agriculturai stories in marathi, agrowon, bonsai gardening by parjakta kale | Agrowon

तेहेतीस वर्षांपासून ‘बोन्साय’ कलेचा ध्यास
सतीश कुलकर्णी
बुधवार, 21 फेब्रुवारी 2018

पुणे येथील प्राजक्ता काळे यांनी ३३ वर्षांपासून बोन्साय निर्मितीचा ध्यास घेतला आहे. तीन हजारांहून अधिक बोन्साय कलाकृती त्यांनी अथक प्रयत्नांतून तयार केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर या कलेला ओळख आणि विस्तार करण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. या ध्यासापोटीच आजवर एकही बोन्साय विकले नाही.   

पुणे येथील प्राजक्ता काळे यांनी ३३ वर्षांपासून बोन्साय निर्मितीचा ध्यास घेतला आहे. तीन हजारांहून अधिक बोन्साय कलाकृती त्यांनी अथक प्रयत्नांतून तयार केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर या कलेला ओळख आणि विस्तार करण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. या ध्यासापोटीच आजवर एकही बोन्साय विकले नाही.   

   पुणे येथील प्राजक्ता काळे यांची पूर्वीची अोळख केवळ गृहिणी अशी होती. घरच्या बागेत विविध झाडांचे संगोपन करण्यात त्या रमून जात. अशातच १९८४ मध्ये सकाळ वर्तमानपत्रात परसबाग सदरामध्ये बोन्सायविषयक कार्यशाळेची माहिती त्यांना कळाली. आवडीपोटी तेथे प्रशिक्षण घेतले. पुस्तकांतून बोन्सायसंबंधीचा व्यासंग वाढवला. हे स्वयंशिक्षण अगदी दोन हजार सालापर्यंत सुरू होते.  

बोन्सायचा लागला छंद
त्यातच भर म्हणून की काय फर्ग्युसन महाविद्यालयातील रोपवाटिका विकास (नर्सरी डेव्हलपमेंट) अभ्यासक्रमाची माहिती मिळाली. तेथे प्रवेशही घेतला. तेथे ‘बोन्साय’ची कला, त्याचे शास्त्र आणि त्याचा छंद असलेली मित्रमंडळी मिळाली. मग प्राजक्ता यांनी मागे वळून पाहिलेच नाही. अापल्या अभ्यासू गटासह त्यांनी बोन्साय कला जोपासणाऱ्या देशांचे दौरे केले. कार्यशाळेत सहभाग घेतला. त्यातून या विषयातील दृष्टी अधिक विशाल झाली.

दृष्टिकोन व्यापक
सन २००१ मध्ये इंडोनेशियामध्ये रुडी नजॉन हे बोन्साय मास्टर भेटले. त्यांनी या कलेबद्दल वेगळा दृष्टिकोन दिला. पूर्वी त्या त ‘वायरिंग’द्वारे झाडांना आकार देत असत.  रुडी यांनी क्लिपिंग ॲण्ड ग्रोईंग (कापा आणि वाढवा) चे तंत्र शिकवले. फांदीवरील डोळा पाहून नेमका तो कोणत्या दिशेने वाढवायचे हे तंत्र प्राजक्ता शिकल्या. कोणतीही विद्या गुरूमुखातून येताच लवकर फुलते, असे म्हणतात ते खरे ठरले. प्राजक्ता या तंत्रात पारंगत झाल्या. 

खोचक उद्‍गार ठरले प्रगतीचे कारण
सन २००८ मध्ये प्राजक्ता यांना जपानला ‘कन्व्हेशन’साठी जाण्याची संधी मिळाली. तेथील काही तज्ज्ञांना भारतात येण्याचे आमंत्रण देताच एकाने भारतात खरे बोन्साय आढळत नसल्याने कशाला यायचे, असा उलटा सवाल केला. ते खोचक उद्‍गार प्राजक्ता यांच्या मनाला लागले. या कलेकडे भारतात महिलांची हौस म्हणूनच पाहिले जाते. अन्य बहुतांश देशांमध्ये या कलेत पारंगत व्यक्ती पुरुष आहेत. आपणही एकटेदुकटे काम करत राहण्यापेक्षा संस्थात्मक काम करूया असे प्राजक्ता यांनी ठरवले. त्यातून २०१२ मध्ये सुचेता अवदानी, कामिनी जोहारी, राहुल राठी आणि मार्क डिक्रुज या समविचारी मित्रांसोबत ‘बोन्साय नमस्ते’ ही संस्था त्यांनी सुरू केली. आज संस्थेने चांगले मूळ धरले आहे. पती गिरीधर काळे, सल्लागार म्हणून जनार्दन जाधव यांची त्यांना मोठी मदत होते.
 
घरच्या बागेपासून विस्तार (विस्ताराचे टप्पे)

 • सुरवातीला घरची, मग पती गिरीधर काळे यांच्या ॲटो कंपनीची बाग असे करत बेबडओहोळ (ता. मावळ, जि. पुणे) येथे तीन वर्षांसाठी सुमारे आठ एकर क्षेत्र कराराने घेतली. येथे तीन हजारांहून अधिक बोन्सायची झाडे बनविली.
 •  आजवरच्या ३३ वर्षांच्या कालावधीत एकाही बोन्सायची विक्री नाही.
 •  सुमारे २५०० बोन्साययोग्य झाडांची     जमिनीत लागवड. त्यानंतर दीड वर्षापूर्वी ती पॉटमध्ये घेतली.
 •  प्रदर्शनातील कार्यशाळा, प्रात्यक्षिकांसाठी त्यांचा वापर करण्याची योजना.  
 •  संपूर्ण प्रवासात पतीसोबत मुले, विशेषतः सासू कावेरीबाई यांनी मोलाची साथ  

इतिहास...

 •  प्रामुख्याने जपानी कला. मात्र प्राचीन भारतीय ग्रंथामध्ये ‘वामनवृक्ष कला’ नावाने उल्लेख.
 •  प्राचीन ऋषी मुनी जंगलातून औषधी वनस्पतींचे पंचांग गोळा करीत. पुढे हे वृक्ष कुंड्यांमध्ये वाढवू लागले. वर्षभर त्यांची खुडणी होत राहिल्यामुळे ती छोटी राहत. (वामनवृक्ष).    
 •  बौद्ध धर्माच्या प्रसाराबरोबरच त्याचा जगभर प्रसार झाला. जपानने निगुतीने सांभाळ करीत कलेची प्रतिष्ठा मिळाल्याने ती चांगलीच बहरली.  

सध्याच्या अडचणी

 • प्रशिक्षणाचा अभाव.
 • दरडोई कमी क्षेत्र.
 • प्री बोन्साय मटेरिअलची कमी उपलब्धता.
 • शासकीय व संशोधनात्मक पातळीवर दुर्लक्ष.

    व्यावसायिक संधी

 • वैविध्यपूर्ण विविध हवामान व प्रचंड जैवविविधता यामुळे भारतात सुमारे १५ हजार प्रकारची झाडे बोन्साय होऊ शकतात.
 • जमिनीत झाडाची वाढ करून सात ते आठ वर्षापर्यंत फारशी खोल मुळे जाणार नाहीत याकडे लक्ष द्यावे लागते. तोपर्यंत त्यास योग्य आकार देणे, एकाआड एक फांद्या ठेवणे, झाड निमुळते होईल याकडे लक्ष द्यावे. दहा ते बारा वर्षांत चांगले बोन्साय तयार होते.  
 • बोन्साय करणाऱ्यांसाठीही प्री बोन्साय मटेरिअल उपलब्ध करणे हा देखील चांगला व्यवसाय.
 •  तीन ते आठ वर्षे वयाच्या पुढील झाडांना दोन ते १० हजार रुपयांपर्यंत किंमत मिळते. झाड जितके जुने तितकी किंमत वाढते.  
 • बोन्सायसाठी सिमेंट, प्लॅस्टिक किंवा सिरॅमिकच्या पसरट कुंड्या लागतात. विशिष्ट माती तयार करावी लागते. त्यांचाही व्यवसाय होऊ शकतो.

शेतकऱ्यांसाठी बाेन्साय नव्हे बोनस...
प्राजक्ता म्हणतात की, जपानसह अनेक देशांत प्री बोन्साय झाडांचे बाजार आठवड्यातून एक, दोन वेळा भरतात. त्यातून शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा मिळतो. तज्ज्ञांना बोन्साय करण्यासाठी चांगली झाडे उपलब्ध होतात. बोन्साय निर्यातीतून जपान लक्षावधी डॉलर्सचे परकीय चलन मिळवतो. आपले शेतकरीही शेताच्या एका जागेत किंवा बांधावर प्री बोन्साय झाडे किंवा बोन्साय तयार करून फायदा मिळवू शकतात. मूळ पिकावर त्याची सावलीही पडत नाही. भारतातील फायकस वनस्पती लोकांना खूप आवडते. त्यात विविधताही भरपूर आहे. केवळ या जातीवर काम केले तरी निर्यात उद्योग उभा राहू शकतो. इच्छुक शेतकऱ्यांसाठी संस्थेद्वारे प्रशिक्षण देणार असल्याचे प्राजक्ता यांनी सांगितले.   

 बोन्साय म्हणजे काय?

 • जपानी शब्द. त्याचा अर्थ छोट्या कुंडीतील झाड. (बोन म्हणजे छोटी कुंडी आणि साय म्हणजे झाड.)
 • मोठ्या झाडाची छोटी जिवंत प्रतिकृती!
 • अनेक फांद्या व पसरट असलेल्या झाडांचे बोन्साय होऊ शकते.
 • झाड वाढताना छाटणीद्वारे त्यास योग्य व कलात्मक आकार दिला जातो. त्यांना नेहमीच्या झाडांसारखीच फुले, फळे येतात.

बोन्सायचे आकारानुसार प्रकार  

 • बोटावर मावणारे-‘मामे’ बोन्साय.
 • तळहातावर मावणारे- ‘शोहीन’.
 • त्यापेक्षा थोडे मोठे-छोटे, मध्यम, मोठे  
 • एक मीटरपेक्षा जास्त- एक्स्ट्रा लार्ज

 आंतरराष्ट्रीय परिषद, प्रदर्शन

 • प्राजक्ता यांनी पुढाकार घेत व मित्रांच्या साह्याने त्याचे केले आयोजन
 • २२ ते २५ फेब्रुवारी, प्रवेश फी नाही.
 • स्थळ- सिंचननगर, कृषी महाविद्यालय मैदान, शिवाजीनगर, पुणे.
 • वेळ- सकाळी ९ ते रात्री १०  

 प्रदर्शनातील वैशिष्ट्ये

 • पिंपळाच्या पानांच्या आकारात आखणी एक हजाराहून विविध प्रकारचे बोन्साय.
 • दहा विभाग. पुस्तकांचे प्रदर्शनही.
 • एक मीटर उंचीचे सर्वांत जुने १५० वर्षांचे उंबराचे तर केवळ तीन इंच उंचीचे सर्वात लहान बोन्साय.
 • बेल्जियम, इटली, इंडोनेशिया, जपान, इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, व्हिएतनाम अादी सुमारे १६ देशांतील बोन्साय मास्टर्सचे लाभणार मार्गदर्शन.

संपर्क : बोन्साय नमस्ते, ८४११००९२६५,
७७९८२८४७४७

ई मेल : office@bonsainamaste.com

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
कोल्हापुरी गुळाचा गोडवा यंदा वाढणारकोल्हापूर : यंदाच्या पावसाळ्यात गुजरात,...
कमी दरांवरून जिनर्सचा ‘सीसीआय’च्या...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
होय, आम्ही बदलू शेतीचे चित्र... ‘शाळेत सुरू असलेल्या कृषी शिक्षण अभ्यासक्रमातून...
‘पंदेकृवि’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा...अकोला :  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
शेतीपासून जितके दूर जाल तितके दुःख...पुणे : शेतीशी जोडलेली माणसं ही निसर्ग आणि मानवी...
नाबार्डच्या व्याजदरातच जिल्हा बँकांना...मुंबई : राज्य बँकेला नाबार्डकडून मिळणाऱ्या...
कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...पुणे : कोकण अाणि पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...
अकोला, बुलडाणा जिल्ह्यांत कोरडवाहू...अकोला : अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात कोरडवाहू...
अठरा गावांनी केली कचऱ्यापासून गांडूळखत...गावे आणि वाडीवस्त्याही स्वच्छतेत अग्रभागी...
‘सीसीआय’च्या खरेदीला दिवाळीत मुहूर्तमुंबई : देशातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक...
सिंचन योजनांचे अर्थसाह्य महामंडळाच्या...मुंबई : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतील...
मुरघास : चाराटंचाईवर उत्तम पर्यायउन्हाळ्यामध्ये किंवा चारा तुटीच्या काळात...
बाजारात टंचाईमुळे ‘पांढऱ्या सोन्या'च्या...जळगाव ः देशात कापसाची सर्वाधिक सुमारे ४० लाख हेक्...
दिवसा वीजपुरवठ्याचे स्वप्न प्रत्यक्षात...मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषी पंप...
विजयादशमीनिमित्त फुलांना मागणी वाढलीपुणे ः गुरुवारी (ता. १८) साजऱ्या हाेणाऱ्या...
कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाची...पुणे: राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरू...
मराठवाड्यात यंदा शेतकऱ्यांचे...औरंगाबाद : कमी पाऊस आणि मोठा खंड यामुळे...
ऊर्जा विभागाच्या योजनांचा शेतकऱ्यांना...मुंबई  : ऊर्जा विभागाने लोकहिताच्या व...
राज्यात २७ लाख हेक्टरवर होणार ज्वारी...पुणे : केंद्र सरकारच्या नव्या धोरणाप्रमाणे...
सणासुदीत अर्थकारण उंचावणारे पेरीडकरांचे...गणपती उत्सवापासून ते अगदी दसरा, दिवाळीस तुळशीच्या...