केसर आंबा मोहराचे करा संरक्षण

केसर आंबा मोहोराचे संरक्षण
केसर आंबा मोहोराचे संरक्षण

राज्यात बहुतांश ठिकाणी आंब्यांच्या झाडांना मोहर लागला आहे. तसेच मोहरावर तुडतडे या किडीचा व भुरी, करपा या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. परिणामी, मोहर गळून मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी वेळीच नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात. तुडतुडे ही कीड व भुरी, करपा या रोगांमुळे आंबा उत्पादनात ७० ते ८० टक्‍क्‍यांपर्यंत घट होते. त्यांची नुकसान करण्याची पद्धत ओळखून त्वरित कीडनाशके व बुरशीनाशकांच्या फवारणी कराव्यात. तुडतुडे ः पाचरीच्या आकाराचे तुडतुडे अत्यंत चपळ असतात. कीडीची पिले व प्रौढ कोवळ्या पानातील, तसेच मोहरातील रसशोषण करतात. यामुळे प्रादुर्भावग्रस्त मोहर सुकून जातो. तसेच ही कीड शरीरातून चिकट पदार्थ सोडते. त्याच्यावर काळी बुरशी वाढून संपूर्ण झाड काळे पडल्यासारखे दिसते. पानांवर काळसर बुरशीच्या आच्छादनामुळे प्रकाशसंश्‍लेषण क्रिया मंदावते. भुरी ः रोगामुळे मोहर व अपरिपक्व छोट्या फळांची गळ होते. भुरी रोगाचा प्रादुर्भाव मोहरातील फुलात होतो. मोहरावर पांढरी बुरशी येते व मोहर गळू लागतो. पानाच्या कोवळ्या फुटीवरही रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यामुळे पानाच्या दोन्ही बाजूंनी छोटे अनियमित राखाडी रंगाचे ठिपके दिसून येतात. बुरशीचा प्रादुर्भाव जानेवारी महिन्यात दिसून येतो. वर्षातील इतर वेळेस ती सुप्तावस्थेत असते. करपा : हा बुरशीजन्य रोग आंबा पिकाच्या सर्व अवस्थेत आढळतो. आर्द्र वातावरणात बुरशीची जलद वाढ होते. रोगाचा प्रादुर्भाव जुन्या पानापेक्षा नवीन पानांवर जास्त होतो. पानांवर अनियमित वेडेवाकडे फिकट विटकरी किंवा गडद विटकरी ठिपके पडतात. रोगग्रस्त फांद्यावर काळे ठिपके पडतात. मोहरामध्ये फुलाच्या देठावर व उमललेल्या फुलावर काळसर विटकरी काळे डाग पडतात. परिणामी मोहर करपून गळून जातो. छोट्या फळांवर व फळांच्या देठावर प्रादुर्भाव झाल्यामुळे फळगळ होते. फळांवर बुरशीची वाढ होऊन फळे डागळलेली दिसतात.

उपाययोजना ः खालीलप्रमाणे फवारणीचे नियोजन करावे. प्रमाण : प्रतिलिटर पाणी पहिली फवारणी : डायमिथोएट (३० टक्के) १ मि.लि. अधिक हेक्‍झाकोनॅझोल (५ ई.सी.) ०.५ मि.लि. किंवा कार्बेन्डाझिम १ मि.लि. दुसरी फवारणी : वेळ : मोहोरावरील डोळे फुगताच मोहर, फांद्या व शेंड्यांवर ॲसिटामिप्रीड (२० टक्के) ०.४ ग्रॅम अधिक हेक्‍झाकोनॅझोल (५ ई.सी.) ०.५ मि.लि. किंवा ट्रायडीमेफॉन (२५ डब्ल्यूसी) १ ग्रॅम किंवा थायोफिनेट मिथाईल (७० डब्ल्यूसी) ०.७ ग्रॅम

सूचना : गरजेनुसार तिसरी व चौथी फवारणी दहा ते बारा दिवसांच्या अंतराने वरीलप्रमाणेच करावी. फक्त त्या वेळी कीटकनाशक व बुरशीनाशक आलटून-पालटून घ्यावे. वातावरण ढगाळ झाल्यास फवारणीतील अंतर कमी करावे. साधारणत: चार ते पाच फवारणी केल्यास मोहराचे चांगल्याप्रकारे संरक्षण होऊन चांगली फळधारणा मिळते. संपर्क ः डॉ. संजय पाटील, ९८२२०७१८५४ (केसर आंबा गुणवत्ता केंद्र, औरंगाबाद)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com