‘रेडी बट्टी आटा’

‘रेडी बट्टी आटा’
‘रेडी बट्टी आटा’

औरंगाबाद जिल्ह्यातील पळसगाव (ता. खुलताबाद) येथील प्रदीप भोसले व युवराज भवर या दोन तरुणांनी ‘रेडी बट्टी आटा’ (दालबाटी) या नावीन्यपूर्ण उत्पादनाची निर्मिती केली आहे. प्रक्रियेद्वारे मूल्यवर्धन, नवी संकल्पना बाजारात आणून मार्केट मिळवण्याचे प्रयत्न, कसब व व्यावसायिकता या त्यांच्या बाबी वाखाणण्याजोग्याच आहेत. टप्पा १ - अौरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील पळसगाव येथे प्रदीप भोसले या युवकाची घरची साडेपाच एकर शेती आहे. बीए पदवीधर प्रदीप पूर्वी संगणकीय प्रशिक्षण संस्था चालवायचे. मात्र त्यात मोठी स्पर्धा सुरू झाली. अधिक उत्पन्न देणाऱ्या अन्य व्यवसायाकडे वळावे असे त्यांना वाटू लागले. टप्पा २- प्रदीप यांनी वडिलांचा सल्ला घेतला. चर्चा झाली. चपातीचे रेडी पीठ तयार करायचे मनात होते. मात्र त्याला स्पर्धाही होती. वेगळे उत्पादन निवडावे व त्यासाठी मार्केट मिळवावे असे ठरवले.दालबाटी पदार्थ म्हटले की आपल्याला राजस्थानची आठवण येते. परंतु महाराष्ट्रातील विविध भागांत हा पदार्थ चांगलाच लोकप्रिय झाला आहे. काही भागांत मोठ्या कार्यक्रमातही दालबाटीचा मेन्यू ठेवला जातो. त्यातूनच दालबाटी पदार्थासाठी रेडी बट्टी आटा अर्थात रेडी पीठ हे नव्या संकल्पनेचे वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन तयार करायचे ठरवले. टप्पा ३- अडचण होती ती भांडवल व अपुऱ्या मनुष्यबळाची. मग गावातीलच सहकारी युवराज भवर यांच्यासोबत उद्योग उभारायचे ठरवले. टप्पा ४- मार्केट सर्वेक्षण अत्यंत महत्त्वाचे ठरले. सुमारे दोन ते तीन वर्षे विविध ठिकाणी फिरून बाजारपेठेचा अभ्यास केला. ग्राहकांची मानसिकता व गरज, आपल्या पदार्थाला किती मार्केट मिळू शकेल, पदार्थाची रेसीपी, भांडवल या बाबी तपासल्या. टप्पा ५- त्यानंतर स्थापन झाला प्रक्रिया उद्योग उद्योगातील ठळक बाबी असा आहे रेडी बट्टी आटा

  • गहू, मका, सोयाबीन, धने, बडीशेप, ओवा, हळद, खाण्याचा सोडा यांचे योग्य प्रमाण ठेऊन हा आटा तयार केला.
  • कोणते घटक किती प्रमाणात मिसळल्यानंतर दालबाटीला कशी चव मिळते याचे अनेक प्रयोग दोघा मित्रांनी केले.
  • पिठाच्या मिश्रणांचे स्वतःचे सूत्र (फॉर्म्युला) तयार केले.
  • उद्योग व यंत्रांची उभारणी

  • उद्योग ४५ बाय ३५ फुटांच्या पत्र्याच्या शेडमध्ये उभारला आहे. शेड उभारण्यासाठी दोन हजार रुपये प्रतिमहिन्याप्रमाणे जागा भाडेतत्त्वावर घेतली आहे. शेड उभारणीसाठी अडीच लाख रुपये खर्च आला.
  • आटा तयार करण्यासाठी लागणारे धान्य शेतकऱ्यांकडून खरेदी केले जाते.
  • ते स्वच्छ करण्यासाठी जवळच असलेल्या आत्माअंतर्गत शेतकरी गटाची मदत घेतली. या गटाकडे ‘क्‍लीनिंग अँड ग्रेडिंग मशिनरी’ आहे.
  • उद्योगासाठी ८० हजार रुपयांचे ग्राईडिंग मशिन खरेदी केले आहे. तासाला दीड क्विंटल धान्य दळण्याची त्याची क्षमता
  • दळलेले पीठ चाळण्यासाठी चाळणी स्थानिकरीत्या तयार करून घेतली. त्यासाठी ३० हजार रुपये खर्च आला. धान्य दळत असताना चक्कीतून पीठ या चाळणीत पडते.
  • सत्तर हजार रुपयांचे पॅकिंग मशिन खरेदी केले आहे.
  • वजनासाठी साडेचार हजार रुपयांचा इलेक्‍ट्रॉनिक वजनकाटा
  • एक किलोचे पॅकिंग असते. अशा वीस पिशव्या गोणीमध्ये भरून विक्रीसाठी पाठवल्या जातात. गोणी शिवण्यासाठीही ‘शिलाई मशिन’ खरेदी केले आहे.
  • मालाची वाहतूक करण्यासाठी पिकअप व्हॅन सुमारे सात लाख रुपयांमध्ये बॅंक कर्जातून घेतली आहे.
  • प्रक्रिया उद्योगासाठी एकूण सर्व खर्च किमान १४ लाख रुपये आला आहे.
  • अशी होते प्रक्रिया प्रथम मका भरडून घेतला जातो. भरडलेला मका, गहू, सोयाबीन, बडीशोप, ओवा आदी घटक नंतर एकत्र दळून बारीक पीठ तयार केले जाते. त्यात हळद व खाण्याचा सोडा मिसळला जातो. त्यानंतर प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये भरून त्या बंद केल्या जातात. या पिशव्या तयार करण्यासाठी त्याचे साधन गुजरातमधून मागवण्यात येते. अौरंगाबाद येथे प्रिटिंग करून पिशव्या बनवल्या जातात. मार्केटिंगचे प्रयत्न

  • भोसले व भवर या दोघा मित्रांचा हा व्यवसाय अलीकडील काळात म्हणजे नोव्हेंबर २०१७ च्या सुमारासच सुरू झाला. तो नवीन आहे हे निश्चित. मात्र त्यासाठी तीन वर्षांपासून सुरू असलेली धडपड, अभ्यास, जिद्द व नावीन्यपूर्ण संकल्पना मनात घेऊन ती आकारास आणण्याचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत.
  • गजराज असा ब्रॅंड तयार करून किराणा विक्री केंद्रे व हॉटेल्समधून हा आटा विक्रीस ठेवला आहे. औरंगाबाद, कन्नड, खुलताबाद, सिल्लोड, गंगापूर, वैजापूर या भागांत त्याची व्याप्ती आहे. सुरवातीला एक दोन किलोच आटा घेणारे व्यावसायिक आता २० किलोची मागणी करू लागले आहेत. ग्राहकांकडूनही त्यास चांगला प्रतिसाद असल्याचे प्रदीप यांनी सांगितले.
  • आत्तापर्यंत प्रदर्शनातून चार क्विंटल, तर एकूण दोन टन मालाची विक्री करण्यात यश.
  • वर्तमानपत्रातून माहितीपत्रक देत उत्पादनाचा केला प्रचार
  • एमआरपी - एक किलो - ५९ रु.
  • दालबाटीच्या पिठाबरोबरच गव्हाचे पीठही विकण्याचे ठरवले आहे. त्यासाठी पाच किलोचे पॅकिंग निश्चित केले आहे. त्याची १२५ रुपये ‘एमआरपी’ ठेवली आहे.
  • परवाने व लेबलिंग

  • पीठ तयार करण्यासाठी लागणाऱ्या धान्यांची खरेदी करण्यासाठी बाजार समितीकडून परवाना
  • पिठातील अन्नघटकांचे प्रमाण प्रयोगशाळेतून तपासून घेतले आहे. अन्नघटकांचे प्रमाण तसेच दालबाटी तयार करण्याची प्रक्रियाही प्रत्येक पॅकिंगवर छापली आहे. ‘फूड सेफ्टी’विषयक केंद्रीय संस्थेचाही परवाना.
  • संपर्क - प्रदीप भोसले - ९७६४०४७००४ - युवराज भवर - ९९६००३२७६९ (लेखक नांदेड येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com