कोरडवाहू फळपीक सल्ला

कोरडवाहू फळपीक सल्ला
कोरडवाहू फळपीक सल्ला

कोरडवाहू फळपिकांमध्ये शेवगा, सीताफळ, बोर आदी पिकांचे हंगाम संपत आले आहेत. आंबा पिकात मोहोराची वाढीची अवस्था सुरू आहे. तर लिंबू पिकात बहरनिहाय फळे वाढीच्या विविध अवस्थांत आहेत. अशा परिस्थितीत हंगाम संपलेल्या पिकात पुढील हंगामासाठी छाटणी, ताणव्यवस्थापन आदी कामांवर भर द्यावा. आंबा पिकात मोहोर संरक्षण तर लिंबू पिकात फळवाढीकडे लक्ष द्यावे. आंबा

  • वाळलेल्या व रोगग्रस्त फांद्या छाटून नष्ट कराव्यात.
  • सद्यस्थितीत करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. करपा रोगग्रस्त झाडांमध्ये कोवळी पाने, अंकूर तसेच माेहोर यांच्यावर तपकिरे काळसर ठिपके पडतात. नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम १२ टक्के अधिक मॅंकोझेब ६३ टक्के या संयुक्त बुरशीनाशकाची २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी. आवश्‍यकतेनुसार दुसरी फवारणी पुन्हा १० दिवसांच्या अंतराने करावी.
  • भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी विद्राव्य गंधक (८० टक्के) २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी.
  • झाडाच्या वाढत्या शेंड्यावर तसेच मोहोरावर शेंडा पोखरणारी अळी या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. प्रादुर्भाव झाल्यास शेंडे वाळून जातात तसेच मोहोर गळून पडतो. नियंत्रणासाठी क्लोरपायरीफॉस १.५ मि.लि. किंवा क्विनॉलफॉस १.५ मि. लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी.
  • कागदी लिंबू

  • आंबे बहर धरलेल्या लिंबू बागेमध्ये जानेवारी महिन्यात फुले येतात. अशा फुलांची फळे जून - जुलै महिन्यात काढणीस येतात. हस्त बहर धरलेल्या बागांतील फळे एप्रिल - मे महिन्यात काढणीस येतात. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात प्रतिझाड १२५ ग्रॅम युरिया अशी खतमात्रा द्यावी. बागेत लोह व जस्त या सूक्ष्मअन्नद्रव्यांची कमतरता जाणवत असल्यास अनुक्रमे फेरस सल्फेट ५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी व झिंक सल्फेट ५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी.
  • बागेस ठिबकसिंचन पद्धतीने पाणी जमिनीच्या मगदुरानुसार १० ते १२ दिवसांच्या अंतराने द्यावे.
  • बागेतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी बुंध्याभोवती सेंद्रिय आच्छादन (५ टन प्रतिहेक्टरी ) करावे.
  • सीताफळ

  • हंगाम संपलेल्या बागेतील वाळलेल्या फांद्या व फळे आदी काढून टाकावीत.
  • बागेस पाणी बंद करून ताण द्यावा.
  • बागेमध्ये व्ही ब्लेडने मशागत करून जमीन भुसभुशीत ठेवावी.
  • बोर

  • हंगाम संपलेल्या बागांमधील वाळलेल्या फांद्या व फळे काढून टाकावीत.
  • बागेमध्ये व्ही ब्लेडने मशागत करुन जमीन भुसभुशीत ठेवावी.
  • झाडांची छाटणी करावी. छाटणी करताना ६० सें.मी. उंचीपर्यंत मुख्य खोड ठेवून तसेच ४ ते ६ दुय्यम फांद्या ठेवून छाटणी करावी.
  • खुंटावर नवीन येणारी फूट वेळोवेळी छाटावी. छाटणीपूर्वी झाडाचे वय, वाढीचा जोम, हवामान, जमिनीचा प्रकार याबाबींचा विचार करावा. त्यानुसार हलकी, मध्यम किंवा भारी छाटणी करावी. हलकी छाटणी म्हणजे २५ टक्के, मध्यम छाटणी म्हणजे ५० टक्के तर भारी छाटणी म्हणजे ७५ टक्के छाटणी अशा पद्धतीने छाटणीचे नियोजन करावे.
  • - छाटणी करताना झाडाचा सांगाडा, फांद्यांचा पसारा व त्यावर बहरणारी फळे यांच्या पूर्वानुभवावरून छाटणी करावी.
  • शेवगा

  • नवीन शेवग्याचे झाड झपाट्याने वाढणारे असते. झाडाला व्यवस्थित आकार न दिल्यास ते उंच वाढून शेंगा काढणी अवघड होते. त्यामुळे झाडाला आकार देण्याची गरज असते. त्यासाठी खोड पुरेशा उंचीपर्यंत वाढल्यानंतर त्याची छाटणी करावी. तसेच त्याखालील चांगली जाडी असणाऱ्या चार फांद्या चार दिशांना ठेवून इतर फांद्यांची छाटणी करावी.
  • त्यानंतर ७ ते ८ महिन्यांनंतर चारही फांद्या मुख्य खोडापासून १ मीटर अंतरावर छाटाव्यात. अशापद्धतीने छाटणी केल्याने झाडाचा मुख्य सांगाडा तयार होतो. झाडाची उंची कमी होऊन पुढील हंगामात शेंगा काढणी सोपी जाते.
  • हंगाम संपलेल्या बागांमध्ये वाळलेल्या फांद्या व फळे काढून टाकावीत.
  • बागेस पाणी न देता ताण द्यावा.
  • बागेत व्ही ब्लेडने मशागत करून जमीन भुसभुशीत ठेवावी.
  • टीप : प्रखर उन्हात गंधकाची फवारणी करू नये. डॉ. विजय अमृतसागर, ९४२०७५९२८६ (कोरडवाहू कृषी संशोधन केंद्र, सोलापूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com