कृषी पर्यटन विकासाची वाट

कृषी पर्यटनाची संकल्पना ही शाश्वत आणि पर्यावरणपूरक विकासावर आधारित असून, त्यातून ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होऊ शकते.
कृषी पर्यटन विकासाची वाट

जागतिक पातळीवर पर्यटन हा व्यवसाय वेगाने वाढतोय. युरोपातील अनेक देश पर्यटन व्यवसायासाठी सवलती देऊन त्यात भरभराट साधत आहेत. पर्यटनातून व्यापारवृद्धी होऊन देशाचे परकीय चलन वाढते. कृषी पर्यटन ही संकल्पना ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा, इटली, फिलिपिन्स या देशांत चांगली रुजली आहे.

आपल्या देशातही मागील सुमारे दीड दशकापासून हा व्यवसाय झपाट्याने वाढतोय. राज्यात मोठ्या शहरांच्या आसपास ३००हून अधिक कृषी पर्यटन केंद्रे अस्तित्वात आहेत. शहरातील वाढती गर्दी आणि प्रदूषणापासून सुटकेसाठी तसेच कामाचा ताणतणाव घालविण्यासाठी पर्यटक निसर्गाच्या सानिध्यात शांतता शोधतोय. यातून कृषी पर्यटनाला चालना मिळत आहे. कृषी पर्यटन हा कृषी आणि पर्यटन या दोन व्यवसायांच्या संयोगातून पुढे आलेला व्यवसाय आहे; परंतु राज्याचा विचार करता या व्यवसायाकडे कृषी आणि पर्यटन या दोन्ही विभागा़ंचे लक्ष दिसत नाही. त्यातून कृषी पर्यटन व्यावसायिकांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत असून या व्यवसायाची म्हणावी तशी प्रगती होताना दिसत नाही. कृषी पर्यटन धोरणाचा मसुदा तीन-चार वर्षांपासून तयार असून यातील व्यावसायिक, त्यांच्या संस्था याचा सातत्याने पाठपुरावा करीत आहेत; परंतु आता कुठे कृषी पर्यटन धोरणाचा मसुदा राज्य शासनाने जाहीर केला आहे.

कृषी पर्यटन हा शेतीस पूरक एक चांगला व्यवसाय आहे. शहरी ग्राहक आणि ग्रामीण शेतकरी यांना जोडणारा हा व्यवसाय म्हणावा लागेल. या व्यवसायातून शेतमालाच्या मार्केटिंगबरोबर ग्रामीण कलाकुसरीतून निर्माण झालेल्या वस्तू, महिला बचत गटांची उत्पादने यांना आपल्या परिसरातच चांगली बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते. या व्यवसायात रोजगाराच्या अनेक संधी दडल्या आहेत.

कृषी पर्यटनाची संकल्पना ही शाश्वत आणि पर्यावरणपूरक विकासावर आधारित असून, त्यातून ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होऊ शकते; परंतु कृषी पर्यटनासाठी शेतजमिनीचा विकास करायचा म्हटले, तर कृषी विभागाच्या योजनांची मदत मिळत नाही. पर्यटकांच्या सोयीसुविधांसाठी बांधकाम करायचे म्हटले तर अनेक परवानग्या-प्रमाणपत्रांसाठी शेतकऱ्याला त्रस्त व्हावे लागते. विशेष म्हणजे व्यवसायाची सुरवात करताना १५ ते २० लाख रुपये गुंतवावे लागतात. त्यामुळे सर्वसाधारण शेतकरी इच्छा असूनही कृषी पर्यटन व्यवसायाकडे वळत नाहीत. राज्याच्या कृषी पर्यटन धोरण मसुद्यात यास शेतीपूरक व्यवसाय म्हणून मान्यता देण्याबरोबर अनेक परवानग्या-प्रमाणपत्रांच्या जाचातून मुक्तीचीही तरतूद आहे; परंतु याबाबतच्या ठोस धोरणास तत्काळ मंजुरी मिळून त्याचे कायद्यात रूपांतर व्हायला हवे. त्यानंतर या धोरणांची नियमावली ठरून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू करावी लागेल. महत्त्वाचे म्हणजे कृषी पर्यटनास बॅंकेकडून सवलतीच्या दरात कर्जपुरवठा व्हायला हवा.

कृषीशी सलग्न हा व्यवसाय हॉटेल्स, रिसॉर्ट यापेक्षा भिन्न असून यासाठी अनेक प्रकारच्या करातही सूट मिळायला हवी. असे झाल्यास सध्याच्या मोठ्या शहर परिसरात मर्यादित असलेला हा व्यवसाय तालुक्याची ठिकाणे, मोठ्या गावांमध्ये पसरू शकते. कृषी पर्यटनाच्या धोरणास मंजुरी देताना काही शहरी व्यावसायिकांकडून याचा गैरफायदा घेतला जाऊ नये, हेही पाहावे लागेल. पर्यटन विभागाने कृषी पर्यटनाबाबत लोकांमध्ये जाणीव-जागृतीची मोहीमही हाती घ्यायला हवी. वेगवेगळ्या उत्सव-महोत्सवांचे आयोजन करून पर्यटकांचा ओघ वाढवायला हवा. यात नव्याने उतरणाऱ्या व्यावसायिकांना मार्केटिंगचे धडे द्यायला हवेत. नवीन धोरणात या सर्व बाबींची काळजी घेतली; तरच कृषी पर्यटनाला राज्यात खऱ्या अर्थाने गती मिळू शकते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com