‘बनेश्वर’च्या हुरड्याची लज्जतच न्यारी !

बनेश्वरच्या हुरड्याची लज्जतच न्यारी
बनेश्वरच्या हुरड्याची लज्जतच न्यारी

ज्वारीचा हुरडा, त्यासोबत लसणाची किंवा कारळ्याची चटणी या मेन्यूचे नुसते नाव काढले तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. कधीतरी लहाणपणी शेतात हुंदडून खाल्लेल्या हुरड्याच्या आठवणीने शहरी लोकांच्या आठवणी हुळहुळ्या बनतात. ज्वारीचा हुरडा तयार होण्याची लोक वाट पाहत असतात. या बाबीचा उपयोग करून आपला शेतीव्यवसाय फायदेशीर करण्याची कल्पना राबवली आहे ती पुणे जिल्ह्यातील नसरापूर (ता. भोर) येथील कृष्णा सोपान फडतरे यांनी. वास्तविक सोलापूर, नगर या ज्वारी उत्पादक पट्ट्यामध्ये हुरडा पार्टी हा प्रकार प्रामुख्याने आपल्या नातलगांसह मित्रमंडळींसाठी केला जातो. पावसाचे प्रमाण अधिक असलेल्या भोर तालुक्यामध्ये हुरडा पार्ट्या हा प्रकार फारसा होत नाही. इथे ज्वारी खाण्यासाठी आणि कडब्यासाठी केली जाते. अशा वेळी चार एकर ज्वारीची लागवड खास हुरडा पार्ट्यांसाठी करत कृष्णा सोपान फडतरे यांनी आघाडी घेतली. कारण त्यांचे शेत हे बनेश्वर महादेव मंदिर व पावसाळ्यात धो धो वाहणाऱ्या धबधब्याच्या परिसरात आहे. येथे पर्यटकांची सतत वर्दळ असते. कोणतीही कल्पना मनात आली की तिचा पुरेपुर पाठपुरावा करण्याची कृष्णा आणि त्यांचे मित्र श्यामसुंदर जायगुडे यांची नेहमीची सवय. त्यामुळे केवळ हुरडा पार्टी करताना अन्य कोणत्या सुविधा पर्यटकांना देता येतील, या अनुषंगाने त्यांची शेतामध्ये मांडणी केली. अगदी शेतापर्यंत चारचाकी रस्ता तयार करण्यापासून तयारी करावी लागली. आता त्यांनी शेतामध्ये हुरड्यासोबतच शिवार फेरी, बैलगाडी सफर, ग्रामीण खेळांच्या सुविधा यांची उभारणी केली आहे.

वर्षअखेर लोकांच्या उत्सवी मनोवृत्तीचा फायदा घेण्यासाठी या वर्षी २२ डिसेंबर ते १० जानेवारीपर्यंत हुरडा पार्ट्यांचे आयोजन सुरू केले आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी बंगलोर महामार्गावर व पुणे शहरामध्ये अनेक ठिकाणी होर्डिंग लावले. स्थानिक रेडिअाेवर दोन ते तीन प्रकारच्या जाहिराती सातत्याने सुरू आहेत. त्यामुळे पुण्यातून लोक आगाऊ बुकिंग करून येत आहेत. २२ तारखेपासून ३० तारखेपर्यंत सुमारे ६०० लोकांनी याचा फायदा घेतला. असा असतो ग्रामीण अनुभव...

  • संपूर्ण दिवसाचे नियोजन ः सकाळी नऊपासून संध्याकाळी सहापर्यंत पर्यटक शेतीचा आनंद घेतात. त्यासाठी प्रति व्यक्ती चारशे रुपये असा दर त्यांनी ठेवला आहे.
  • त्यात सकाळच्या नाष्ट्यासह दुपारचे जेवण असते. यात ज्वारीची भाकरी, पिठले, वांग्याचे भरीत, ताक किंवा मठ्ठा, एखादा गोड पदार्थ असतो.
  • दुपारी तीननंतर आगोट्या पेटवून ज्वारीची कणसे भाजून गरम गरम मळून देण्याचे काम सुरू होते.
  • सोबतच अन्य रानमेवाही दिला जातो. त्यात प्रामुख्याने भुईमुगाच्या शेंगा भाजून, मक्याची कणसे व पावट्याच्या शेंगा उकडून दिल्या जातात.
  • यासोबत तोंडी लावण्यासाठी शेंगदाणे, खोबरे, कारळा आणि लसूण अशा चार प्रकारच्या चटण्या असतात.
  •  जत्रेतील गोडी शेव व रेवड्याही ठेवल्या जातात.
  • ग्रामीण खेळांमध्ये विटी दांडू, लगोरी, सुरपारंब्या यासह क्रिकेट, बॅडमिंटन अशा खेळाचे साहित्यही ठेवले आहे. त्यामुळे मुलांसह त्यांचे पालकही त्याचा आनंद घेतात.
  • लोकांचा एवढा प्रतिसाद पहिल्याच प्रयत्नाला मिळेल, अशी अपेक्षा नव्हती. स्वतःची चार एकर ज्वारी तर कधीच संपली. आता नगर येथून हुरड्याची ज्वारी मागवण्याची वेळ येत आहे. शहरी जीवनातील ताणतणाव विसरण्यासाठी अनेक लोक सहकुटुंब आणि मित्रांसह येत असून, दिवसभर शेतीच्या शांत वातावरणामध्ये रममाण होतात. समाधानाने तृप्त होतात. त्यामुळे काही लोक तर आठ दिवसांतून दोन वेळा आल्याचे कृष्णा फडतरे यांनी सांगितले.

    संपर्क ः 9881893208

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com