फुलांच्या पाकळ्यांचे प्रकियायुक्त पदार्थ

फुलांच्या पाकळ्यांवरील प्रक्रिया
फुलांच्या पाकळ्यांवरील प्रक्रिया

अत्यंत नाजूक, सुगंधी असलेल्या फुलांच्या पाकळ्यांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. पाकळ्यांवर काही प्रक्रिया केल्यास एक ते चार दिवसांचा आयुष्यकाळ वाढवता येतो. त्याचप्रमाणे एक ते दोन दिवसांनंतर टाकाऊ किंवा निर्माल्य समजल्या जाणाऱ्या फुले व पाकळ्यांना उत्तम मूल्यवर्धनही मिळते. देवपूजेमध्ये फुलांचा वापर प्रामुख्याने होतो. मात्र, दुसऱ्या दिवशी मोठे हार आणि फुलांचे निर्माल्य हे नदीमध्ये टाकले जाते. ते पाण्यामध्ये कुजून दुर्गंधी पसरते. परिणामी पर्यावरणासाठी हानिकारक ठरते. मात्र, ही फुले योग्य पद्धतीने गोळा करून वाळवल्यास त्यापासून उत्तम दर्जाचा रंग व सुगंध मिळवणे शक्य आहे. देशी गुलाबाच्या फुलांपासून गुलकंदही निर्माण करता येतो. झेंडू पाकळ्या

झेंडू फुलांच्या पाकळ्या गेंदापासून वेगळ्या केल्या जातात. त्यातील हिरवा भाग काढून टाकला जातो. पिवळ्या रंगाच्या पाकळ्या वाळवून त्यापासून भुकटी तयार केली जाते. चाळल्यानंतर या भुकटीचा वापर होळीचे नैसर्गिक रंग म्हणून करता येतो. त्याचप्रमाणे झेंडू भुकटीतून ओलेओरेसीन हा घटक वेगळा करता येतो. वाळविण्याच्या प्रक्रियेमध्ये सूक्ष्मजीवांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यावर लक्ष ठेवावे लागते. या वाळलेल्या पाकळ्या कोरड्या वातावरणामध्ये दीर्घकाळ साठवता येतात. फुले वाळवण्याच्या अनेक पद्धती (उदा. ओव्हन ड्रायिंग आणि ओपन एअर ड्रायिंग) आहेत. अर्थात प्रत्येक फुलाच्या प्रकारानुसार तापमान आणि वाळवण्याचा कालावधी वेगळा असतो.

  • झेंडूच्या पाकळीच्या पिवळ्या भागामध्ये ल्युटेन हा घटक असतो. तो अॅण्टीऑक्सिडेंट म्हणून उपयुक्त आहेत. विशेषतः डोळ्यातील बुबुळामध्ये अतिनिल किरणांमुळे निर्माण मुक्तआयनांच्या उदासीनीकरणासाठी ल्युटेन उपयुक्त ठरतो. माणसांना हा घटक तयार करता येत नाही. तो आहारातून विशेषतः फळे, भाज्या आणि पूरक आहारातून घेणे आवश्यक असते.
    1. वाळवलेल्या झेंडूच्या फुलांमध्ये ०.१- ०.२ टक्के कोरडे वजन मिळते, त्याच्या सुमारे ८० टक्के ल्युटेन पाचक घटक असतात. ल्युटेन भुकटी, तेल किंवा बीडलेट स्वरूपामध्ये पूरक आहारामध्ये वापरता येतात.
    2. वाळवून बारीक केलेल्या झेंडू फुलांपासून ओलेओरेसिन हा घटक मिळतो.
  • झेंडूच्या ताज्या फांद्या आणि फुलांच्या पाकळ्यांपासून तेल मिळवता येते. हे तेल त्वचेच्या समस्या, दाह, लहान मुलांमध्ये डायपूरमुळे येणारे रॅशेस व अन्य त्वचेच्या समस्यांसाठी वापरता येते. बेबी ऑइल म्हणून हे तेल उत्तम ठरते.
  • गुलाब पाकळ्या वापरलेल्या फुलांचा वापर पुन्हा सुशोभीकरणासाठी होऊ शकतो. त्याचप्रमाणे त्यातून तेल मिळवून त्याचा वापर टर्पेन्टाईन, तिळ तेल किंवा जवस तेलाप्रमाणे करता येतो. कात्रीचा वापर करून फुलांपासून पाकळ्या वेगळ्या करतात. त्या एका थरामध्ये ठेवून सावलीमध्ये वाळवल्या जातात किंवा मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये वाळवल्या जातात. त्यासाठी प्लेटमध्ये कागदी टॉवेलवर एका थरामध्ये पाकळ्या ठेवून ओव्हन ठेवल्या जातात. त्यावर दुसरा पेपर टॉवेल ठेवतात. त्यावर दुसरी प्लेट अशाच पद्धतीने ठेवली जाते. सुमारे ४० सेकंदांसाठी उच्च तापमानावर उष्ण केल्या जातात. या पाकळ्या कोरड्या वाटतील पण त्यांचे तुकडे पडणार नाहीत इतपतच वाळवाव्यात. त्यात किचिंतही आर्द्रता असल्याचे जाणवल्यास पुन्हा एक वरीलप्रमाणे प्रक्रिया करावी. गुलाब तेल काढण्याची प्रक्रिया ः सॉस पॅनमध्ये काही इंच पाणी घेऊन ते उकळून घ्यावे. त्यानंतर आचेवरून दूर करावे. एका काचेच्या ग्लासमध्ये एक कप तेल घ्यावे. या तेलाला शक्यतो कोणताही गंध नसावा. अन्यथा त्याचा उग्रपणा गुलाबाच्या गंधाला मारून टाकू शकतो. शक्यतो जोजोबा आणि द्राक्षबियांचे तेल हा उत्तम पर्याय ठरतो. ते उपलब्ध नसल्यास ओलिव्ह तेलानेही काम साधू शकते. या तेलामध्ये कुस्करून बारीक केलेल्या गुलाब पाकळ्या टाकाव्यात. केवळ सर्व पाकळ्यांना तेल लागेल इतपत सावकाश जार हलवा. त्या जारवर झाकण ठेवून, तो गरम पाण्यामध्ये ठेवावा. तेल गरम झाल्यानंतर गुलाबाच्या पाकळ्यांतील गंध त्यात उतरू लागेल. जेव्हा पाणी थंड होऊ लागेल, त्यावेळी जार खिडकीजवळच्या उन्हामध्ये पुढील चोवीस तासांसाठी ठेवावा. मलमल कापडाच्या साह्याने तेल गाळून घ्यावे. पाकळ्या व्यवस्थिक दाबून त्यातील सर्व तेल काढावे. तेलामध्ये गंध उतरण्यासाठी ही प्रक्रिया पाच ते सहा वेळा पुन्हा पुन्हा करावी. हे गंधयुक्त तेल गडद रंगाच्या व घट्ट झाकण असलेल्या बाटलीमध्ये काढून ठेवावे. शक्यतो काळ्या रंगाची बाटली घेतल्यास सूर्यप्रकाशापासून बचाव होतो आणि तेल अधिक काळ स्थिर राहते. गुलाब पाणी तयार करणे ः गुलाब पाणी तयार करणे हे अत्यंत सोपे आहे. त्यासाठी गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये एकास दोन या प्रमाणात उकळते पाणी टाकावे. पाणी थंड झाल्यानंतर गाळून घ्यावे. निर्जंतुक बाटलीत भरून ही बाटली रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास हे पाणी एक महिन्यापर्यंत चांगले राहते. गुलाबपाणी आणि गुलाब तेलांचा वापर करण्याची पद्धत

  • घरगुती पद्धतीने बनवलेले गुलाबपाणी व गुलाब तेल यांचा वापर मसाज तेलामध्ये, अत्तर निर्मिती किंवा घरगुती बनवलेल्या ग्लिसरीन साबणामध्ये करता येतो.
  • गुलाब पाण्याचा वापर रोजच्या चहा, मिठाई किंवा बेकरी उत्पादनामध्येही करता येतो.
  • शेवंती पाकळ्या वाळलेली शेवंतीची फुले आरोग्यासाठी फायद्याची आहेत. दृष्टीची सुधारणा, डोळ्याची जळजळ, डोळे लाल होणे यामध्ये उपयुक्त आहेत. तसेच विषारी घटकांचे प्रमाण कमी करणे आणि डोकेदुखी, व्हर्टिगो, हृदय आणि छातीमध्ये दुखणे, सर्दी आणि फ्ल्यूच्या उपचारामध्ये या पाकळ्यांचा फायदा होतो. शेवंतीच्या पाकळ्या वेगळ्या घ्याव्यात. पाकळ्या एक ते दोन मिनिटे ९५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानाच्या वाफेच्या झोतात धराव्यात. त्या वाळवण्यासाठी ९० ते १०० अंश सेल्सिअस तापमानामध्ये पाच ते सहा तास ठेवाव्यात. दुसऱ्यांदा वाळण्यासाठी ६० ते ७० अंश सेल्सिअस तापमानामध्ये तीन ते चार तास ठेवाव्यात. थंड झाल्यानंतर पाकळ्या व्यवस्थिक पसरून आणखी थंड कराव्यात. मोठ्या प्रमाणात तयार झालेल्या पाकळ्या हवाबंद स्थितीमध्ये साठवाव्यात. शेवंतीचा चहा ः शेवंतीचा चहा बनविण्यासाठी प्रामुख्याने शेवंतीची वाळलेली फुले ९० ते ९५ अंश सेल्सिअस तापमानाच्या गरम पाण्यामध्ये (उकळून थोडे थंड झालेल्या) बुडवतात. त्यात आवश्यकतेनुसार साखर किंवा उसाचा रस टाकतात. पारदर्शक ते फिक्कट पिवळ्या रंगाचा किंचित शेवंतीचा गंध असलेला हा चहा चवीला उत्तम लागतो. चीनमधील परंपरेनुसार एक कप शेवंती चहा घेतल्यानंतर पुन्हा त्या भांड्यामध्ये आणखी तेवढेच गरम पाणी वाढवून चहाची तीव्रता कमी करतात. ही प्रक्रिया अनेक वेळा केली जाते. जास्वंद फुले जास्वंदीच्या फुलांचा आयुष्यकाळ हा अत्यंत कमी (सुमारे एक दिवस) असतो. मात्र, योग्य रीतीने वाळवल्यास त्याची साठवण अधिक काळासाठी करता येते. गडद रंगाच्या या पाकळ्यांपासून चहा आणि अन्य पेय तयार करता येतात. त्याचप्रमाणे विविध सूप, सीताफळाचा गर, ब्रेडडफ तयार करण्यापूर्वी या पानांचा चुरा सुशोभीकरणासाठी वापरला जातो. वाईन निर्मिती ः जास्वंद ही वनस्पती औषधी आहे. वाळवलेल्या फुलांचा व भुकटीचा वापर हा वाईन निर्मिती, ज्यूस तयार करण्यासाठी होतो. वाळवलेली फुले थंड पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवावीत. सकाळी ती गाळून पाणी वेगळे करावे. या पाण्यामध्ये साखर आणि अननस किंवा द्राक्षरसाचा वापर योग्य स्वाद आणण्यासाठी करावा. त्या साखर मिसळण्यापूर्वी गरम करून घ्यावी. हे द्रावण किण्वन प्रक्रियेसाठी तीन महिन्यांपर्यंत ठेवावे. ४० लिटर वाईन तयार करण्यासाठी ३ किलो वाळवलेली जास्वंद फुले आणि १० किलो साखर घ्यावी. त्यात एक लिटर अननस किंवा द्राक्ष रस घ्यावा. किण्वनाच्या प्रक्रियेत तयार होणारे वायू बाहेर पडण्यासाठी व ताजी हवा आत येण्यासाठी छिद्र असावे. तीन महिन्यांमध्ये उत्तम दर्जाची वाईन तयार होते. नैसर्गिक रंग बनविण्याची पद्धत ः कपड्यांना किंवा धाग्यांना रंगविण्यासाठी नैसर्गिक रंगही जास्वंद फुलांपासून मिळवता येतात. त्याच्या दोन पद्धती आहेत. १) अॅक्वस एक्स्ट्रॅक्शन ः वाळलेली फुले ३ः१०० या प्रमाणात पाण्यामध्ये भिजवावीत. हे पाणी ५० ते ९५ अंश सेल्सिअस तापमानामध्ये २ तासापर्यंत तापवावे. पाणी रंगीत होऊन, त्याचा वापर धागे किंवा कपडे रंगविण्यासाठी करता येतो. २) अॅक्वस- इथेनॉल एक्स्ट्रॅक्शन ः वाळवलेल्या फुलांची बारीक भुकटी ७० टक्के इथेनॉलमध्ये भिजवावी. हे मिश्रण उष्ण पाण्याच्या (तापमान ६८ अंश सेल्सिअस) भांड्यामध्ये चार तासासाठी ठेवावे. रंग वेगळा होण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे द्रावण रात्रभर हॉट एअर ओव्हनमध्ये रात्रभर ठेवावे. फुलांपासून अगरबत्त्यांचा व्यवसाय ः निर्माल्यामध्ये प्रामुख्याने झेंडू, शेवंती, गुलाब, जास्वंद या फुलांचा समावेश असतो. ही फुले औषधी व सुगंधी आहेत. त्यापासून नैसर्गिक रंग, गंध, स्वाद मिळवणे शक्य आहे. मुंबई येथील उद्योजक निखिल गुम्पा हे वाळलेल्या पाकळ्यांपासून अगरबत्ती बनवितात. मंदिरातून फुले गोळ्या करणे, त्यांच्या पाकळ्या वेगळ्या करणे यासाठी काही महिलांना रोजगार मिळाला आहे. दर आठवड्याला सुमारे ३०० ते ४०० किलो फुलांवर प्रक्रिया करून, त्यापासून १५० ते २०० किलो अगरबत्ती ते बनवतात. त्यासाठी गोळा केलेली फुले हे झेंडू, शेवंती, जास्वंदी आणि गुलाब याप्रमाणे वेगळी केली जातात. त्यानंतर ती स्वच्छ किंवा क्लोरीनेटेड पाण्याने धुतली जातात. सेंट्रीफ्यूज पद्धतीने त्यातील आर्द्रता कमी करून घेतात. ही ओली फुले शीतगृहामध्ये पुढील प्रक्रियेपर्यंत साठवली जातात.  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com