पिंक बेरी, भुरी, क्रॅकिंग टाळण्यासाठी उपाययोजना

द्राक्ष सल्ला
द्राक्ष सल्ला

सध्याच्या वाातावरणामध्ये द्राक्ष बागेमध्ये पिंक बेरी, रंगीत द्राक्षामध्ये क्रॅकींगची समस्या दिसू शकते. सांगली विभागामध्ये आर्द्रता असल्याने भुरीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. या तिन्ही घटकांसाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात.

मागील आठवड्यामध्ये दिलेल्या सल्ल्याप्रमाणे सर्व द्राक्ष विभागामध्ये किमान तापमानामध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. हे वाढलेले तापमान सर्वच ठिकाणी पुन्हा मागील तापमानापेक्षा चार ते पाच अंशाने कमी होण्याची शक्यता आहे. हे कमी तापमान २३ ते २४ तारखेपर्यंत असेच राहील. मात्र, दुपारचे वातावरण निरभ्र व भरपूर सूर्यप्रकाशाचे राहणार आहे. त्यामुळे दुपारचे तापमान ३१-३२ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. सर्वसाधारपणे या पाच सहा दिवसांत सकाळ आणि दुपारच्या तापमानामध्ये १६ -१७ अंशापेक्षा अधिक फरक राहील. ज्या बागांमध्ये फळांमध्ये पाणी भरण्यास नुकतीच सुरवात झाली आहे, अशा बागांमध्ये पहाटे थंड व दुपारी उबदार वातावरण राहून या दोन्ही तापमानातील फरक अधिक असल्यास पिंक बेरीची लक्षणे दिसण्याची शक्यता असते. या काळात घड पेपरने पूर्ण झाकून घेतल्यास पिंक बेरी येत नसल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. म्हणूनच मण्यात पाणी भरण्यास सुरवात झालेल्या बागेमध्ये न चुकता पेपर लावून घ्यावा. सांगली व जवळपासच्या भागामध्ये पुढील दोन ते तीन दिवस वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. असे ढगाळ वातावरण असले तरी पाऊस पडण्याची शक्यता कुठेही दिसत नाही. मात्र, वातावरणातील आर्द्रता वाढण्याची शक्यता आहे. पहाटेचे कमी तापमान, ढगाळ वातावरण व वाढलेली आर्द्रता हे वातावण भुरी रोगाच्या वाढीचे संकेत देतात. अशा परिस्थितीमध्ये भुरीचे बिजाणू वेगाने तयार होतात व प्रसारही वेगाने होतो. म्हणून भुरीच्या नियंत्रणासाठी विशेष लक्ष द्यावे.

  • बहुतांशी बागा छाटणीनंतरच्या ७० दिवसांच्या पुढे आहेत. अशा वेळी या वर्षी फक्त सल्फरचा वापर करणे अपेक्षित आहे. सर्वसाधारणपणे पाच ते सहा दिवसांच्या अंतराने सल्फर (८० डब्ल्यूजी) ८०० ग्रॅम प्रति एकर या प्रमाणात फवारल्यास भुरीचे चांगले नियंत्रण अपेक्षित आहे.
  • ज्या बागांमध्ये आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर झालेला नाही, फक्त सल्फर वापरलेले आहे, अशा बागांमध्ये जैविक नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा किंवा अॅम्पिलोमायसीस किंवा बॅसीलस सबटिलिस फवारणीसाठी वापरणे शक्य आहे. जास्त आर्द्रता असताना जैविक नियंत्रक घटकांचा वापर केल्यास सल्फरने मिळालेले भुरीचे नियंत्रण जास्त चांगले टिकून राहील. त्याच बरोबर कुठल्याही आंतरप्रवाही बुरशीनाशकांचे उर्वरीत अंश न राहता चांगल्या दर्जाची द्राक्षे मिळू शकतील.
  • सल्फरचा वापर करत असताना एटीआरचे नोझल किंवा लो व्हॉल्युम स्प्रेअर वापरल्यास डाग न येता फवारणी करणे शक्य आहे. बऱ्याच द्राक्ष बागायतदारांनी याचा वापर समाधानकारकरीत्या केल्याचे दिसून येते. तो समजून घेऊन सल्फरची फवारणी योग्य रीतीने केल्यास भुरी नियंत्रण शक्य होईल.
  • नारायणगाव भागामध्ये काढणीस तयार होत असलेल्या काळ्या रंगाच्या द्राक्षामध्ये पुढील काही दिवसांत कमी होणारे तापमान लक्षात घेता क्रॅकिंग होण्याची शक्यता आहे. ते टाळण्यासाठी सिंचनाच्या पाण्यामध्ये योग्य प्रमाणात घट करणे आवश्यक आहे. केव्हीके नारायणगाव मध्ये पॅन इव्हॅपेरिमीटर कार्यरत असल्यास त्याच्या नोंदी जाणून घ्याव्यात. त्यानुसार कमी होणाऱ्या बाष्पोत्सर्जनाप्रमाणे (इव्हॅपोट्रान्स्पिरेशन) सिंचनाच्या पाण्याचे प्रमाण कमी करावे. अन्यथा क्रॅकिंगचे प्रमाण वाढू शकते.  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com