शेतीमाल विक्रीसाठी पॅकिंग, ब्रॅंडिंग ठरतेय महत्त्वाचे...

शेतीमाल विक्रीसाठी पॅकिंग, ब्रॅंडिंग ठरतेय महत्त्वाचे...
शेतीमाल विक्रीसाठी पॅकिंग, ब्रॅंडिंग ठरतेय महत्त्वाचे...

बाजारसमितीमध्ये येणाऱ्या शेतीमालावरून नजर हटवून प्रत्यक्ष बाजारपेठेमध्ये ग्राहकांच्या हाती येणाऱ्या शेतीमालाकडे नजर वळवणे आवश्यक आहे. कारण प्रत्यक्ष बाजारपेठेमध्ये आकर्षक, रंगबिरंगी पॅकेजिंग आणि वेगवेगळ्या नाममुद्रा (ब्रॅंड), लोगो त्यांची रंगसंगती यांची रेलचेल दिसून येते. अनेक शेतकरी उत्पादक कंपन्यांही यात हिरिरीने उतरल्या असून, आपला ब्रॅंड लोकांच्या मनात ठसवण्यासाठी पॅकेजिंगवर भर देत आहेत. ग्राहक हा बाजारपेठेमध्ये राजा मानला जातो. अगदी आंतरराष्ट्रीय कंपन्यापासून ते स्थानिक पातळीवरील छोट्या शेतकरी उत्पादक कंपन्यांचीही ग्राहकांचे लक्ष वेधण्यासाठी, विश्वास संपादन करण्यासाठी चढाओढ सुरू असते. आपल्या कंपनीचा ब्रॅण्डवर विश्वास निर्माण व्हावा, यासाठी अत्यंत काटेकोरपणे व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब केला जातो. आजच्या घडीला बाजारपेठेमध्ये आकर्षक पॅकेजिंगला अत्यंत महत्त्व आले आहे. जागतिक दर्जाच्या कंपन्यांची बहुतांश उत्पादने आकर्षक बॅग आणि पिशव्यांमध्ये विकली जातात. अशा पॅकेजिंग आणि प्रिटींगच्या व्यवसायामध्ये इंदूर, कर्नाटक, दिल्ली, मुंबई, अहमदाबाद यासह देशाच्या विविध भागांत अनेक कंपन्या कार्यरत आहेत. मध्य प्रदेशमधील इंदूर या एकाच शहरात अशा तब्बल ३५० कंपन्या आहेत. यातील एका कंपनीची वार्षिक उलाढाल १२ कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. त्यावरूनच शेतीमाल पॅकेजिंग व्यवसायाच्या कक्षा वेगाने वाढत असल्याची स्पष्ट जाणीव होते. इंदूर येथे पॅकिंग साहित्याचा मोठा उद्योग ः

  • पॅकेजिंग आणि प्रिंटींग उद्योग इंदूर (मध्य प्रदेश) येथे चांगलाच फोफावला आहे. या परिसरामध्ये ३५० पेक्षा अधिक उद्योग कार्यरत आहेत. त्यांची वार्षिक उलाढालही प्रचंड आहे. इंदूर येथील पॅकिंग साहित्याचे निर्माते असलेल्या अनुराग राय यांनी दिलेल्या माहितीनुसार,
  • पॅकिंगकरिता असलेल्या पिशव्यांची विक्री आकार आणि वजनाच्या आधारे होते. त्याकरिता आवश्‍यक असलेला कच्चा माल अहमदाबाद आणि नेपाळवरुन येतो. पॉली क्रॉपलीन प्रकारचे हे साहित्य राहते.
  • गहू, हरभरा, मका, तांदूळ अशाप्रकारचे विविध धान्य पॅकिंग आणि ब्रॅंडिंग करण्यासाठी प्रिंटेड आणि आकर्षक पिशव्यांच्या वापर नजीकच्या काळात वाढीस लागला आहे. १० किलोपासून ५० किलोपर्यंतची पिशवी उपलब्ध आहे. दहा किलोची बॅग ९ रुपये प्रति नग, तर ५० किलोची बॅग १४ रुपये नगाप्रमाणे आहे. प्रिंटींगवरील खर्च तसेच पिशवीचा दर्जा यावरून दर निश्‍चित होतात. १० किलोच्या हॅन्डबॅगकरिता प्रती नग दहा रुपये आकारले जातात. ५०० ग्रॅम वजनाकरिता रिकाम्या पिशव्या २३० रुपये प्रति किलो मिळतात. त्यावर प्रिंटींग केल्यास त्यामध्ये अतिरिक्‍त खर्च जोडला जातो. सरासरी हा खर्च प्रिंटींग केल्यावर २६५ ते २७० रुपयांपर्यंत जातो.
  • सध्या मेटालाईट प्रकारच्या पिशव्यांना मागणी आहे. या बॅगकरिता एक किलो वजनासाठी २.५० पैसे प्रती नग याप्रमाणे दर आकारला जातो. त्यावरील प्रिटींगसाठी खास प्रिटींग सिलिंडर तयार केले जातात. सिलिंडरचा खर्च ग्राहकाला करावा लागतो. एका सिलिंडरसाठी सरासरी १२ हजार रुपयांचा एकदाच खर्च येतो. जितके जास्त रंग तितके अधिक सिलिंडर लावावे लागतात. म्हणजेच पॅकेजिंगवर एकापेक्षा अधिक रंगांमध्ये प्रिंटींग करण्यासाठी अधिक खर्च करावा लागतो.
  • बियाणे कंपन्यांसाठी खास पॅकेजिंग ः

  • नजीकच्या काळात महाराष्ट्रात शेतकरी कंपन्यांच्या माध्यमातून बियाणे प्रक्रिया उद्योग वाढीस लागला आहे. त्यांच्याकरिता स्थानिक स्तरावरही प्रिंटेड पॅकेजिंग साहित्य उपलब्ध आहे. ३० किलोच्या प्लॅस्टिक बॅग १८ ते २० रुपये प्रति नग या प्रमाणे उपलब्ध होते. त्यावर पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगातच मजकूर नोंदविलेला असतो. ग्राम बीजोत्पादनाकरिता अशा पिशव्यांचा वापर होत असल्याचे चांभई (ता. मंगरुळपीर, जि. वाशीम) येथील कृषी माऊली फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक दिलीप फुके यांनी सांगितले.
  • ग्राहकांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने खासगी बियाणे कंपन्या आपली बियाण्यांची पाकिटे अधिक आकर्षक करतात. त्यातही बीटी बियाण्यांची पाकिटे अधिक आकर्षक आहेत. त्यावर अधिक रंगाचा व अधिक गुणवत्तेच्या प्रिंटींगचा समावेश असतो.
  • सोयाबीन व अन्य तीस किलो वजनाच्या एचडीपीई पिशव्यांमध्ये मिळणाऱ्या बियाण्यांकरिता सिंगल कलर प्रिंटींगचा पर्याय वापरला जातो. अलीकडे काही बियाणे कंपन्यांनी यासाठी मल्टिकलर पिशव्यांचा वापर केल्याचे बाळखेड (ता. रिसोड, जि. वाशीम) येथील बाळनाथ शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक विलास गायकवाड यांनी सांगितले. अशा मल्टीकलर प्रिटींग असलेल्या बियाणे पोत्यांची किंमत सिंगल कलरपेक्षा दहा रुपये अधिक (म्हणजे २७ ते २८ रुपये प्रति नग) असते.
  • मल्टिकलर पॅकिंगकडे ग्राहक होतात आकर्षित घोराड (ता. सेलू, जि. वर्धा) येथील मनोज गोमासे यांनी मिरची, हळद पावडर उद्योग उभारला आहे. घोराड गावचे ग्रामदैवत केजाजी महाराज यांच्या नावावरून आपल्या उत्पादनांना केजाजी मसाले असे नाव दिले आहे. त्यासाठी खास मल्टिकलर पाऊच आणि पिशव्या छापून घेतल्या आहेत. उद्योग उभारण्यापूर्वी त्यांनी अशाप्रकारच्या पॅकिंग मटेरीयलचा शोध नागपूर व परिसरात घेतला. पॅकिंग मटेरिअल प्रिंटींग व्यवसायामध्ये कार्यरत अनेक एजंट निर्माण झाले आहेत. हे एजंट गुजरात राज्यातील विविध कंपन्यांसाठी काम करतात. अशाच एका संपर्कातून त्यांनी सुरत (गुजरात) येथील एका व्यावसायिकाकडून केवळ २२३ ते २२५ रुपये प्रति किलो दराने मल्टिकलर पॅकींग मटेरीयल मिळाले. त्याचवेळी नागपूरमध्ये अशा पद्धतीच्या पॅकिंगचा खर्च २४० रुपये प्रति किलो होता. गुजरातवरुन नागपूरपर्यंतचा वाहुतूक खर्च त्या पुरवठादाराने केला. नागपूरातील वाडी येथून गावापर्यंतच्या वाहतुकीचा खर्च मात्र त्यांना करावा लागला. किमान ३०० किलो व त्यापेक्षा अधिक वजनाची मागणी असल्यास हा सर्व खर्च परवडतो. कमी मागणीसाठी खर्च अधिक होतो. १०, २५, ५०, १०० ते २०० ग्रॅम वजनाच्या आकाराच्या पॅकेजिंगचे रोल मिळतात. ५०० ग्रॅमचा पाऊच हा पिशवीच्या तुलनेत स्वस्त पडतो. पाच किलोची आतून सिल्व्हर कोटेड, तर वरील बाजूस प्लॅस्टिक आवरण असते. त्यावर प्रिंटींग केले जात असल्याने हे पाऊच किंवा पिशव्या आकर्षक दिसतात. अशी उत्पादने ग्राहकांचे लक्ष वेधून घेतात. परिणामी त्याची उचल लवकर होत असल्याचा अनुभव मनोज गोमासे यांनी सांगितला.

    दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या पॅकिंगसाठीही शेतकरी नवनवे पर्याय वापरू लागले आहेत. वाशीम जिल्ह्यातील बालाजी कोरडे यांनी पूर्वा दूध डेअरीअंतर्गत पाकीटबंद दूध, आईस्क्रीम आणि श्रीखंडाची विक्री सुरू केली आहे. त्याकरिता श्रीखंड वाटी पाच हजार नगांपेक्षा अधिक घ्यावे लागतात. सध्या तीन रुपये प्रतिनग दराने औरंगाबाद येथील एका व्यावसायिकाकडे ही मागणी नोंदवली आहे. आईस्क्रीम कपाची किमान मागणी 25 हजार व त्यापेक्षा अधिक असावी लागते. त्या वेळी आईस्क्रीम कप 35 पैसे प्रतिनग याप्रमाणे मिळतात. कराड (जि. सातारा) येथून आईस्क्रीम कपची खरेदी केली आहे. दूध पाउचसाठी लागणाऱ्या प्लॅस्टिक पिशव्या 160 रुपये किलोप्रमाणे मिळत असल्याचे बालाजी कोरडे यांनी सांगितले.

    पूर्वी बोलणाऱ्यांचे चणे विकले जातात, आणि न बोलणाऱ्याचे सोनेही खपत नाही, अशी एक म्हण होती. थोडक्यात, विक्रीसाठी संवाद कौशल्याची आवश्यकता त्यातून व्यक्त होत असे. मात्र, बदलत्या काळात संवाद कौशल्यासोबतच आकर्षक पॅकिंग व लोकांच्या मनामध्ये ब्रॅंड ठसणे या बाबी अत्यंत महत्त्वाच्या ठरत आहेत, हेच खरे!

    संपर्क ः - बालाजी कोरडे, 9767620833 मनोज गोमासे (शेतकरी व मसाले उत्पादक ), ९९७५४७३३१४ दिलीप फुके (संचालक, शेतकरी उत्पादक कंपनी), ९९२२०१०३९९

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com