तेलबियांवरील दुर्लक्ष धोकादायक

शासनानेही तेलबिया उत्पादकांना प्रोत्साहन देण्याएेवजी बाहेरून खाद्यतेल आयातीचे धोरण ठेवले आणि इथेच मोठी चूक झाली आहे.
संपादकीय
संपादकीय

तेलबिया उत्पादनात आघाडीवरील जळगाव जिल्ह्यात तेलबियांचे क्षेत्र नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या जिल्ह्यातील करडई, भुईमूग लागवडीखालील क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट आढळून आली आहे. राज्याची स्थितीदेखील जळगाव जिल्ह्यापेक्षा वेगळी नाही. ज्या वेळी कारळ, तीळ, जवस या पारंपरिक तेलबिया पिकांबरोबर करडई, सूर्यफूल, भुईमूग ही मुख्य तेलबिया पिके राज्याच्या पीक पद्धतीत होती, त्या वेळी खाद्यतेल उत्पादनात आपण स्वयंपूर्ण होतो. परंतु सध्या पारपंरिक तेलबिया पिके तर नामशेष झाली असून, मुख्य तेलबिया पिकेही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. भुईमुगाची लागवड खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामांत दिसत असली; तरी तिन्ही हंगामांतील लागवडीखालील क्षेत्र घटत चालले आहे.

तेलबिया पिके कमी ते मध्यम कालावधीची, जिरायती पद्धतीने घेता येणारी, पीक फेरपालट आणि आंतरपीक पद्धतीस उपयुक्त अशी आहेत. तेलबियांपासून कमी क्षेत्रात बऱ्यापैकी उत्पादनही शेतकऱ्यांना मिळत होते. थोडेफार उत्पादन विकून तर उर्वरित तेलबियांपासून गाव परिसरातील घाण्यांवर तेल काढले जात होते. त्यामुळे मिळकतीबरोबर शेतकऱ्यांचा वर्षभराचा खाद्यतेलावरील खर्च वाचत होता. जवस, तीळ, करडईचे शुद्ध, आरोग्यदायी तेल खाण्यात येत होते. मुख्य म्हणजे दुधाळ जनावरांना पौष्टिक अशी पेंड मिळत होती. त्यामुळे दूध उत्पादनही अधिक मिळत होते. पुढे तेलबियांची उत्पादकता घटत गेली. शेतकऱ्यांना बाजारात योग्य दरही मिळेनासा झाला. त्यामुळे लागवड क्षेत्र आणि उत्पादनही झपाट्याने घटले. शासनानेही तेलबिया उत्पादकांना प्रोत्साहन देण्याएेवजी बाहेरून खाद्यतेल आयातीचे धोरण ठेवले आणि इथेच मोठी चूक झाली आहे.

आज आपल्याला लागणाऱ्या एकूण खाद्यतेलापैकी ६० ते ७० टक्के खाद्यतेल आपण आयात करतो. यावर मोठे परकी चलन खर्च होते. आयात करण्यात येत असलेले बहुतांश खाद्यतेल हे पामतेल असून, ते आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे. इतर तेलही शुद्ध नसून, ते भेसळयुक्त असते. अशा वेळी खाद्यतेल उत्पादनास प्रोत्साहन देऊन यामध्ये स्वयंपूर्णता साधणे देशाच्या हिताचे ठरेल. बहुतांश तेलबिया पिकांची उत्पादकता घटली आहे. सध्याच्या परिस्थितीस पूरक अशी अधिक उत्पादनक्षम वाण शेतकऱ्यांना द्यावे लागतील. याकरिता राज्यातील कृषी विद्यापीठे, देश पातळीवरील तेलबिया संशोधन संस्थांनी पुढाकार घ्यायला हवा. नवीन वाणांबरोबर त्यांचे प्रगत लागवड तंत्रही शेतकऱ्यांना द्यायला हवे. विशेष म्हणजे तेलबिया लागवडीस हंगामनिहाय प्रोत्साहनपर घसघसीत अनुदान देऊन लागवड क्षेत्रात वाढ करायला हवी.

तेलबिया पिकांना बाजारात रास्त दर मिळेल, याची हमी उत्पादकांना हवी. गावपरिसरात लहान लहान तेल घाण्यांपासून ते मोठमोठे प्रक्रिया युनिट उभे राहायला हवेत. यासाठीचे मार्गदर्शन, आर्थिक साह्य तरुणांना मिळायला हवे. असे झाल्यास आपले खाद्यतेलावरील परकीय अवलंबित्व नष्ट होऊन आपण याबाबतीत स्वयंपूर्ण होऊ. आयातीवर खर्च होणारे देशाचे मोठे परकी चलन वाचेल. ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार उपलब्ध होईल. शेतकरी कुटुंबांबरोबर ग्राहकांनाही आरोग्यदायी खाद्यतेल उपलब्ध होईल. दोन ते तीन प्रकारचे शुद्ध खाद्यतेल मिसळून खाल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो, असा एक अभ्यास सांगतो. अशा प्रकारच्या तेलांचे मिश्रण गावपरिसरातील घाण्यांवर सहज मिळू शकते. त्यामुळे खाद्यतेलात स्वयंपूर्णता हाच आपला हेतू असायला हवा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com