिया

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतून शनिवारपर्यंत (ता. ९) छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत २५ लाख १२ हजार ९२५ शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी नोंदणी केली. त्यापैकी ११ लाख ९८ हजार ९७७ शेतकऱ्यांचे अर्ज परिपूर्ण असल्याची माहिती समोर आली आहे.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, कर्जमुक्‍तीचा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतर राज्य शासनाने २००९ ते २०१६ दरम्यान कर्ज उचल केल्यानंतर नापिकीमुळे कर्ज फेडू न शकणाऱ्या शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना - २०१७ जाहीर केली.

या योजनेअंतर्गत दीड लाखापर्यंतच्या कर्जमाफीसह आपल्याकडील जास्तीच्या कर्जाची वा मुदतीआधी व नंतरच्या कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली. परंतु जाचक अटी, सुसज्ज ऑनलाइन यंत्रणेचा अभाव याचा फटका पुन्हा एकदा दुष्काळ, नापिकीमुळे होरपळलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बसला. ऑनलाइन पीकविमा योजनेचा गोंधळ संपत नाही तोच कर्जमाफीसाठी अर्ज करणाऱ्याकरिता शेतकऱ्यांची परवड सुरू झाली.

मुदतीत ऑनलाइन अर्ज करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना सर्व्हर डाउनमुळे रात्रन्‌दिवस सुविधा केंद्रांवर ताटकळण्याची वेळ आली. आता अर्ज भरलेल्या शेतकऱ्यांना तो चुकू नये, चुकला तर काय होईल याची चिंता आहे. कर्जमाफीचे अर्ज भरणाऱ्यांमध्ये नियम, अटीत बसणाऱ्या व न बसणाऱ्यांनीही अर्ज भरले.

कर्जमाफीसंबंधी शासनाने अनेक वेळा वेगळवेगळे निर्णय जाहीर केले. शेतकरी संघटनांसह विविध राजकीय पक्षांकडून सरसकट कर्जमाफीची होत असलेली मागणी पाहता ऐनवेळी आपण कर्जमाफीचा अर्ज भरला नाही, असे होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी हा मार्ग निवडल्याचे चित्र आहे. त्यामुळे नोंदणी व दाखल अर्जांपैकी मराठवाड्यातून नेमके किती शेतकरी कर्जमाफीच्या निकषात बसतील याविषयीचा आकडा आता स्पष्ट होणे कठीण असल्याचे सूत्रांनी सांगितले.

कर्जमाफीमध्ये आपले नाव ऑनलाइन यादीत आहे की नाही हे पाहण्यासाठी शासनाने लिंक दिली आहे. या लिंकनुसार http://CSMSSY.in या साइटवर जाऊन पाहिल्यास अर्जदारांच्या यादीमध्ये आपला जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत आदी निवडून आपले नाव यादीत पाहता येऊ शकते. परंतु ज्या दिवशी लिंक दिली, त्यानंतर पुन्हा या लिंकवरही ऑनलाइनचा बोजवारा समोर आला. दोन दिवसांपासून या लिंकवर आपले नाव शेतकऱ्यांना पाहता येत नसल्याची स्थिती आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com