शेडनेटमधील काकडीने दाखवला यशाचा मार्ग !

शेडनेटमधील काकडीने दाखवला यशाचा मार्ग!
शेडनेटमधील काकडीने दाखवला यशाचा मार्ग!

सोलापूर जिल्ह्यातील धोंडेवाडी (ता. पंढरपूर) येथील धनंजय देठे यांनी डाळिंब, ॲपल बोर, पेरू अशी फळबाग, ऊस पिकातून शाश्वतता साधली आहे. एक एकर शेडनेटमध्ये सातत्यपूर्ण काकडीचे उत्पादन घेत उत्तम फायदा मिळवला आहे. सिंचनाच्या शाश्वततेसाठी ३.५ कोटी लिटरचे शेततळेही त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष ठरत आहे. त्यांच्या शेतीतील यशाला प्रयोगशीलता, नियोजन, सातत्य या त्रिसूत्रीमुळे बळ मिळाले आहे. धोंडेवाडी (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील धनंजय देठे यांनी कला शाखेतून पदव्युत्तर पदवी घेतली आहे. खरेतर त्यांची लष्करामध्ये जाण्याची इच्छा होती. खूप प्रयत्नही केले. मात्र, यश मिळाले नाही. मग वडिलोपार्जित ८ एकर शेतीमध्ये लक्ष घातले. गेल्या सोळा वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून वडिलोपार्जित आठ एकरची शेती आज २५ एकरांवर विस्तारली आहे. मोटारसायकल जाऊन घरासमोर चारचाकी गाडी आली आहे. देठे कुटुंबीयांना या शेतीतून आर्थिक, मानसिक स्थैर्य मिळाले आहे. सध्या धनंजय देठे यांच्याकडे ऊस पिकाच्या जोडीने डाळिंब (चार एकर), ॲपर बोर (दोन एकर), पेरू (तीन एकर) अशी फळबाग, तर दीड एकर कोहळा, एक एकर भुईमूग अशी पिके आहेत. एक एकर क्षेत्रामध्ये काकडी हे पीक घेतात. वाढत्या शेतीला विहिरीचे पाणी पुरेसे ठरत नव्हते, त्यामुळे दीड एकर क्षेत्रावर सुमारे ३.५ कोटी लिटर क्षमतेचे शेततळे केले आहे. त्यासाठी १६ लाख रुपये खर्च आला असला तरी फेब्रुवारी ते पाऊस सुरू होईपर्यंत पाण्याची शाश्वती झाली. उत्तम निरीक्षण आणि शिकण्याची वृत्ती यातून ते बंधू शिवाजी, आई- वडील यांच्या मदतीने आपल्या शेतीत वेगवेगळे प्रयोग करत गेले. प्रत्येक प्रयोगानंतर मिळालेल्या आर्थिक यशाने त्यांचा उत्साह दुणावत गेला. पपई ठरला टर्निंग पॉइंट ः धनंजय २००१ पासून शेती करतात. पहिली आठ-दहा वर्षे ज्वारी, गहू, डाळिंब अशी काही पिके घेतली. मात्र, अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. २०१२ मध्ये त्यांनी अडीच एकरवर पपईची लागवड केली. त्या वेळी उत्पादन ५० टनांपेक्षा अधिक मिळाले आणि पपईला प्रतिकिलो २५-३० रुपये असा चांगला दरही मिळाला. त्यातून सुमारे १५ लाख रुपये फायदा झाला. या भरघोस यशाने त्यांचा आत्मविश्वास वाढला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. अन् काकडीची लागली गोडी ः २०१५ मध्ये कृषी विभागाने शेडनेट शेतीला प्रोत्साहन देण्याची योजना राबवली. त्या वेळी धनंजय यांनीही धाडस करीत एक एकराचे शेडनेट उभारले. त्यासाठी सुमारे १७ लाख रुपये खर्च आला. प्रथम ढोबळी मिरचीची लागवड केली. उत्पादन चांगले आले तरी दर नसल्याने फारसा फायदा राहिला नाही. त्यानंतर ऑक्‍टोबर २०१६ मध्ये त्यांनी काकडी पिकाकडे मोर्चा वळवला. आजपर्यंत त्यांनी सलग चारवेळा काकडी घेतली. प्रत्येक वेळी कमी- अधिक फरकाने चांगला फायदा मिळाला. परिसरात आज त्यांची ओळख काकडी उत्पादक झाली आहे. असे असते काकडीचे नियोजन ः लागवड ः एक एकर शेडनेटमध्ये सहा ट्रॉली शेणखत टाकून रोटाव्हेटरने चांगले मिसळून घेतात. त्यानंतर बेड तयार करून, त्यावर १०ः२६ः२६ मिश्र खत ४ पोती, म्युरेट ऑफ पोटॅश ४ पोती, निंबोळी पेंड २० पोती आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये टाकतात. बेसल डोससाठी सुमारे २० हजार रुपये लागतात. बेडवर ठिबकच्या नळ्या अंथरून प्लॅस्टिक मल्चिंग केले जाते. दोन रोपांत सव्वा फूट आणि दोन ओळींत चार फूट अंतर ठेवून संकरित रोपांची लागवड केली. एकरी सात हजार रोपे लागतात. या बियांसाठी सुमारे ८० हजार रुपये खर्च होतो. पाणी आणि खत व्यवस्थापन ः लागवडीनंतर एक दिवसाने १९ः१९ः१९ आणि ह्युमिक ॲसिडची आळवणी करतात. त्यानंतर ठिबकद्वारे १९ः१९ः१९, ०ः५२ः३४ आणि १२ः६१ः० यासह कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि बोरॉन ही खते वाढीच्या टप्प्यानुसार योग्य प्रमाणात देतात. झाडाच्या वाढीनुसार पाण्याचे प्रमाण वाढवले जाते. कीड, रोग नियंत्रण ः काकडीवर भुरी, केवडा, करपा हे रोग जास्त प्रमाणात येतात. त्यांच्या नियंत्रणासाठी बुरशीनाशकांच्या फवारण्या घेतल्या जातात. अवघ्या ३१ व्या दिवशी काकडी तयार पहिल्या पंधरवड्यानंतरच काकडीच्या वेली वेगाने वाढू लागतात. त्यांना आधारासाठी सुतळीच्या साह्याने बांधून घेतात. पंधरवड्यातच काकडीच्या वेलांवर फुले, कळ्या दिसून, त्यानंतर अवघ्या ३१ व्या दिवशी काकडी उत्पादनास सुरवात होते. एक दिवसाआड काकडीची तोडणी करावी लागते. जीवामृत ः काकडीला दर आठ ते दहा दिवसांनी ड्रीपमधून जीवामृत दिले जाते. परिणामी पिकाची जोमदार वाढ होते. काकडी पिकाचा ताळेबंद

  • ऑक्‍टोबर २०१६ मध्ये पहिल्यांदा काकडी घेतली, त्या वेळी ७० टन उत्पादन मिळाले. त्याला प्रतिकिलो १५ ते ३० रुपये असा दर मिळाला. एकरी सुमारे २.५ लाख रुपये खर्च येतो. खर्च वजा जाता सात लाख रुपये मिळाल्याने उत्साह वाढला.
  • फेब्रुवारी २०१७ मध्ये केलेल्या काकडी लागवडीतून ६० टन उत्पादन मिळाले. सरासरी प्रति किलो २० रुपये दर मिळाला. सहा लाख रुपये निव्वळ उत्पन्न मिळाले.
  • नंतर जून २०१७ मध्ये केलेल्या लागवडीमध्ये पावसामुळे रोगांचे प्रमाण वाढले. उत्पादन केवळ ४० टन निघाले. दरही प्रतिकिलो १० रुपये असा मिळाला.
  • पुन्हा नोव्हेंबरमध्ये काकडी लागवड केली. ती आजपर्यंत सुरू असून, आतापर्यंत ७० टन उत्पादन मिळाले आहे. आतापर्यंत सात लाख रुपये मिळाले आहेत.
  • उत्पादित झालेली काकडी मुंबई, हैदराबादसह गोवा आणि पुणे बाजारपेठेमध्ये पाठवली जाते.
  • सातत्यपूर्ण उत्पादनासाठी... वास्तविक पाहता एकच पीक त्याच क्षेत्रामध्ये घेतल्यास रोग-किडींचा प्रादुर्भाव वाढतो. यावर मात करण्यासाठी पावसाळ्यामध्ये चाळीस दिवसांसाठी तागाचे पीक घेऊन ते गाडले. त्याचप्रमाणे निंबोळी पेंडही अधिक प्रमाणात देतात. त्याचा फायदा होत असल्याचे धनंजय देठे यांनी सांगितले. संपर्क ः धनंजय देठे, ९८६०५५५८९३

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com