सदाभाऊंची अखेर स्वतंत्र चूल

स्वामिनाथन समितीच्या शिफारशींवरून माझा राजीनामा मागणाऱ्या शेट्टींनी स्वामिनाथन आयोग आला तेव्हा काँग्रेसबरोबर युती करून बांधकाम सभापती पद घेतले. मग त्या वेळी स्वामिनाथन आयोग का लागू केला गेला नाही? - सदाभाऊ खोत, कृषी राज्यमंत्री
सदाभाऊ खोत
सदाभाऊ खोत

मुंबई : खासदार राजू शेट्टी आणि त्यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला राजकीय शह देण्यासाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी अखेर स्वतःची स्वतंत्र चूल मांडण्याची घोषणा गुरुवारी (ता. ७) पत्रकार परिषदेत केली. नव्या संघटनेसाठी मसुदा समितीची घोषणा करत सदाभाऊ खोत यांनी घटस्थापनेच्या मुहूर्तावर २१ सप्टेंबर रोजी अापल्या नव्या शेतकरी संघटनेचे नाव घोषित केले जाणार असल्याचे सांगितले. दसऱ्याला (३० सप्टेंबर) इचलकरंजीमध्ये शेतकऱ्यांचा महामेळावा आणि ऊस परिषद घेण्यात येईल, अशीही माहिती श्री. खोत यांनी दिली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून काढून टाकल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी नवी संघटना निर्मितीच्या मसुदा समितीची घोषणा केली अाहे. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे माजी कार्याध्यक्ष अॅड. सतीश बोरूडकर, स्वाभिमानीचे विद्यार्थी संघटनेचे माजी प्रदेश अध्यक्ष पांडुरंग शिंदे, गजानन अहमदाबादकर, सुरेशदादा पाटील अादी उपस्थित होते.

मसुदा समिती २१ सप्टेंबर रोजी नव्या संघटनेबाबत कोल्हापूर येथे घोषणा करेल. ही मसुदा समिती संघटनेचा झेंडा कसा आसावा, लोगो कसा असावा, संघटनेचे नाव काय असावे हे ठरवणार आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ३० सप्टेंबर रोजी इचलकरंजी येथे सोने लुटायचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस यावेत म्हणून दसऱ्याच्या दिवशी शेतकऱ्यांचा मेळावा आणि ऊस परिषद घेण्यात येणार असल्याचे श्री. खोत यांनी स्पष्ट केले. ‘मला जाणीवपूर्वक अपमानित केले’ श्री. खोत म्हणाले, की स्वाभिमानीने भाजपशी युती केली होती. त्यात लोकसभेत दोन जागा देण्यात आल्या होत्या, तर विधानसभेला काही जागा देण्यात आल्या होत्या. त्यानंतर ठरल्याप्रमाणे मला मंत्रिपद मिळाले. एका वर्षातील कालावधीमध्ये राज्यातील शेतकऱ्यांना डोळ्यांसमोर ठेवून सरकारमध्ये काम केले. राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी आरोप- प्रत्यारोप झाले तरीही कणखरपणे कर्जमुक्तीचा निर्णय घेतला. दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी राज्यमंत्री म्हणून प्रामाणिकपणे प्रयत्न केला. हे काम करत असताना पातळी घसरलेले आरोप झाले, तरीही मी काम सुरूच ठेवले. मधल्या काळात आजारपणात काही काळ गेला. त्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांच्या वाढलेल्या आपेक्षा, विरोधकांचे आरोप, अंतर्गत घरभेद्यांचा सामना करणे अशा तिन्ही पातळीवर काम करत गेलो. मला शाबासकी देण्याऐवजी माझे पाय कापण्याचे काम केले. चौकशी समिती नेमली, त्या सदस्यांपेक्षा माझे चळवळीतील वय जास्त होते. तरीही मला जाणीवपूर्वक अपमानित करण्यात आले, असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पांडुरंग फुंडकर, चंद्रकांतदादा पाटील यांनी मला आधार दिला. व्यक्तिगत स्वार्थासाठी मंत्रिपदाचा राजीनामा देणार नाही. सरकार चर्चेला तयार आहे, कर्जमाफीला तयार आहे, तर मग बाहेर कशाला पडायचे, असा सवालही श्री. खोत यांनी उपस्थित केला. ‘राजू शेट्टींना माझ्या राजीनाम्यात रस’ राजू शेट्टी यांना आपल्या राजीनाम्यात रस होता, असा आरोप करत सदाभाऊ म्हणाले, की मी आल्यावर ऊस खरेदीकर माफ झाला. सरकारबरोबर संवाद साधल्यामुळे एफआरपी वाढली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com