लिंबूवर्गीय फळपीक सल्ला

लिंबूवर्गीय फळपीक सल्ला
लिंबूवर्गीय फळपीक सल्ला

उन्हाळ्यामध्ये वाढ होत असून, झाडाभोवती ओलावा टिकवण्याकडे लक्ष द्यावे. या काळात कोळी किडीचा प्रादुर्भाव वाढू शकतो, त्यांच्या नियंत्रणासाठी काळजी घ्यावी. सिंचन व्यवस्थापन आंबिया बहाराची फळे, झाडावर टिकण्यासाठी संत्रा बागेमध्ये नियमित पाणी देणे सुरू ठेवावे. उन्हाचे प्रमाण वाढत असून, तापमानामध्ये वाढ झाल्याने पाण्याच्या पाळ्यांमधील दिवसाचे अंतर ६ ते ७ दिवसांचे करावे.

पाण्याचे प्रमाण ः

संत्रा व मोसंबी   १ वर्षाच्या झाडाला १४ लिटर पाणी प्रतिदिवस प्रतिझाड द्यावे. २ वर्षांच्या झाडाला दुप्पट (२८ लिटर), ३ वर्षांच्या झाडाला तिप्पट (५६ लिटर), ८ वर्षांच्या झाडाला १६३ लिटर आणि १० वर्षे व त्यावरील वयाच्या झाडाला २०४ लिटर/दिवस/झाड द्यावे.

लिंबू १ वर्षाच्या झाडाला ११ लिटर पाणी प्रतिदिवस प्रतिझाड द्यावे. २ वर्षांच्या झाडाला १६ लिटर; तर ८ वर्षाच्या झाडाला ६५ लिटर आणि १० किंवा त्या पेक्षा अधिक वयाच्या झाडाला १०० लिटर/ दिवस/झाड पाण्याची गरज असते.

आच्छादन   झाडाभोवती ओलावा टिकून राहण्यासाठी शेतातील गवत, तणस, गव्हांडा, कुटार यांचा ५ ते १० सें. मी. थर देऊन झाडाभोवती आच्छादन करावे. यामुळे बाष्पीभवन कमी होते.  आंबिया बहाराची फळगळ कमी होण्यास मदत होते. खत व्यवस्थापन एक वर्ष वयाच्या संत्रा झाडास १०८ ग्रॅम युरिया किंवा २५० ग्रॅम अमोनियम सल्फेट व १५७ ग्रॅम सिंगल सुपर फाॅस्फेटसोबत २५ ग्रॅम झिंक सल्फेट, २५ ग्रॅम फेरस सल्फेट आणि २५ ग्रॅम मॅंगेनिज सल्फेट द्यावे. दोन वर्षांच्या झाडास दुप्पट, तीन वर्षांच्या झाडास तीनपट व चार किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या झाडासाठी चौपट खत मात्रा द्यावी. प्रत्येक झाडाला वरील रासायनिक खते २० ते २५ किलो शेणखतात मिसळून द्यावीत. बांगडी पद्धतीने खते द्यावीत. ती देताना माती ओलसर असावी.

कीड व्यवस्थापन खोड किडा : दुर्लक्षित आणि अस्वच्छ बागेत या झाडाची साल खाणाऱ्या अळीचा उपद्रव अधिक दिसून येतो. अळी दोन फांद्यांच्या सांध्यात छिद्र करते, ज्यात ती दिवसभर आराम करते. रात्री बाहेर पडून बुंध्याची व फांद्याची साल खाते. कीडग्रस्त फांद्या व झाडांचे आयुष्य आणि उत्पादन क्षमतेत घट होते. सर्व प्रथम कीडग्रस्त भागावरील जाळे काढून अळीच्या छिद्राजवळील भाग साफ करावा. नंतर डायक्लोरव्हाॅस* १० मि.लि. प्रतिलिटर पाणी या प्रमाणे द्रावण पिचकारीच्या साहाय्याने छिद्रात टाकावे. नंतर छिद्र कापसाच्या बोळ्याने बंद करावे. कोळी : संत्र्यावरील कोळी पानातील आणि आंबिया बहाराच्या लहान फळातील रस शोषून घेतात. पानांचा पृष्ठभाग राख किंवा धूळ साचल्याप्रमाणे धूळकट दिसतो. पानांच्या वरील भागाला फिकट गोलाकार चट्टे पडतात. पानाच्या खालील भागावर असे चट्टे आढळत नाहीत. त्याचप्रमाणे फळांवर मोठे, चंदेरी वा करड्या रंगाचे चट्टे पडतात. कोळी नियंत्रणासाठी, फवारणी प्रतिलिटर पाणी डायकोफाॅल २ मि.लि. किंवा सल्फर ३ ग्रॅम किंवा प्रोपरगाईट १ मि.ली. किंवा ईथिआॅन २ मि.ली. पुढील फवारणी १५ दिवसांनंतर आवश्यकतेनुसार करावी. फळगळ व्यवस्थापन

  •  अांबिया बहार संत्रा पिकाची फळगळ थांबवण्यासाठी, फवारणी प्रति १०० लिटर पाणी
  • जिबरेलिक आम्ल (१५ पी.पी.एम.) १.५ ग्रॅम अधिक एक किलो युरिया अधिक कार्बेन्डाझीम १०० ग्रॅम.
  • वाळलेल्या फांद्या खालील बाजूने ओला भाग दोन सें.मी.पर्यंत कापला जाईल, अशा प्रकारे काढून टाकाव्यात. त्यानंतर अशा झाडावर कार्बेन्डाझीम १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. फवारणीने संपूर्ण झाड ओले करावे.
  •  रोपवाटिका व्यवस्थापन रोपवाटिकाधारकांनी पन्हेरी उगवण करण्यासाठी १ भाग काळी माती, १ भाग वाळू व १ भाग कुजलेले शेणखत मिश्रण तयार करून घ्यावे. सिमेंट काँक्रिटच्या प्लॅटफाॅर्मवर १.५ फूट जाडीचा थर करून मिश्रण पसरावे. ते चांगल्या प्रकारे पाण्याने ओले करावे. यावर १०० मायक्राॅन जाडीचा पारदर्शक अल्ट्रा व्हाॅयलेट प्रकाश सहनशील पाॅलीथिन पेपरने झाकावे. झाकल्यानंतर चारी बाजूने हे पाॅलिथिन मातीने बंद करावे.

    डाॅ. एम. एस. लदानिया, ०७१२-२५००३२५  दिनकर नाथ गर्ग, ९७६६६९९३५२ (केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था, नागपूर)

    टीप : केंद्रीय कृषी मंत्रालयातर्फे सन २०१९ पासून डायक्लोरव्हास* च्या वापरावर बंदी घातलेली आहे. मानवी आरोग्य, पर्यावरण आणि जलस्रोतावर परिणाम होणार नाही, यादृष्टीने याचा वापर करावा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com