agriculturai stories in marathi, agrowon, PROCESSING OF AMLA | Agrowon

आवळ्यापासून बनवा मुरावळा, लोणचे, कॅण्डी
डॉ. आर. टी. पाटील
सोमवार, 27 नोव्हेंबर 2017

कच्च्या स्वरूपामध्ये आवळ्यामध्ये आरोग्यदायी गुणधर्म अधिक असले तरी तुरट चवीमुळे अनेकजण खाणे टाळतात. त्यावर प्रक्रिया करणे उत्तम पर्याय ठरतो. आवळ्याच्या प्रक्रियायुक्त पदार्थांना उत्तम मागणी आहे. आवळ्यावर घरगुती पातळीवर आवळा उत्पादन जास्त असल्यास व्यावसायिक पातळीवरही प्रक्रिया करणे शक्य आहे.

कच्च्या स्वरूपामध्ये आवळ्यामध्ये आरोग्यदायी गुणधर्म अधिक असले तरी तुरट चवीमुळे अनेकजण खाणे टाळतात. त्यावर प्रक्रिया करणे उत्तम पर्याय ठरतो. आवळ्याच्या प्रक्रियायुक्त पदार्थांना उत्तम मागणी आहे. आवळ्यावर घरगुती पातळीवर आवळा उत्पादन जास्त असल्यास व्यावसायिक पातळीवरही प्रक्रिया करणे शक्य आहे.

उत्तम केस आणि त्वचेसाठी - पोषक घटकामुळे त्वचा आणि केसाच्या आरोग्यासाठी आवळा उत्तम मानला जातो. पोषक घटक आणि वार्धक्यविरोधी गुणधर्मामुळे त्वचेची चमकदारपणा वाढतो. सातत्याने आहारामध्ये आवळ्याचा वापर असल्यास केसांची वाढ चांगली होते. तसेच आवळा रस नियमितपणे पिल्यास केस गळण्याची समस्या दूर होते. आवळ्यातील क जीवनसत्त्व हे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते. खोकला आणि सर्दीवर मात करणे शक्य होते. दाह आणि वेदना कमी करण्यासाठी आवळा उपयोगी ठरतो. आवळा मधासोबत घेतल्यास आरोग्यदायी गुणधर्मामध्ये वाढ होते.

काढणीपश्चात काळजी ः
अपक्व, मार लागलेले किंवा रोगग्रस्त आवळे वेगळे करावेत. आकार, वजन, रंग आणि पक्वता यानुसार फळांची प्रतवारी तीन ग्रेडमध्ये करावी. त्यानंतर फळे १०० पीपीएम क्लोरिनेटेड पाण्यामध्ये धुवून स्वच्छ करावीत.
प्रतवारी निकष ः
मोठा - ४० मि.मि. पेक्षा मोठे - साठवणीसाठी.
मध्यम - ३० ते ४० मि.मि. - प्रक्रिया पदार्थ निर्मितीसाठी
लहान - ३० मि.मि. पेक्षा लहान - वैद्यकीय कारणांसाठी.

पॅकेजिंग ः

 • कमी अंतरावरील बाजारपेठेसाठी ४० ते ४५ किलो क्षमतेचे पोते किंवा पिशव्यांचा वापर करावा किंवा बांबूंच्या करंड्यांमध्ये आतून कागद ठेवून त्याची पाठवणी केली जाते.
 • लांब अंतरावरील बाजारपेठेसाठी कोरुगेटेड फायबर बोर्ड बॉक्सचा वापर करावा.

साठवण ः

 • पक्व आवळे जातीनिहाय सामान्य तापमानाला ६ ते ९ दिवस राहू शकतात.
 • शून्य ऊर्जाआधारीत साठवणगृहामध्ये त्यांचा साठवण कालावधी १२ ते १८ दिवसांपर्यंत वाढू शकतो.
 • शीतगृहामध्ये ५ ते ७ अंश तापमानामध्ये दोन महिन्यांपर्यंत चांगले राहतात.
 • पारंपरिक साठवण पद्धतीमध्ये १५ टक्के ब्राईन सोल्यूशन (१५० ग्रॅम मीठ प्रति लिटर पाणी) या द्रावणामध्ये सामान्य तापमानाला त्यांची साठवण ७५ दिवसांपर्यंत करता येते.

आवळ्यापासून गर ः

 • आवळ्यातील बी काढून, त्याचे तुकडे करून घ्यावेत. उकळत्या पाण्यामध्ये आवळे सात ते आठ मिनिटांसाठी ब्लांचिंग केल्यास बिया लवकर निघतात.
 • त्यात आवळ्याच्या तुकड्याइतके पाणी मिसळून, मिक्सर किंवा पल्परद्वारे बारीक करून घ्यावे.
 • हा गर ७८ अंश सेल्सिअस तापमानापर्यंत गरम करावा. त्यावर गरज वाटल्यास SO२ १००० पीपीएम ही प्रक्रिया केली जाते.
 • काही पाण्यामध्ये सोडीयम मेटाबायसल्फेट १.५ ग्रॅम प्रति किलो मिसळून घेऊन, ते गरामध्ये चांगले मिसळून घ्यावे.
 • हा गर हवाबंद बाटलीमध्ये भरून ठेवावा.

आवळा लोणचे ः
प्रतवारी केलेली आवळा फळे स्वच्छ धुवावीत. उभी चिरून घ्यावीत. त्यात खालील मसाले तेलात चांगले परतून घेऊन मिसळावेत. (एक किलो आवळ्यासाठी प्रमाण ः १५० ग्रॅम मीठ, १५ ग्रॅम लाल मिरची, १० ग्रॅम हळद, १० ग्रॅम जिरे, १० ग्रॅम काळे मिरे, ३०० मिलि मोहरी तेल) त्यानंतर प्रति किलो आवळ्यासाठी १५० ग्रॅम साखर मिसळून ३० मिनिटांसाठी सतत हलवत शिजवून घ्यावे. हे लोणचे निर्जंतुकीकरण केलेल्या बाटल्यामध्ये भरून बाटल्या सामान्य तापमानापर्यंत थंड कराव्यात. अर्थात स्थानिक चवीनुसार मसाल्यांचे प्रमाण बदलून घेता येईल.

आवळा वाळवणे ः
स्टेनलेस स्टिलच्या चाळणीमध्ये आवळे स्वच्छ धुवून निथळून घ्यावेत. त्यांचे मोठे तुकडे करावते. त्यात मीठ तीन ते चार तासासाठी मिसळावे. त्यामुळे फळातील पाणी शोषले जाऊन वाळवणाची प्रक्रिया वेगाने होते. सर्व द्रव निथळेपर्यंत सुमारे एक तास थांबावे. हे तुकडे ट्रेमध्ये एका थरात ठेवून वाळवण्यासाठी ठेवावेत. सूर्यप्रकाशामध्ये ६ ते ८ दिवसामध्ये, सौर वाळवणगृहामध्ये ४ ते ५ दिवसामध्ये वाऴतात. व्यावसायिक पातळीवर विद्युत कॅबिनेट ड्रायरमध्ये ६० ते ६५ अंश सेल्सिअस तापमानामध्ये १० ते ३५ तासामध्ये वाळतात. हे वाळलेले आवळा तुकडे आर्द्रतारहित बाटल्या किंवा ४०० गेजच्या पॉलिथीन किंवा पॉलिप्रोपेलिन पाऊचमध्ये भरून हवाबंद करावेत.

भुकटी ः
आर्द्रता पाच टक्क्यांपर्यंत कमी झालेले आवळ्याचे तुकडे मसाल्यासाठी ग्रायंडरमधून बारीक करून घ्यावेत. या भुकटीची साठवण आर्द्रतारहित बाटल्या किंवा ४०० गे पॉलिथीन पाऊचमध्ये करून हवाबंद करावे.

रस ः
बिया काढलेले आवळ्यांचे तुकडे करून घ्यावेत. त्यासाठी ज्युसरला जोडलेल्या फूड प्रोसेसलचा वापर करता येईल. त्यानंतर मिक्सरचा वापर करून बारीक करून चाळणीच्या साह्याने रस वेगळा करावा. एक आवळ्यापासून सुमारे ६०० ग्रॅम रस मिळतो. तो निर्जंतुक बाटल्यामध्ये भरून ठेवल्यास एक महिन्यापर्यंत टिकतो. दोन चमचे रसामध्ये पाणी आणि आवश्यकतेनुसार साखर किंवा मध वापरून सरबत तयार करता येते.

आवळा मुरावळा ः
एक किलो मोठ्या आकाराचे पक्व तपकिरी रंगाचे आवळे प्रक्रियेसाठी घ्यावेत. असे आवळे तुरटपणा कमी असल्याने मुरावळा करण्यासाठी योग्य मानले जातात. बाजारपेठेमध्ये असे आवळे साधारणपणे डिसेंबर महिन्यामध्ये येतात. ही फळे दोन ते तीन वेळा धुवून, पाण्यात एक दिवस भिजवावेत. त्यानंतर पुसून कोरडे केलेल्या आवळ्यांना प्रिकिंग उपकरण किंवा फोर्कच्या साह्याने टोचे मारून घ्यावेत.
पद्धत १ ः टोचे मारलेले आवळे भरपूर उकळत्या पाण्यामध्ये टाकून मऊ करून घ्यावेत. प्रति किलो आवळ्यासाठी १.५ किलो साखरेचा रस तयार करून, त्या आवळे शिजवावेत. आवळ्यातून रस सुटून साखरेच्या पाकात चांगल्या प्रकारे मिसळू द्यावा.
पद्धत २ ः वरीलप्रमाणे टोचे मारलेले आवळे साखरेच्या द्रावणात एक कप पाण्यासह टाकावेत. ते आवश्यकतेएवढे घट्ट होईतो चांगले शिजवावेत. या प्रक्रियेला साधारणपणे २५ मिनिटे लागतात.
मुरावळा करण्याच्या प्रक्रियेसाठी लोखंडी किंवा अॅल्युमिनिअम भांड्यांचा वापर करू नये. तयार झालेला मुरांबा काचेच्या बाटल्यामध्ये भरावा. त्यात काळे मीठ एक चमचा, अर्धा चमचा काळे मिरे पावडर (गरजेनुसार) आणि वेलदोडा पावडर एक चमचा चांगल्या प्रकारे मिसळावे. तीन दिवसानंतर फळातील जादा साखरेचा रस पूर्णपणे निथळून घ्यावा.
खबरदारी -
जर साखरेचा पाक थोडा पातळ झाला असल्यास मुरांबा दुसऱ्या भांड्यामध्ये घेऊन काही मिनिटांसाठी शिजवून घ्यावा. साखरेचा पाक फारच घट्ट झाल्यास काही पाणी उकळून दोन तीन चमचे पाकात मिसळून आवश्यक तेवढा पातळ करून घ्यावा.

आवळा साखर कॅण्डी
आवळा फळे स्वच्छ धुवून वेगळ्या भांड्यात पाण्यात बुडून राहतील असे ठेवावीत. वेगळे भांडे आचेवर ठेवून, त्यात आवळे टाकावेत. झाकण ठेवून आवळे मऊ होतील इतके २ ते ३ मिनिटासाठी शिजवावेत. आवळे फोडून त्याच्या पाकळ्या वेगळ्या कराव्यात. या भागामध्ये साखर मिसळून झाकून तीन दिवसांपर्यंत ठेवावेत. साखर विरघळून तयार झालेला रस आवळ्या पाकळ्यामध्ये चांगल्या प्रकारे शोषला जाईल. तीन दिवसांनंतर चाळणीद्वारे पाक निचरा करून घ्यावा. या साखर मुरलेल्या पाकळ्या सूर्यप्रकाश किंवा सौर वाळवण यंत्रामध्ये एक ते दोन दिवसांसाठी वाळवून घ्याव्यात. त्या अधिक वाळवून कोरड्या केल्यास कडक होण्याचा धोका असतो.

आवळा गूळ कॅण्डी
गुळाच्या साह्याने तयार केलेली आवळा कॅण्डी ही मधासारखी लागते. त्याचप्रमाणे साखरेच्या कॅन्डीप्रमाणे ती कडक होत नाही, त्यामुळे ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी मिळते. त्यासाठी आवळे स्वच्छ धुवून वाफवून किंचित मऊ करून घ्यावेत. त्याच्या पाकळ्या मोकळ्या कराव्यात. दोन कप पाण्यामध्ये गुळ विरघळवून गुळाचा रस तयार करावा. उकळून घेतलेल्या आवळा पाकळ्यामध्ये गुळाचा रस चांगला मिसळावा. हे मिश्रण काचेच्या बाटकीमध्ये भरून हवाबंद करावे.

आवळा मध कॅण्डी
आवळा आणि मध हे दोन्ही घटक आरोग्यदायी मानले जातात. त्यातून एकाच वेळी क जीवनसत्त्व, कमी कोलेस्टेरॉलयुक्त कॅन्डी तयार करता येते. ही कॅण्डी रक्ताचे प्रमाण वाढवत असल्याने रक्ताल्पता(अॅनिमिया)वर उपयुक्त ठरते. केसांचे आरोग्य वाढण्यासोबतच शरीराची प्रतिकारशक्ती वाढते.
आवळ्याच्या पाकळ्यांना फोर्क किंवा काटेरी चमच्याने टोचे मारून घ्यावेत. ट्रेमध्ये एका थरात ठेवून सूर्यप्रकाशात एक दिवसासाठी वाळवून घ्यावेत. हे वाळवलेले आवळे निर्जंतुकीकरण केलेल्या काचेच्या बाटलीमध्ये भरावेत. त्यात मध टाकावा. ही बाटली सूर्यप्रकाशामध्ये दोन ते तीन दिवस ठेवावी. दिवसातून एकदा बाटली हलवून मिश्रण एकजीव करावे. आवळ्याला पाणी सुटून मध काही प्रमाणात पातळ होतो. हे पाण्यासारखे घटक वेगळे करून पुन्हा त्यात मध घालावा. बाटलीमध्ये आवळे १५ ते २० दिवसासाठी चांगले मुरू द्यावेत. ते मऊ झाल्यानंतर तयार झाली आवळा मध कॅण्डी.

फोटो गॅलरी

इतर कृषी प्रक्रिया
शेतमाल निर्यातीसाठी ‘हॉर्टीनेट` प्रणालीसन २०१६-१७ पासून राज्यात ग्रेपनेट, मॅंगोनेट,...
सोयाबीनचे मूल्यवर्धित पदार्थसोयाबीन हे ४० टक्के प्रथिने आणि २० टक्क्यांपेक्षा...
गोड दह्याच्या निवळीपासून तेलाची...योगर्ट (दही) निर्मिती उद्योगामध्ये गोड...
फळे, भाजीपाला उत्पादन, निर्यातीत...राज्यातील शेतकऱ्यांचा निर्यातक्षम दर्जाच्या...
फुले ०९०५७ : गुळासाठी उसाची नवीन जातसध्या गूळनिर्मितीसाठी उसाची को ९२००५ ही जात...
बीटचे विविध प्रक्रियायुक्त पदार्थ   भरपूर पोषण तत्त्व असलेल्या...
सुपारी सोलणी यंत्राबाबत माहिती...सुपारी फाळसटणी यंत्र या यंत्रामध्ये एक...
धान्य साठवणीसाठी आधुनिक सायलो तंत्रज्ञानपिकांची काढणी ते प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत...
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चमकणारे...विविध खाण्याच्या पदार्थांमध्ये तसेच अनेक...
आधुनिक, पायाभूत सुविधांच्या...औद्योगिक विकासाला चालना देऊन रोजगारनिर्मिती...
आवळ्यापासून बनवा मुरावळा, लोणचे, कॅण्डीकच्च्या स्वरूपामध्ये आवळ्यामध्ये आरोग्यदायी...
पायाभूत सुधारणेतून मिळेल अन्न...काढणीपश्‍चात तंत्रज्ञान आणि कोल्ड चेनमधील पायाभूत...
जपानी तंत्राच्या ‘राइस मिल’द्वारे...तंत्रज्ञानाचा आविष्कार घडविणे तेव्हाच शक्य होते,...
घरगुती प्रक्रियेद्वारे बोरांचे...बोर हे अत्यंत पोषक, तरिही दुर्लक्षित फळ आहे....
सोलर टनेल ड्रायरचा वापर ठरतो फायदेशीरसोलर टनेल ड्रायर हे तंत्रज्ञान प्रदूषण न करणारे...
तृणधान्यापासून बनवा खाद्यपदार्थतृणधान्यामध्ये विविध पोषक घटक आहेत. या घटकांचा...
लिंबू प्रक्रियेतून मिळतील रोजगाराच्या...औषधी गुणधर्म असलेले लिंबू आरोग्यासाठी अतिशय...
तृणधान्यापासून बनवा खाद्यपदार्थ तृणधान्यापासून तयार केलेल्या पारंपरिक ...
स्वादिष्ट, पौष्टिक, आकर्षक तेजपूर लिचीलिची हे उष्णकटिबंधीय प्रदेशात येणारे सदाहरित फळ...
सीताफळ गरापासून श्रीखंड, सरबत, रबडीसीताफळ हे पाैष्टिक फळ असून, त्याच्या गरापासून...