गव्हावरील तांबेरा रोगाचे नियंत्रण व्यवस्थापन

गहू तांबेरा रोगाचे नियंत्रण व्यवस्थापन
गहू तांबेरा रोगाचे नियंत्रण व्यवस्थापन

गहू पिकावर काळा किंवा नारंगी तांबेरा या रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यांच्या नियंत्रणासाठी प्रतिकारक्षम जातींच्या पेरणीसह एकात्मिक उपाययोजना कराव्यात. १) काळा तांबेरा/खोडावरील तांबेरा ः रोगकारक बुरशी ः Puccinia graminis tritici     ही बुरशी गहू, जव गहू व बारबेरी या वनस्पतींवर आपला जीवनक्रम पूर्ण करते.

प्रसार ः

  • रोगाचा प्रादुर्भाव हवेद्वारे वाहून आलेल्या बिजाणूमुळे प्रामुख्याने पाने, खोड, कुसळ व ओंबीवर; तसेच पानाच्या मानेवर आढळून येतो.
  • पानावर किमान ६ ते ८ तासांकरिता ओलावा किंवा दव साचलेले असल्यास व १५ ते २४ अंश सेल्सिअस तापमानात रोगाचा प्रादुर्भाव वेगाने होतो.
  • लक्षणे ः

  • प्राथमिक अवस्थेत हा रोग पानाच्या वरच्या व खालच्या बाजूवर दिसून येतो. रोग प्रादुर्भावामुळे हरितद्रव्य नष्ट होऊन पानांवर अंडाकृती ते लांब आकाराचे पांढरे ठिपके दिसून येतात.
  • अनुकूल हवामानात त्या ठिकाणी बुरशीच्या तांबूस विटकरी रंगाच्या युरेडीओस्पोअर तयार होतात. त्यामध्ये असंख्य बिजाणू (युरेडिया) असतात.
  • युरेडिओस्पोअरची एक पिढी पूर्ण होण्यासाठी १० ते १५ दिवस लागतात. अनुकूल हवामानात पिकाच्या बाल्यावस्थेत रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास नुकसानीचे प्रमाण अधिक असते. गव्हाच्या दाण्यांना सुरकुत्या पडून, त्याच्या झिऱ्या होतात. उत्पादनात १०० टक्‍क्‍यांपर्यंत घट होते.
  • जीवनक्रम ः गव्हावरील काळा तांबेरा हा बुरशीचे लैंगिक जीवनचक्र पूर्ण होण्यासाठी आवश्‍यक बारबेरी व महोनिया या दुय्यम पर्यायी पोषक वनस्पतींची सुदैवाने भारतामध्ये उपलब्धता नाही. जीवनचक्रात काळा तांबेऱ्याच्या अलैंगिक अवस्था गहू पिकावर पूर्ण होतात. त्याचा प्रसार हवेद्वारे होतो.

    २) नारिंगी तांबेरा/पानावरील तांबेरा ः रोगकारक बुरशी ः Puccinia recondita प्राथमिक अवस्थेत प्रामुख्याने पानाच्या वरच्या भागावर रोगाचा प्रादुर्भाव असल्याने पानावरील तांबेरा असेसुद्धा म्हणतात. या रोगामुळे गहू पिकाचे काळा व पिवळा तांबेरा रोगापेक्षा अधिक नुकसान होते.

    प्रसार ः प्रामुख्याने हवेद्वारे वाहून आलेल्या बिजाणूमुळे होतो.

  • पानावर रोग प्रादुर्भाव झाल्यानंतर गोलाकार ते अंडाकृती आकाराचे लहान ठिपके दिसून येतात. पानावर किमान ३ तास दव साठलेले असल्यास, व हवेतील तापमान २० अंश सेल्सिअस असल्यास प्रादुर्भाव होतो. अनुकूल हवामानात १० ते १४ दिवसांत रोगाची लक्षणे दिसतात. कालांतराने ठिपक्‍यांच्या जागी असंख्य बिजाणू तयार होऊन ठिपक्‍यांचा रंग नारंगी ते गर्द नारंगी दिसू लागतो. रोगग्रस्त पानावरून बोट फिरविल्यास नारंगी रंगाची पावडर बोटावर दिसून येते.
  • रोगाची लागण शेंड्यापर्यंत तीव्र प्रमाणात फुलोऱ्यापूर्वी झाल्यास उत्पादनात ८० टक्‍क्‍यांपर्यंत घट येते. बाल्यावस्थेत रोगाची लागण झाल्यास रोपे फुलोऱ्यापूर्वी मृत होतात.
  • जीवनक्रम ः नारिंगी तांबेरा स्वपेरणी गव्हावर युरेडिया ते युरेडियाचे अलैंगिक जीवनचक्र पूर्ण करतो. युरेडिओस्पोअर पानावर पडल्यानंतर पानावरील दवामध्ये ३० मिनिटांत १५ ते २५ अंश सेल्सिअस तापमानात उगवतात. या तापमानात ७ ते १० दिवसांत आपले जीवनचक्र पूर्ण करतात.

    रोगनियंत्रणासाठी उपाययोजना

    1. रोगप्रतिकारक्षम जातींची पेरणी करावी.
    2. तांबेरा रोगाला प्रतिकारक्षम जाती ः फुले समाधान, नेत्रावती, त्र्यंबक, एनआयएडब्ल्यू-३४, गोदावरी, पंचवटी.
    3. परिसरातील शेतकऱ्यांनी एकाच जातीची पेरणी करण्याऐवजी प्रतिकारक्षम विविध गहू जातींची पेरणी करावी. पेरणी केलेल्या क्षेत्रात अंतर ठेवावे.
    4. गव्हाची पेरणी थंडीला सुरवात झाल्यावर १५ नोव्हेंबरच्या पर्यंत करावी. उशिरा पेरणीसाठी फुले समाधान किंवा एनआयएडब्ल्यू-३४ हे तांबेरा प्रतिकारक्षम वाण पेरावे.
    5. संशोधन केंद्राच्या शिफारशीप्रमाणे पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. गहू पिकाला जास्त पाणी दिल्यास पिकात ओलावा सतत टिकून राहतो. वाढलेल्या आर्द्रतेमुळे रोगाचे प्रमाण वाढते.
    6. शिफारशीत रासायनिक खत मात्रेचा वापर करावा. युरियाचा वापर शिफारशीपेक्षा जास्त प्रमाणात केल्यास रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो.
    7. रोगाचा प्रादुर्भाव होताच, फवारणी (प्रमाण प्रतिलिटर पाणी)    प्रोपीकोनॅझोल (२५ टक्के) १ मिली- १५ दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी.  

    संपर्क ः डॉ. बबनराव इल्हे, ९४०५००८९१४ (कृषी संशोधन केंद्र, निफाड, जि. नाशिक.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com