बुलडाण्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अकोला  : पावसाळ्याचे दोन महिने उलटले असून, या कालावधीत अकोला-वाशीम या जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाला अाहे. मात्र लगतच्या बुलडाणा जिल्ह्यात जून आणि जुलै या दोन महिन्यांत पावसाने अपेक्षित सरासरीसुद्धा अोलांडलेली नाही. परिणामी या जिल्ह्यातील लाखो शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत अाहेत. जिल्ह्यात दोन महिन्यांत सरासरी ३४४ मिलिमीटर पाऊस होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात २४७ मिमी पाऊस झाला. हा पाऊसही असमान झालेला असून, कमी पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्प कोरडे आहेत. परिणामी पाणीटंचाई कायम असून, पिकांची स्थितीसुद्धा जेमतेम अाहे.

खरिपाची सुरवात या वर्षी जोरात झाली. जून महिन्यातील पहिल्याच अाठवड्यात पाऊस झाल्यानंतर पेरण्या सुरू झाल्या. वऱ्हाडात यावर्षी चांगला पाऊस होईल, असे अपेक्षित धरले जात होते. बुलडाण्याच्या तुलनेने अकोला, वाशीम या दोन्ही जिल्ह्यांत समाधानकारक पाऊस झाला अाहे. त्यातही या वेळी वाशीम जिल्हा अग्रस्थानी अाहे. अकोल्यात अकोट, तेल्हारा हे तालुके अाजवर जेमतेम पावसाचेच राहलेले असून, तिकडे मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम अाहे.

बुलडाणा जिल्ह्यात जून महिन्यात ८६.५ मिमी (सरासरीच्या ६१ टक्के) तर जुलैत १६१.३ मिमी म्हणजेच सरासरी ७९.२ टक्के पाऊस झाला. अकोला जिल्ह्यात जूनमध्ये १७७.१, जुलैत २७४ मिमी अाणि वाशीममध्ये जून महिन्यात २६८ तर जुलैत २४९ मिमी पाऊस झाला आहे.

बुलडाण्यात स्थिती बिकट अातापर्यंत पावसाळ्याचे दोन महिने लोटले तरी बुलडाणा जिल्ह्यात पुरेसा पाऊस न झाल्याने प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात तिळमात्र वाढ झालेली नाही. एेन पावसाळ्यात जिल्ह्यातील ९१ प्रकल्पांनी तळ गाठला आहे. अाता पावसाळ्याच्या आगामी दोन महिन्यांत अपेक्षित पाऊस न झाल्यास जिल्ह्यातील पिकांसह प्रकल्पांवर अाधारित असलेल्या पाणीपुरवठा योजनांना मोठा फटका बसू शकतो. मागील वर्षात या जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाला होता. कमी पावसामुळे पुन्हा तीच परिस्थिती उद्भवू शकते.

अकोट, तेल्हाऱ्यात पावसाची गरज अकोला जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. मात्र याच जिल्ह्यातील तेल्हारा, अकोट हे दोन तालुके अद्यापही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत अाहेत. अकोट तालुक्यात खारपाण पट्ट्यात पुरेशा पावसाअभावी केळीवेळी भागात काही शेतकऱ्यांनी अांतरपीक म्हणून लावलेली मूग, उडीद ही पिके वखरली अाहेत. पावसाची अशीच स्थिती राहली; तर तेथेही पाण्याची समस्या वाढू शकते.

वाशीममध्ये सर्वत्र समाधान पाणीटंचाईला वर्षभर सामोरा गेलेल्या वाशीम जिल्ह्यात या मोसमातील दोन महिने चांगल्या पावसाचे राहिले अाहेत. दमदार पावसामुळे असंख्य प्रकल्प तुडुंब भरून वाहत अाहेत. या जिल्ह्यात पिकांची स्थितीसुद्धा अातापर्यंत चांगली अाहे.    

पाऊस स्थिती (मिमी)
जिल्हा  अपेक्षित पाऊस  पडलेला पाऊस
बुलडाणा  ३९९.८ २४७.५
अकोला ३६६ ४५१
वाशीम  ४२२ ५१७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com