agriculturai stories in marathi, agrowon, arthkatha, dadarao hatkar, hivarkhed, khamgao, buldana yashkatha | Agrowon

शेतीलाच लावले नोकरीला !
विनोद इंगोले
सोमवार, 16 एप्रिल 2018

  एका एकरातून दरमहा उत्तम उत्पन्न आणि पेन्शन, फंड मिळवण्यासंदर्भातील नियोजन केवळ कागदावर न मांडता प्रत्यक्ष शेतीमध्ये आणण्याचा बुलडाणा जिल्ह्यातील हिवरखेड (ता. खामगाव) येथील दादाराव हटकर यांचा प्रयत्न स्तुत्य आहे. अल्पशिक्षित तरीही उद्यानपंडीत पुरस्कारप्राप्त शेतकऱ्याने चक्‍क आपल्या शेतीलाच नोकरीवर ठेवल्याचा दावा केला आहे. त्यातून दरमहा उत्पन्नांसह पेन्शन, फंडाची सोयही केली आहे.

  एका एकरातून दरमहा उत्तम उत्पन्न आणि पेन्शन, फंड मिळवण्यासंदर्भातील नियोजन केवळ कागदावर न मांडता प्रत्यक्ष शेतीमध्ये आणण्याचा बुलडाणा जिल्ह्यातील हिवरखेड (ता. खामगाव) येथील दादाराव हटकर यांचा प्रयत्न स्तुत्य आहे. अल्पशिक्षित तरीही उद्यानपंडीत पुरस्कारप्राप्त शेतकऱ्याने चक्‍क आपल्या शेतीलाच नोकरीवर ठेवल्याचा दावा केला आहे. त्यातून दरमहा उत्पन्नांसह पेन्शन, फंडाची सोयही केली आहे.

हिवरखेड येथील दादाराव हटकर (वय 53) हे मेंढपाळ. आईवडिलांसोबत मेंढ्यांमागे भटकताना त्यांचे कसेबसे तिसरीपर्यंत शिक्षण झाले. फिरण्यामुळे जगाचे अनेक रंग, वृत्ती आणि स्वभाव पाहता आल्याने अनुभवाची मोठी शिदोरी पाठीशी राहिली. त्यांना चार भाऊ आहेत. आईवडिलांसह मुलेबाळे यांचे एकूण 41 जणांचे एकत्रित कुटूंब आहे. आपण निरक्षर राहिलो तरी मुलांबाळांची शिक्षणे तरी पूर्ण व्हावीत, या उद्देशाने या बंधूंनी एका जागी थांबण्याचा निर्णय घेतला. 2004 मध्ये हिवरखेड शिवारात 200 एकर माळरान खरेदी केले. यंत्रांचा वापर करीत सपाटीकरण केले. त्यात नदी, नाल्यातील गाळ टाकत सुपीकता आणली. सुमारे 150 एकर जमीन वहितीखाली आणली. सात विहिरी आणि दोन बोअरवेलच्या साह्याने सिंचनाची व्यवस्था केली आहे. पाच भावांच्या या शेतीला पंचरत्न फार्म असे नाव दिले आहे.

दादाराव यांचे शिक्षण कमी असले तरी निरीक्षणवृत्ती अत्यंत तीक्ष्ण आहे. भटक्‍या, नोकरदार आणि शेतकरी कुटुंबाचे ते उत्तम विश्‍लेषण करतात. प्रत्येकातील चांगले गुण आपल्या कुटुबात राहावेत, या दिशेने त्यांनी काम केले. भटक्‍यावृत्तीतून बाहेर येऊन स्थिरता आणण्यासाठी दादारावांनी प्रयत्न तर सुरू केले होते. उर्वरीत दोन घटकांचे गुणदोष ते मांडतात.

त्यांच्या मते,
1) नोकरी ः
नोकरदाराला दरमहा उत्पन्न मिळते. त्यावर टुकूटुकू पण उत्तम चालते. निवृत्तीनंतर पेन्शन, फंड मिळतो. त्यावर घरदार व मुलाबाळांची लग्ने, शिक्षण होते.

2) शेतकरी ः कोरडवाहू शेतकऱ्याला उत्पन्नांची शाश्‍वती नसते. उत्पादन आले तर वर्षातून एकदा उत्पन्न मिळते. त्यावर त्याचा गुराढोरांसह सर्व प्रपंच चालवावा लागतो. खेळता पैसा फारसा नसल्याने सतत आर्थिक तंगी असते. सिंचनाची सोय असली तर नगदी पिकांची लागवड करतो. नगदी पिकामध्येही उत्पादन खर्च जास्त असल्याने कर्जबाजारीपण चुकत नाही. त्यातही एखाद्या वर्षी अस्मानी, सुलतानी किंवा बाजारदरात पीक सापडले तरी तो कर्जामध्येच अडकून पडतो. उजगरीला येत नाही.
शेतीतूनच नोकरीसारखेच फायदे कसे मिळवता येतील, याचा विचार सुरू झाला.

शेतीलाच नोकरीवर ठेवायचे...

दरमहा उत्पन्नासाठी ः सहा फळांची एकरी साठ झाडे
एक एकरवर फळबागेचे प्रयोग सुरू केले. कोकणातील लाखाची बाग या धर्तीवर संकल्पना राबवल्याचे ते सांगतात. त्यातून दरमहा उत्पन्न मिळण्याच्या उद्देशाने सीताफळ, पेरू, संत्रा, लिंबू, जांभूळ, खजूर अशा सहा फळपिकांची प्रत्येकी दहा झाडे (18 फूट बाय 18 फूट अंतरावर) लावली.

उत्पन्न मिळण्याचे महिने ः फळझाड

 • डिसेंबर व जानेवारी ः पेरू उत्पादन
 • फेब्रुवारी व मार्च ः मृग बहारातील संत्रा फळे
 • एप्रिल-मे ः महिन्यात लिंबूचे उत्पादन घेण्यावर भर राहतो.
 • जून-जुलै ः बाहडोली जांभूळाची फळे मिळतात.
 • ऑगस्ट- सप्टेंबर ः खजूर
 • ऑक्‍टोबर-नोव्हेंबर ः सीताफळ

उदा. सात वर्षांपूर्वी लावलेली दहा सीताफळ झाडे उत्पन्न देत आहेत. प्रति झाड 40 किलो फळे मिळतात. ऑक्‍टोबर-नोव्हेंबर महिन्यात साधारणपणे 50 हजार रु. उत्पन्न प्रतिमाह मिळत असल्याचा त्यांचा अनुभव आहे.

उत्पन्नाचा ताळेबंद ः
रासायनिक शेती ः एकरातील या बागेतून 2 लाख 70 हजार रुपयांचे उत्पन्न वर्षभरात मिळते. यातून रासायनिक पद्धतीने व्यवस्थापनाचा खर्च 18 हजार रुपये वजा जाता, दोन लाख 52 हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळतो, असे दादाराव सांगतात.

सेंद्रिय शेती ः सेंद्रिय पद्धतीने एक एकर व्यवस्थापनाला सहा हजार रुपये खर्च येतो. त्यात तणनियंत्रणासाठी मजुरी दोन हजार रुपये, शेणखत चार हजार रुपये धरले आहे. याचे उत्पादन थोड कमी झाले तरी बाजारात सेंद्रिय म्हणून विक्री केल्यास मागणी व दर चांगला मिळत असल्याचा त्यांचा अनुभव आहे.

पेन्शन, फंडाचीही केली सोय
शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पेन्शन व फंडाप्रमाणे उतारवयात शेतीतून मोठी रक्कम मिळाली पाहिजे. त्यासाठी वरील एका एकरामध्येच 18 फूट बाय 18 फूट अंतरावर आणखी आजनी (अंजनी), श्रीगंध चंदन, रक्त चंदन, साग, आंबा, नारळ आणि बिबा अशा सात प्रकारच्या प्रत्येकी दहा झाडाची लागवड त्यांनी केली आहे. त्यातील बिबा दोन वर्षांत, आंबा व नारळ पाच वर्षांत, श्रीगंधचंदन 12 वर्षांत, साग 15 ते 18 वर्षांत आणि रक्तचंदन 20 वर्षांत उत्पन्न देईल.

शेळ्यांच्या चाऱ्याकरिता आजनाचा पर्याय
सात वर्षांपूर्वी लावलेल्या एकरी दहा आजनी झाडांवर पाच बकऱ्यांचे वर्षभर पोट भरते. एका शेळीला 2 ते अडीच किलो आजन पाल्याची गरज भासते. यामध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक असल्याने बकरीचे वजन व दूधामध्ये वाढ होते. प्रति बकरे दहा हजार रुपये दर धरला तरी 50 हजार रुपये निव्वळ मिळतात. बकरीपासून मिळालेली दोन पिल्लांचा हिशोब धरल्यास ते 10 हजार रुपये मिळतात. आजन पाल्याला हंगामात 15 रुपये किलो, अन्य वेळी 8 ते 9 रुपये किलो दर मिळतो. बंदिस्त शेळीपालनात आजन लागवड फायदेशीर ठरते. प्रयोगातून हा फायदा लक्षात येताच गेल्या दोन वर्षांत उर्वरीत शेतात 900 आजना झाडे लावली आहेत.

रक्‍तचंदन ः 20 ते 25 वर्षांत दोन टनाचे झाड होते. त्याचा पाला, मुळे, फांद्या, छोट्या काड्या सर्व उपयुक्त असल्याने उत्तम दर मिळतो. अन्यत्र त्यांनी आठ बाय आठ अंतरावर एका एकरात सुमारे 2400 झाडे लावली.

श्रीगंधचंदन व सागाची लागवड 12 ते 20 वर्षाने उत्पन्न देण्यासाठी केली आहे. तर बिबा (प्रति झाड 3000 रु), आंबा (प्रति झाड 1000 रु.) आणि नारळ (प्रति झाड 2000 रु.) असे वर्षातून एकदा चांगले उत्पन्न देतील. यातून पेन्शन आणि फंडाची सोय होईल, असा त्यांचा विश्‍वास आहे.

कृषी विभागाच्या योजनेतून 35 बाय 35 बाय मीटर आकाराचे एक तर 44 बाय 44 मीटर आकाराचे दोन शेततळे खोदले आहेत. उपश्‍यासाठी सायफन पद्धतीचा अवलंब करतात.

बंदिस्त शेळीमेंढी पालन
हटकर यांनी आपला मेंढ्या पाळण्याचा परंपरागत व्यवसाय आता बंदिस्तपणे सुरू ठेवला आहे. त्यांच्याकडे 900 मेंढ्या व 300 शेळ्या आहेत. व्यवस्थापनाकरिता दोन मजूर कुटुंबे आहेत.

हटकर यांनी जपली प्रयोगशीलता ः

 • कुटुंबामध्ये 40 सदस्य असून, घरगुती वापरासाठी सुमारे एक एकर क्षेत्रावर सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला घेतात.
 • 200 एकरांपैकी सुमारे 150 एकर क्षेत्र ठिबकखाली आणले. 40 एकर संत्र्यापैकी गावालगतच्या वेगळ्या दहा एकर क्षेत्रामध्ये संत्रा बागेचे संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन करतात. त्यांचा दोन्ही पद्धतीचा तुलनात्मक अभ्यास चालू आहे.
 • वीज व स्वयंपाकासाठीच्या ऊर्जेत स्वयंपूर्णता मिळवण्यासाठी हाटकर सध्या 20 बाय 30 फूट आकाराचा बायोगॅस प्लॅंट उभारत आहेत. त्यासाठी सव्वा तीन लाख रुपये खर्च अपेक्षित आहेत.
 • आयुष्यामध्ये शेतीला उशीरा सुरवात केली असली तरी प्रयोगशीलतेच्या बळावर फळबाग क्षेत्रातील कामगिरीची दखल राज्य शासनासह विविध संस्थांनी घेतली आहे. त्यांना आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
 • शेतीमुळेच पाचही भावांच्या कुटुंबातील बहुतांश सर्व मुले, मुली पदवीधर करण्यात यश आल्याचे ते अभिमानाने सांगतात.

संपर्क ः दादाराव हटकर, 9921126101

फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
खारपाणपट्ट्यात कृषी विद्यापीठाने दिला...खारपाणपट्ट्यात विविध हंगामात पिके घेण्यावर...
ऊस पट्ट्यात द्राक्ष शेतीतून साधली...लातूर जिल्ह्यातील आनंदवाडी (ता. चाकूर) हे गाव ऊस...
जमिनीची सुपीकता वाढवून केळीची उत्तम...नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात बारड येथील...
एकेकाळचा मजूर परिवार झाला दोनशे एकरांचा...पुणे जिल्ह्यात इंदापूर भागातील रूई गावाच्या...
महाजन बंधूंचे केळीसाठी अत्याधुनिक...तांदलवाडी (जि. जळगाव) येथील प्रेमानंद व प्रशांत...
रोजंदारी सोडून डोंगराळ भागात प्रयोगशील...तळेरान (ता. जुन्नर, जि. पुणे) या आदिवासी डोंगराळ...
कणसे यांच्या उत्कृष्ठ पेढ्यांचा कृष्णा...पुणे जिल्ह्यात वाखारी (ता. दौंड) येथे स्वतःची एक...
शहापूर झाले १४० शेततळ्यांचे गाव शहापूर (जि. नांदेड) गावाने जिल्ह्यात शेततळ्यांची...
लोकसहभाग, श्रमदानातून लोहसर झाले ‘आदर्श...नगर जिल्ह्यातील लोहसर (खांडगाव) येथील गावकऱ्यांनी...
शतावरी, लिंबू पिकातून पीकबदल. इंदापूर...बाजारपेठ व औद्योगिक क्षेत्राची मागणी पाहून शेतकरी...
लाडू, सुका मेव्याची लिज्जत  गोडंबीने...लाडू, सुकामेवा आदी पदार्थ तयार करण्यासाठी काळा...
बीई एमबीए तरुणाची ‘हायटेक’ शेती धामनगाव रेल्वे (जि. अमरावती) येथील राम मुंदडा या...
दुष्काळात ठिबकवरील ज्वारीने दिला मोठा...परभणी जिल्ह्यातील ईळेगांव येथील काळे बंधूंनू...
‘सह्याद्री’ शेतकरी कंपनीकडून...नाशिक जिल्ह्यातील मोहाडी येथील सह्याद्री फार्मर्स...
दुग्ध व्यवसायातून सावरले अल्पभूधारकाने...आठ वर्षांपूर्वी कुटुंब विभक्त झालं. त्यातून अल्प...
‘क्लिनिंग-ग्रेडिंग’ यंत्राद्वारे  ‘ए वन...कवठेमहांकाळ (जि. सांगली) येथील सुनील महादेव माळी...
दुष्काळातही शिवार समृद्ध करण्याचे...पिकांची विविधता, पूरक उद्योगांचेही वैविध्य,...
केळीसह हळदीची तंत्रयुक्त शेती केली...जळगाव जिल्ह्याच्या सीमेलगत मध्य प्रदेशातील...
बहुवीध पीक पद्धतीमुळे दुष्काळातही...लातूर जिल्ह्यातील तेलगाव (ता. अहमदपूर) येथील...
वधारला गवारचा बाजार; दुष्काळात मोठा आधारसोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत पाच-सहा...