सुक्ष्म सिंचनाद्वारे करा खतांचा कार्यक्षम उपयोग
सुक्ष्म सिंचनाद्वारे करा खतांचा कार्यक्षम उपयोग

सूक्ष्म सिंचनाद्वारे खतांचा कार्यक्षम उपयोग

फर्टिगेशनमुळे खते आणि पाणी कार्यक्षमपणे पिकांच्या मुळांशी पोचतात. त्याचा उत्पादनवाढीसाठी फायदा होतो. विद्राव्य खतांचा वापर सूक्ष्म सिंचन प्रणालीमध्ये अत्यंत काळजीपूर्वक करावा. पाण्यात विद्राव्य असलेली खते ठिबक सिंचनाद्वारे पिकांच्या मुळापर्यंत थेट पोचवण्याच्या प्रणालीस ‘फर्टिगेशन’ असे म्हटले जाते. पिकाला आवश्यक असलेली पोषक द्रव्ये मुळापर्यंत पोचतात. खताचा अपव्यय टाळला जातो. तसेच पीक उत्पादनात भरघोस वाढ होते. पारंपरिक सिंचन पद्धतीच्या तुलनेत सूक्ष्म सिंचन पद्धतीने खते दिल्यास होणारी खतांची बचत आणि वाढलेले उत्पादन यांचा थोडक्यात आढावा खालीलप्रमाणे

पिके खतांची बचत (टक्के) वाढलेले उत्पादन (टक्के)
ऊस ५० ४०
केळी २० ११
टोमॅटो ४० ३३
कापूस ३० २०
भेंडी ४० १८
कांदा ४० १६
बटाटा ४० ३०

फर्टिगेशनमुळे होणारे फायदे :

  1. पिकाच्या सक्रिय मुळांपर्यंत पोषक घटक आणि पाणी पोचतात. ते शोषून घेण्याची पिकाची क्षमता वाढते.
  2. पाणी आणि खते योग्य प्रमाणात आणि एकसमान वितरित होतात. परिणामी २०-२५ टक्के खतांची बचत होते. तसेच पीक उत्पादनात सरासरी ३०-४० टक्क्यांपर्यंत वाढ होते.
  3. खते व पाणी देण्याच्या वेळा, मनुष्यबळ आणि ऊर्जा यांची बचत होते.

हे लक्षात ठेवा...

  • फर्टिगेशनसाठी केवळ पाण्यात विद्राव्य खते किंवा रसायनांचा वापर करावा.
  • अविद्राव्य खते व अन्य घटकांचा वापर सूक्ष्म सिंचन प्रणालीमध्ये करू नये. (उदा. शेणस्लरी इ.) अन्यथा सूक्ष्म सिंचन यंत्रणेमध्ये त्याचे कण अडकून बंद पडण्याचा धोका असतो.
  • फर्टिगेशनसाठी सूक्ष्म सिंचन प्रणालीमध्ये पाण्याचा योग्य दाब असणे आवश्यक आहे.
  • खतांचे एकसमान वितरण होण्यासाठी सिंचन प्रणालीची वितरण क्षमता ८० ते ९० टक्क्यांपर्यंत असणे जरुरीचे आहे
  • ठराविक कालावधीनंतर सिंचन प्रणाली फ्लश करून घ्यावी.
  • फर्टिगेशन पद्धतीच्या मर्यादा ः

  • पारंपरिक पद्धतीपेक्षा ठिबक सिंचन आणि फर्टिगेशन प्रणालीसाठी अधिक भांडवली गुंतवणूक करावी लागते.
  • ठिबक सिंचन आणि फर्टिगेशन प्रणालीच्या देखभालीचा खर्च हा पारंपरिक पद्धतीपेक्षा जास्त असतो.
  • दर ठराविक काळानंतर सूक्ष्म सिंचन प्रणालीची स्वच्छता करणे आवश्यक. त्यासाठी ॲसिड प्रक्रिया आणि क्लोरीन प्रक्रिया करावी लागते.
  • फर्टिगेशनसाठी विद्राव्य खतांचा वापर करावा लागतो. अशी खते जमिनीतून द्यावयाच्या खताच्या तुलनेत महाग असतात.
  • नत्र, स्फुरद पालाश आणि सूक्ष्म पोषक घटक असलेल्या खतांच्या विद्राव्यतेसाठी खालील तक्ते लक्षात ठेवावेत नत्र खतांची विद्राव्यता ः

    नत्र खताचा प्रकार नत्राचे प्रमाण (टक्के) विद्राव्यता (ग्रॅम प्रति लिटर)
    युरिया ४६ ११००
    अमोनिअम सल्फेट १२ ७५०
    अमोनिअम नायट्रेट ३४ १९२०
    कॅल्शिअम नायट्रेट १५.५ १२९०

    पालाश खतांची विद्राव्यता ः

    पालाश खताचा प्रकार पालाशचे प्रमाण (टक्के) विद्राव्यता (ग्रॅम प्रति लिटर)
    पोटॅशिअम सल्फेट ५० ११०
    पोटॅशिअम क्लोराईड ६० ३४०
    पोटॅशिअम नायट्रेट ४४ १३३

    स्फुरद खतांची विद्राव्यता ः

    स्फुरद खताचा प्रकार स्फुरदाचे प्रमाण (टक्के) विद्राव्यता (ग्रॅम प्रति लिटर)
    मोनो अमोनिअम फॉस्फेट ६१ २८२
    डाय अमोनिअम फॉस्फेट ४६ ५७५
    मोनो पोटॅशिअम फॉस्फेट ५२ २३०
    फॉस्फोरिक ॲसिड ५२ ४५७

    नत्राचे फर्टिगेशन करताना... फर्टिगेशनमधून नत्र देण्यासाठी युरिया सर्वात उत्तम रासायनिक खत आहे. युरिया पाण्यात अत्यंत विद्राव्य असून, पाण्यातील अन्य घटकांशी त्याची रासायनिक प्रक्रिया होत नाही. तसेच फर्टिगेशन प्रणालीमध्ये युरियामुळे क्षार किंवा थर राहत नाहीत. परिणामी कार्यक्षमता टिकून राहते. स्फुरदाचे फर्टिगेशन करतेवेळी...

  • ठिबक प्रणालीमध्ये विद्राव्य स्वरूपात स्फुरद वितरित केल्यास फॉस्फेट क्षाराचे थर साचून ठिबक प्रणालीची कार्यक्षमता कमी होते.
  • फॉस्फोरिक ॲसिड किंवा मोनो अमोनिअम फॉस्फेट ही रसायने स्फुरदाच्या फर्टिगेशनसाठी योग्य मानली जातात.
  • फॉस्फोरिक ॲसिड पाण्यात विद्राव्य आहे. पाण्याचा सामू कमी राहून क्षार साचण्याचा धोकासुद्धा टाळता येतो.
  • पालाशचे फर्टिगेशन करतेवेळी ... सर्वसाधारणपणे सर्व पालाश खते पाण्यात चांगल्या प्रकारे विरघळतात. त्यांचे क्षारही ठिबक प्रणालीमध्ये साचत नाहीत. अधिक उत्पादन व गुणवत्तेकरिता क्लोराईडमुक्त पालाश खते (उदा. पोटॅशिअम नायट्रेट, मोनो अमोनिअम फॉस्फेट आणि मोनो पोटॅशिअम फॉस्फेट) यांचा वापर करावा. सूक्ष्म अन्नद्रव्यांचे फर्टिगेशन करतेवेळी... सूक्ष्म अन्नद्रव्ये (उदा. मँगेनीज, झिंक, आयर्न, कॉपर इ.) विद्राव्य क्षारांच्या स्वरूपात उपलब्ध आहेत. सूक्ष्म अन्नद्रव्ये शक्यतो अन्य खते किंवा रसायनांसोबत सोडू नयेत. फर्टिगेशन प्रणालीचे भौतिक घटक फर्टिगेशन करण्यासाठी ठिबक सिंचन प्रणालीसोबत खालील साधनांची आवश्यकता असते

    1. व्हेंचुरी : आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे व्हेंचुरीमध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होते, ज्यामुळे खताच्या टाकीतून खताचे द्रावण शोषले जाऊन पाण्याच्या प्रवाहामध्ये मिसळले जाते. पाण्याचा दबाव कमी अधिक करून खतांच्या द्रावणाचा वेग कमी अधिक करता येतो.
    2. फर्टिलायझर टॅंक : खतांच्या द्रावणाला आवश्यक प्रमाणात तयार करून फर्टिलायझर टॅंकमध्ये साठवले जाते. हा टाकी पाण्याच्या प्रवाहाशी जोडलेली असते. त्यामुळे त्यातील द्रावण प्रवाहामध्ये मिसळले जाते.
    3. फर्टिलायझर पंप : खतांच्या द्रावणाला ओढून पाण्याच्या प्रवाहात योग्य प्रमाणात मिसळवण्यासाठी फर्टिलायझर पंपाचा उपयोग केला जातो. हा पंप पाण्यामुळे निर्माण होणाऱ्या दबावावर कार्य करतो. त्यामुळे त्यासाठी कोणतीही अतिरिक्त ऊर्जा लागत नाही. मोठ्या क्षेत्रावरील फर्टिगेशनसाठी याचा वापर होतो.

    संपर्क ः आशिष सोनवणे, ८४६९९९९२६७ (सहायक प्राध्यापक, मृदा आणि जल अभियांत्रिकी विभाग, कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, नवसारी कृषी विद्यापीठ, गुजरात)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com