२६ तालुक्यांत पिकांची स्थिती असमाधानकारक

crop sowing
crop sowing
पुणे  : राज्यात खरिपाची पेरणी १०० टक्के झाली आहे. मात्र २६ तालुक्‍यांमध्ये कमी पाऊस असून, तेथील पिकांची स्थिती समाधानकारक नाही. सोयाबीन व कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये कीड - रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. मूग, उडदाची काढणी लवकरच सुरू होण्याची चिन्हे असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.    
राज्यात एक जून ते एक सप्टेंबरपर्यंत यवतमाळमध्ये सर्वांत कमी पाऊस झालेला आहे. जळगाव, कोल्हापूर, औरंगाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये कमी म्हणजेच ५० ते ७५ टक्के पाऊस झालेला आहे. नाशिक, धुळे, नंदूरबार, सोलापूर, सातारा, सांगली, जालना, उस्मानाबाद, बुलडाणा आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये ७५ ते १०० टक्के पाऊस आहे. फक्त ठाणे, पालघर, रायगड, नगर, पुणे, बीड, लातूर जिल्ह्यात १०० टक्‍क्‍यांहून जादा पाऊस झाल्याचे कृषी खात्याच्या अहवालात म्हटले आहे.     
राज्यात आता खरिपाचा पेरा १०० टक्के झाला आहे. खरिपातील ऊस क्षेत्र वगळता १३९ लाख हेक्‍टरपैकी आतापर्यंत १४० लाख हेक्‍टरवर पेरा झालेला आहे. नागपूर विभाग वगळता राज्यातील सर्वच भात उत्पादक पट्ट्यातील पुनर्लागवडीची कामे आटोपली आहेत. राज्यातील काही तालुक्‍यांमध्ये विविध पिकांच्या वाढीसाठी पावसाची आवश्‍यकता असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.   
बाजरी पीक आता फुलोरा, कणसे लागणे, कणसे भरण्याच्या स्थितीत आहे. ज्वारी व तूर पीक वाढीच्या अवस्थेत आहेत. मूग आणि उडीद शेंग पक्वता ते काढणीच्या अवस्थेत आहे. सोयाबीन आता फुलोरा, शेंगा भरणे ते पक्वतेच्या अवस्थेत आहे. भुईमूग पीक फुलोरा ते आऱ्या सुटण्याच्या अवस्थेत आहे. कापूस पीक फुलोरा, पाते तर काही ठिकाणी बोंडे लागण्याच्या अवस्थेत आहे.   
राज्यात विविध पिकांवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सिंधुदुर्ग, नाशिक जिल्ह्यांतील काही गावांमध्ये भात पिकावर पिवळा खोड किडा दिसून येत आहे. नंदूरबार, जळगाव, धुळे भागांत कपाशीवर पाने खाणारी अळी, शेंदरी बोंड अळी, अमेरिकन व ठिपक्‍याच्या बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला आहे.
नगर, सातारा, नांदेड जिल्ह्यांत काही ठिकाणी सोयबीनवर उंट अळीचा प्रादुर्भाव दिसत आहे. कृषी विभागाचे क्षेत्रीय कर्मचारी गावोगावी बैठका घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 
पावसाळा आता संपण्याच्या मार्गावर आहे. मात्र आमच्या भागात पाऊस झालेला नाही. विहिरींना पाणी नाही. माझा सात एकर सोयाबीन दुष्काळामुळे वाया गेला आहे. पाण्याअभावी ६० क्विंटल सोयाबीन डोळ्यादेखत जळाले. गावात दोन आठवड्यांनी नळाला पाणी येते. पावसाळ्यात हे हाल तर उन्हाळ्यात आमच्या नशिबी काय असेल ते सांगू शकत नाही, असे साखरखेर्डा (जि. बुलडाणा) येथील शेतकरी  सचिन विलास पाटील यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com