कर्जमाफी अर्जात बुलडाण्याची अाघाडी कायम

कर्जमाफी अर्ज प्रक्रिया
कर्जमाफी अर्ज प्रक्रिया

अकोला  ः राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान’ योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज दाखल करण्याकरिता अाता अवघे चार दिवस उरले अाहेत. अर्ज दाखल करण्यात बुलडाणा जिल्ह्याने घेतलेली अाघाडी कायम आहे. अमरावती विभागात सर्वाधिक अर्ज या जिल्ह्यातून दाखल झाले आहेत. जिल्ह्यात रविवारपर्यंत तीन लाख ४२ हजार ५३४ म्हणजेच उद्दिष्टाच्या ९० टक्के अर्ज भरले गेले अाहेत.

शासनाने कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अाॅनलाइन अर्ज भरण्याचे अावाहन केले. ही प्रक्रिया राबविण्यासाठी महा ई-सेवा केंद्र, सुविधा केंद्र तसेच सेतूसह ग्रामपंचायतींमध्ये उपलब्ध असलेल्या संगणकाचा वापर सुरू केला अाहे.

शुक्रवारपर्यंत (ता.१५) अर्ज दाखल करायचे असून सर्वच जिल्ह्यांमध्ये यंत्रणांनी या कामाला प्राधान्य देत विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात बुलडाणा जिल्ह्यात कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्याच्या कामाने गती घेतली. बुलडाणा जिल्ह्यात रविवारपर्यंत तीन लाख ४२ हजार ५३४ शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले. अकोला जिल्ह्यात एक लाख ५२ हजार ५७६ अाणि वाशीम जिल्ह्यात एक लाख ६१ हजार १३६ शेतकऱ्यांनी अर्ज भरले.

शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देताना खरे लाभार्थी वंचित राहू नयेत, बोगस लाभार्थ्यांना लाभ होऊ नये, यासाठी शासनाने कर्जमाफीचे अर्ज ऑनलाइन स्वरूपात मागविले. त्यासाठी स्वतंत्र संगणकप्रणाली विकसित केली अाहेत. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मोफत सुविधा उपलब्ध करून दिली. आता केवळ चार दिवस उरले असून, या दिवसांत आपला अर्ज भरला जावा, यासाठी शेतकरी सुविधा केंद्रांवर गर्दी करीत अाहेत.

कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरताना प्रामुख्याने संकेतस्थळ हँग होणे, तासनतास लिंक न मिळणे, ‘अाधार’ला मोबाईल लिंक नसणे, अोटीपी मिळण्यास विलंब, अंगठ्याचा मशिनने स्वीकार न करणे अादी अडचणी येत अाहेत. एवढे झाल्यानंतर दाखल झालेल्या अर्जाची प्रत लवकरच मिळत नसल्याच्या तक्रारी अाहेत. अर्ज दाखल करताना अनेक ठिकाणी अंगठ्याचे ठसे जुळत नसल्याच्या तक्रारी अाहेत. वयोवृद्धांच्या बोटांवरील रेषा पुसल्या गेल्याने ही समस्या वाढली अाहे. यावर ग्रामीण भागात अफलातून उपाय शोधले जात अाहेत. कुणी रात्रभर हातांना खोबरेल तेल लावून सकाळीच केंद्रावर पोचत अाहे तर कुठे केंद्रांवर डोकेदुखी थांबण्यासाठी वापरली जाणारा बाम अंगठयावर लावला जात आहे. यामुळे अंगठ्याचे ठसे जुळत असल्याचे एका केंद्र चालकाने सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com