दैनंदिन खर्चाची तजवीज, दरवर्षी बचत अन् कर्जाविना शेती

दैनंदिन खर्चाची तजवीज, दरवर्षी बचत अन् कर्जाविना शेती
दैनंदिन खर्चाची तजवीज, दरवर्षी बचत अन् कर्जाविना शेती

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोची (ता. हातकणंगले) येथील पुरंदर पाटील (वय ३५) या युवा शेतकऱ्याने केळी व बिगर हंगामी भाजीपाला पिकांचा समन्वय साधला आहे. दैनंदिन खर्चाची तजवीज, दरवर्षी बचत आणि कर्जाविना शेती या संकल्पना राबवत शेतीचे नियोजन केले आहे. केवळ साडेतीन एकर शेतीतून त्यांनी केलेली वाटचाल व प्रगती शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरू शकेल. कोल्हापूर जिल्ह्यातील गावाप्रमाणे कोरोची हे ऊस पट्ट्यातील गाव. गावातही उसाखालील क्षेत्र मोठे असले तरी वेगळी वाट चोखाळणारे तरुण शेतकरी म्हणून पुरंदर पाटील ओळखले जातात. त्यांच्या मते उसाची उत्पादकता, उत्पन्न आणि पूर्ण वर्षभर अडकून पडणारे शेत यांचा विचार करता हे पीक अल्पभूधारक शेतकऱ्याला तसे परवडणारे नाही. त्यांच्याकडे एकूण साडेतीन एकर शेती आहे. गेल्या आठ वर्षापासून शेती करताना त्यात भाजीपाल्यासह केळी पिकाचे नियोजन त्यांनी कल्पकतेने बसवले आहे. एकाच पिकावर अवलंबून राहण्याऐवजी त्यातही विविधता आणली आहे. देशी केळी व भाजीपाल्याचे सुरेख संतुलन शेतीला सुरवात केली तेव्हा त्यांचा प्रामुख्याने भाजीपाल्यावर भर होता. मात्र, गेल्या पाच वर्षात दरातील सातत्य कमी झाल्याने त्यांनी भाजीपाल्याचे क्षेत्र कमी केले. त्याऐवजी दीड एकरावर देशी केळी केली. केळीतून मिळणारे उत्पन्न बचतीसाठीच वापरायचे हेही ठरवून टाकले. भाजीपाल्यातून येणाऱ्या उत्पन्नातून दैनंदिन व नैमित्तिक खर्च भागवला जातो. या शिलकीतील रकमेमुळे अचानक येणाऱ्या कोणत्याही अडचणीवर मात करता येते. आर्थिक ताणतणाव फारसा भासत नसल्याचे त्यांचे मत आहे. दीड एकरामध्ये सुमारे १७०० केळीची झाडे आहेत. सगळे क्षेत्र ठिबकवर आहे. केळी लागवडीनंतर नऊ महिन्यांनी घड काढायला येतात. तोपर्यंत त्याचे पिलू (खोडवे) शेजारी तयार झालेले असते. त्याची जोपासना करून ते वाढविले जाते. अशा प्रकारचे पुन्हा त्याचे व्यवस्थापन करून ते वाढविले जाते. यात लागवडीचा खर्च कमी असून, उत्पादन खर्चातही बचत होते. गावच्या शेजारी असणाऱ्या इचलकरंजी बाजारात सरासरी ३० रुपये किलो या प्रमाणे केळीची विक्री केली जाते. किमान एक लाख रुपये निव्वळ नफा त्यातून मिळतो. पाटील यांनी बसविलेली काही सूत्रे १) बिगर हंगामी भाजीपाल्यावर जोर ः सध्या भाजीपाल्याच्या दराची अवस्था पाहिली तर खूप बिकट आहे. शेतीला सुरवात केल्यानंतर त्यांनाही दरातील चढउताराचा मोठा फटका बसला. टोमॅटो पिकाचा पूर्ण प्लॉट काढून टाकावा लागला. आर्थिक नुकसान झाले. धक्का मोठा असला तरी खचून जाण्याऐवजी हे नेमके कशामुळे होते, याचा विचार करू लागले. बाजारातील आवक वाढली की दर कोसळतात, हा सामान्य नियम. मग त्यांनी व्यापाऱ्यांशी बोलून कोणत्या पिकांची कधी आवक जास्त होते, याची माहिती घेतली. कोणत्याही भाजीपाल्याला वर्षभर नीचांकी दर मिळत नाही. वर्षातले जादा दर असणारा कालावधी शोधून काढला. या काळात पिकाचे उत्पादन येईल, यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यासाठी अनेक वेळा बिगर हंगामी लागवड करावी लागली. बिगर हंगामी लागवडीमध्ये हवामान फारसे अनुकूल नसल्याने उत्पादनावर परिणामही होतो. या काळात कीड रोगांचा प्रादुर्भावही अधिक असू शकतो. त्यामुळे खर्चात वाढ होते. मात्र, कमी उत्पादन आणि खर्चात वाढ बाजारात मिळणाऱ्या संभाव्य अधिक दरामुळे भरून निघतेय का, एवढाच स्थिर विचार केला. बाजारात आवक कमी असल्याने सरासरीच्या दुप्पट ते तिप्पट दर मिळतात, असा त्यांचा अनुभव आहे. त्यांच्याकडे कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, काकडी अशी भाजीपाला पिके घेतात. २) किरकोळ व ठोक विक्रीतील समन्वय ः ज्यावेळी बाजारात चांगला दर असतो, त्यात सातत्य असते, अशा वेळी संघांच्यामार्फत तो मुंबई, पुण्याच्या बाजारपेठेत पाठविला जातो. मात्र, दरामध्ये घसरण होत असल्याचे दिसल्यास किरकोळ विक्रीवर भर देतात. त्यासाठी पाटील यांनी चार चाकी व्हॅन घेतली आहे. त्यातून भाजीपाला शेजारील आठवडा बाजारात नेवून स्वत: विकतात. यामुळे नुकसानीचे प्रमाण कमी होते. केवळ किरकोळ विक्री करायची, तर एक माणूस त्यात अडकून पडतो. ठोक आणि किरकोळ विक्रीतील या समन्वयामुळे शेतीमधील कामांवर फारसा परिणामही होत नाही. वार्षिक विचार केल्यास सरासरीपेक्षा अधिक मिळालाच पाहिजे, असे त्यांचे धोरण असते. ३) कर्ज काढण्याचे टाळायचे ः सर्वसामान्यपणे कोणत्याही शेतकऱ्यावर सोसायटीपासून विविध कर्जाचा बोजा असतो. त्यावरील व्याजापोटीच अनेक वेळा मोठी रक्कम जात असते. वर्षातून एकदाच उत्पन्न मिळत असल्याने सामान्य गोष्टीसाठीही कर्ज काढण्याशिवाय शेतकऱ्यांना गत्यंतर नसते. कर्जामुळे ताणतणावामध्ये वाढ होते. हे टाळण्यासाठी वर्षभर नियमित टप्प्याने उत्पन्न हाती आले पाहिजे. केळीसारख्या नऊ महिन्याचा कालावधी लागणाऱ्या पिकातून एकाच वेळी मिळणारा पैसा साठवण्याकडे पुरंदर पाटील यांचा विशेष भर असतो. ही बचत हाताशी असल्याने अनेक मोठी कामे कोणत्याही कर्जाविना पार पाडणे शक्य झाल्याचे ते सांगतात.

  • जुनी विहीर अधिक खोल करून त्याचा पाणीसाठा वाढविला.
  • शेजारील नाल्यातून गाळ माती काढून जमिनीची सुपीकता वाढवली.
  • गावात टुमदार तीन मजली घर बांधले असून, त्याला ‘भूमिपुत्र’ असे नावही दिले.
  • इंग्रजी संभाषण शिकण्यासाठी लावला क्लास परिस्थितीमुळे पुरंदर यांचे कसेबसे दहावीपर्यंतच शिक्षण झाले आहे. मात्र, त्यांना पुढे शिकता आले नाही. शिकण्याची हौस कायम आहे. त्यांनी स्वतःच्या मुलाला इंग्रजी माध्यमातील शाळेत घातले आहे. त्याच्यासोबत आपल्यालाही इंग्रजी आले पाहिजे, असा त्यांनी ध्यास घेतला. त्यासाठी चक्क त्यांनी इंग्लीश स्पिकिंग क्‍लास लावला. यातून इंग्रजी ज्ञानासोबतच संभाषण कौशल्यही मिळवले आहे. संभाषणाचा सराव सतत होण्यासाठी सोशल मीडियातूनही मित्र जमवले. अशीच त्यांची एका पोर्तुगीज शेतकरी मित्राबरोबर ओळख झाली असून, त्याच्याशीही दररोज इंग्रजीतून संवाद साधत असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. शिकायला काय लाजायचे, असा सवालही ते करतात. आर्थिक गणित जमले की कुटुंब सुखी राहते... पाटील कुटुंबीयांमध्ये पुरंदर यांचे वडील बाबासाहेब, आई त्रिशला, आजी मदनाबाई, पत्नी प्रमिला, छोटा मुलगा चंद्रगुप्त असे सहा सदस्य आहेत. प्रचंड अडचणीच्या काळातून तग धरलेल्या कुटुंबाला आर्थिक नियोजनाचे महत्त्व चांगलेच कळले आहे. कमी काळाची पिके अल्पभूधारक शेतकऱ्याला फायद्याची ठरतात. शेती कमी असली तरी एकमेकाच्या सहकार्यातून, योग्य नियोजनातून ती फायदेशीर होऊ शकते, हा आशावाद कायम आहे. तरुण शेतकरी केवळ अधिक उत्पादनाच्या मागे लागत असल्याने खर्चात प्रचंड वाढ होते. तुलनेने नफा कमी होतो. हे टाळण्यासाठी बिगहंगामी भाजीपाला, उत्पादन कमी असले तरी अधिक दर मिळवणे हे सूत्र त्यांनी जपले आहे. पुरंदर पाटील, ९५०३१६४२६८

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com