शेळीपालनाने दिले अात्मसन्मानाचे भान

शेळीपालनाने दिले अात्मसन्मानाचे भान
शेळीपालनाने दिले अात्मसन्मानाचे भान

नववर्ष २०१८ विशेष...   ------------------------------------------------------

काम करणारी व्यक्ती कोणतेच काम दुय्यम मानत नाही. उलट, रुळलेल्या वाटांपेक्षा वेगळ्या वाटा चोखाळत स्वतःच्या क्षमता सिद्ध करण्यावर त्यांचा अधिक भर असतो. शिंदेवाडी (ता. दाैंड, जि. पुणे) येथील कल्पना लवांडे यांनी शेळीपालन व्यवसायात पुढाकार घेतला आहे. २०१४ पासून त्यांचे या व्यवसायात सातत्य असून, या माध्यमातून त्यांनी कुटुंबाची आर्थिक बाजू बळकट केली आहे. लग्नानंतरही केवळ घरातील व्यापांमध्ये अडकून न पडता आपली कार्यक्षमता जोपासण्यासाठी, आत्मसन्मान अाणि कुटुंबाच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठीही काही महिला कार्यरत असतात. यापैकीच असलेल्या कल्पना लवांडे यांनी २०१४ पासून शेळीपालन व्यवसायाच्या माध्यमातून कुटुंबाची आर्थिक वहिवाट प्रशस्त केली आहे. लग्नापूर्वी शेती व्यवसायाचा कसलाही अनुभव नसताना शेळीपालन व्यवसायात चांगला पल्ला गाठण्याची इच्छाशक्ती त्यांच्यात दिसते. व्यवसायाला सुरवात कल्पना विकास लवांडे यांच्या एकत्र कुटुंबाची पाच एकर शेती. स्वबळावर काही करण्याची ऊर्मी त्यांच्यात होती. शेतीला शेळीपालनाची जोड देण्याचे त्यांनी ठरवले. त्या उद्देशाने फलटण (जि. सातारा) येथील निंबकर कृषी संशोधन संस्थेत शेळीपालनाचे प्रशिक्षण घेतले. विविध शेळीपालन प्रकल्पांना भेटी दिल्या. इतरांच्या अनुभवातून काही गोष्टी त्या शिकल्या. स्टेट बॅंकेच्या कर्जातून प्रशस्त शेड उभे केले. शासनाच्या पशुसंवर्धन योजनेतून ५५ हजार रुपयांची गुंतवणूक करून ४२ उस्मानाबादी शेळ्या (४० शेळ्या, २ बोकड), चारा कुट्टी यंत्र घेतले. सन २०१४ साली व्यवसायाला सुरवात झाली. परंतु शासनाकडून मिळालेल्या शेळ्या निकृष्ट दर्जाच्या होत्या. त्यातील काहींची मरतूक झाली. काहींची नाइलाजाने विक्री करावी लागली. पुन्हा नवीन शेळ्या विकत घेतल्या. प्रजननासाठी अाफ्रिकन बोअर जातीच्या नराची खरेदी केली. उस्मानाबादी अाणि बोअर जातीच्या पैदाशीतून शेळ्यांची संख्या वाढविली. अाजमितीला लहान मोठ्या मिळून ६२ शेळ्या अाहेत. शेळ्यांचे व्यवस्थापन

  • हिरव्या चाऱ्यासाठी एक एकरावर नेपिअर, मका, कडवळ, दशरथ घास, शेवरी, सुबाभूळ
  • हरभरा, तुरीचा भुसा, भुईमुगाचा पाला, मका, गहू भरडा अाणि भुईमूग पेंड यांचाही वापर
  • वेळच्या वेळी लसीकरण व जंतुनाशके वेळापत्रक
  • शेतातच फार्म असल्यामुळे शेळ्यांना पिण्यासाठी विहिरीचे पाणी
  • कुक्कुटपालनाची जोड सहा महिन्यांपूर्वी शेळीपालनाला जोड म्हणून गावरान लेअर कोंबड्यांचे संगोपन सुरू केले अाहे. पशुसंवर्धन खात्याच्या योजनेतून खडकी येथील अंडी उबवणी केंद्रातून एक दिवसाच्या पिलांची खरेदी केली. सध्या ५० कोंबड्या अाहेत. घरच्यांची समर्थ साथ पती विकास समाजकारणात व्यस्त असल्यामुळे शेती व्यवसायाची सूत्रे त्यांनी कल्पनाताईंकडे सोपविली आहेत. त्यांच्या पाठबळामुळेच या व्यवसायात वाटचाल शक्य झाल्याचे त्या अभिमानाने सांगतात. एकत्र कुटुंब असल्यामुळे घरातील कामाचाही व्याप अाहे. मोठ्या जाऊबाई जयंता मोहन लवांडे यांची समर्थ साथ असते. एकमेकांना समजून घेत कामे केली तर विनातक्रार सर्व कामे पार पडतात असे त्या सांगतात. त्यामुळे कुटुंब गुण्यागोविंदाने राहते. विक्री व्यवस्थापन व्यवसायातील उत्पन्नातून कौटुंबिक गरजा भागविल्या जातात. तळेगाव ढमढेरे, कुंजीरवाडी, यवत या गावातील अाठवडे बाजारांमध्ये तर काही वेळा फार्मवरही बोकडांची विक्री केली जाते. शेळ्या पैदाशीसाठी ठेवल्या जातात. साधारण ५ ते ६ हजार रुपये दराने प्रतिबोकड याप्रमाणे नगावर, तर ३०० रु. किलो दराने वजनावर विक्री होते. बकरी ईदमध्ये कुर्बानीसाठी विकल्या जाणाऱ्या १५ महिन्यांच्या बोकडाला १५ ते २० हजार रुपये दर मिळतो. सध्या २५ बोकडांची बकरी ईद सणासाठी जोपासना केली जात अाहे. ४० टक्के खर्च वजा करून ६० टक्के नफा मिळतो. संपर्क ः कल्पना लवांडे, ७७९८८१८१०७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com