सातारा जिल्ह्यात ६७ टक्के पीककर्जाचे वितरण

crop loan
crop loan
सातारा : जिल्ह्यात खरीप हंगामासाठी १६५० कोटी १५ लाख रुपये पीककर्जाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी ३१ ऑगस्टअखेर ११०० कोटी १० लाख रुपये म्हणजेच उद्दिष्टाच्या ६७ टक्के पीककर्जाचे वाटप करण्यात आले आहे. त्यामध्ये सर्वाधिक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने उद्दिष्टाच्या ९४ टक्के पीककर्जाचे वाटप केले आहे.  
खरीप हंगामासाठी सप्टेंबरअखेरपर्यंत कर्जवाटपाची मुदत असून, वाटपासाठी काही दिवस बाकी राहिले आहेत. खरीप हंगामासाठी जिल्ह्याला १६५० कोटी १५ लाखांचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी ११०० कोटी १० लाख रुपये कर्ज वितरण करण्यात आले आहे. आतापर्यंत दिलेल्या उद्दिष्टाच्या ६७ टक्के वाटप झाले असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
बॅंकनिहाय हेच आकडे पाहता कर्जवाटपाची टक्केवारी कमी होते. पीककर्ज वितरणाच्या आकडेवारीवरून जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकरी हे सातारा जिल्हा बॅंकेशी जोडलेले असल्याचे दिसत आहेत. या बॅंकेस या हंगामात ८१० कोटींचे उद्दिष्ट होते. त्यापैकी या बॅंकेने ७५९ कोटी ८७ लाखांचे वाटप केले असून, ९४ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. बॅंक ऑफ महाराष्ट्रला १४१ कोटी ४२ लाखांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी या बॅंकेने ८८ कोटी तीन लाखांचे वाटप झाले. या बॅंकेने उद्दिष्टाच्या ६२ टक्के कर्जपुरवठा केला आहे.
स्टेट बॅंक ऑफ इंडियाने १५९ कोटी ९० लाखांच्या उद्दिष्टापैकी ६८ कोटी ३८ लाख म्हणजेच ४३ टक्के कर्जाचे वितरण केले आहे. बॅंक ऑफ इंडियाने १४२ कोटी १४ लाखांच्या उद्दिष्टापैकी २४ कोटी ३३ लाख रुपये म्हणजेच १७ टक्के वाटप केले आहे. आयडीबीआय बॅंकेने ८८ कोटी ८३ लाखांच्या उद्दिष्टापैकी ८५ कोटी ५९ लाख रुपये म्हणजेच ९६ टक्के कर्ज वितरण करण्यात आले आहे. ऍक्‍सिस, फेडरल, एचडीएफसी, आयसीआयसीआय, कोटक महिंद्रा, कर्नाटक, रत्नाकर या खासगी बॅंकांकडून उद्दिष्टांच्या खूप कमी कर्जपुरवठा करण्यात आला आहे. १७३ कोटी ३० लाखांचे या बॅंकाना उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी ४९ कोटी ६२ लाखांचे म्हणजेच २९ टक्के कर्ज वितरण करण्यात आले आहे.
कारवाई होणार का?
सर्व बॅंकांनी जास्तीत जास्त खरीप कर्ज वितरण करून देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी दिले होते.
पीककर्ज वाटपाची सप्टेंबरअखेर मुदत असून, या वाटपाची गती पाहता उद्दिष्ट गाठणे शक्‍य होणार नसल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांनी उद्दिष्टाच्या ४५ टक्के तर खासगी बॅंकांनी २९ टक्के कर्ज वितरण केले आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये स्टेट बॅंक व बॅंक ऑफ इंडिया या बॅंकेने दुलर्क्ष केले आहे. पात्र शेतकऱ्यांना कर्ज वसुलीच्या नोटिसा पाठवणाऱ्या बॅंकांकडून पीककर्ज वितरण करण्याकडे दुलर्क्ष केले जात असल्यामुळे या बॅंकांवर कारवाई होणार का हे पाहावे लागणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com