पदार्थांची गुणवत्ता टिकवणारा सोलर ड्रायर

सोलर ड्रायर
सोलर ड्रायर

अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अपारंपरिक ऊर्जास्रोत व विद्युत अभियांत्रिकी विभागाने सोलर ड्रायर विकसित केला आहे. याद्वारे प्रक्रिया केलेल्या पदार्थांची चव, स्वाद, रंग पर्यायाने त्याची गुणवत्ता टिकून राहते. हे संशोधन केवळ विद्यापीठापुरते मर्यादित न राहता राज्यातील विविध भागांतील शेतकरी व खासगी उद्योगांपर्यंत त्याचा विस्तार झाला आहे.

अलीकडील काळात प्रक्रिया उद्योगाचे महत्त्व वाढले आहे. अन्नपदार्थांचे निर्जलीकरण हा या उद्योगातील महत्त्वाचा टप्पा आहे. काळाची हीच गरज अोळखून अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अपारंपरिक ऊर्जास्रोत व विद्युत अभियांत्रिकी विभागाने सोलर ड्रायर अर्थात सौरऊर्जेवरील सुकवणी यंत्र तयार केले आहे. विभागप्रमुख व संशोधक अभियंता डॉ. सुरेंद्र काळबांडे यांनी या तंत्रज्ञानाच्या विकासासाठी पुढाकार घेतला आहे.

सौरऊर्जेवरील तंत्रज्ञानाचा फायदा वास्तविक शेतमालाची सुकवणी प्रक्रिया करताना पारंपरिक पद्धतीत जैविक, विद्युत, पेट्रोलियम इंधनाचा वापर करून हवा उष्ण केली जाते. त्याचा पदार्थ सुकवणीसाठी उपयोग होतो. मात्र, पारंपरिक इंधनाच्या किमती, उपलब्धता व प्रदूषण यांच्या तुलनेत सौरऊर्जा हा किफायतशीर पर्याय होऊ शकतो, असे डॉ. सुरेंद्र काळबांडे सांगतात. देशात विविध प्रकारचे सोलर ड्रायर उपलब्ध आहेत; परंतु डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने अर्धगोलाकार आकाराचा ड्रायर विकसित केला आहे. त्याची एकवेळची पदार्थ सुकवण्याची क्षमता १०० किलो एवढी आहे. अर्धगोलाकार पाइपच्या सांगाड्यावर ‘अल्ट्रा व्हायोलेट’ पॉलिथीन फिल्म झाकलेली असते. या ड्रायरमध्ये दिवसा हरितगृह परिणामामुळे आतील तापमानात वाढ होते. स्वच्छ सूर्यप्रकाश असेल तर आतील तापमान हे वातावरणातील तापमानापेक्षा सुमारे १५ ते २० अंश सेल्सिअस अधिक राहते, तर दुपारी १२ ते दोन या वेळेत ते ६० ते ६५ अंश सेल्सिअसपर्यंत पोचते.

सोलर ड्रायरची संरचना

  • एकवेळेस पदार्थ वाळविण्याची क्षमता - १०० किलो
  • ड्रायरचा आकार - सहा मीटर लांब, तीन मीटर रुंद व दोन मीटर उंची. जीआय पाइप २५ मिमी. व्यासाचे अर्धगोलाकार आकारात वाकवत उभारणी
  •  जमिनीलगतचा पृष्ठभाग सिमेंट काँक्रीटचा
  • पृष्ठभागावर काळा रंग लावला असून, तो शंभर टक्‍के उष्णता शोषून घेतो.
  • यूव्ही. पॉलिथीन शीट - जाडी २०० मायक्रॉन
  • दोन चिमण्या
  • वायुविजनासाठी पंखा ४० वाॅट क्षमतेचा
  • यंत्राची किंमत सुमारे ४० ते ५० हजार रुपये
  • सोलर ड्रायरची वैशिष्ट्ये

  • सौर ड्रायरची पूर्व- पश्‍चिम दिशेस बांधणी करावी.
  • स्थानिक पातळीवर उपलब्ध असणाऱ्या साहित्यातून तयार करणे शक्य. गृह व लघु उद्योगाकरिता उपयुक्‍त  
  • इंधन व वीज लागत नाही.   
  • पारंपरिक पदार्थ सुकवणी पद्धतीपेक्षा कमी वेळ लागतो.
  • या ड्रायरच्या वापराने पदार्थांची गुणवत्ता व त्यातील पोषक घटकांचे प्रमाण टिकून राहते.
  • तंत्राचा झाला प्रसार डॉ. काळबांडे म्हणाले, की राज्यभरात विविध दहा ते बारा ठिकाणी आमच्या सोलर ड्रायर तंत्रज्ञानाचा प्रसार झाला आहे. यात शेतकरी गट व खासगी लघुउद्योग यांचा समावेश आहे.  यातील काही ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन ड्रायर्स स्थापित केले आहेत.

    देशमुख यांचा प्रातिनिधिक अनुभव कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोली येथील महेश देशमुख यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या या सोलर टनेल ड्रायरचा वापर केला आहे. त्यांच्याकडे कढीपत्ता आहे. गव्हांकुरचे उत्पादन ते हायड्रोपोनिक्स पद्धतीने घेतात. निर्जलीकरणयुक्त पदार्थांची मागणी लक्षात घेऊन त्याकडे वळल्याचे देशमुख सांगतात.  

    यातील काही मुख्य उदाहरणे तुमसर (जि. भंडारा) - दोन ड्रायर्स - शेतकरी गटासाठी - आवळा कॅंडी व सुपारीसाठी. कोल्हापूर - दोन ड्रायर्स - येथील एक शेतकरी कढीपत्ता, मोड आलेली मटकी, अौषधी वनस्पती आदींसाठी वापर करीत आहे. बोर्डी (जि. अकोला) - एक ड्रायर शिरूर (जि. अहमदनगर) - एक ड्रायर - चहाची पाने सुकवणी औरंगाबाद - तृणांकुर- हर्बल पावडरनिर्मिती मुक्‍ताईनगर (जि. जळगाव) - एक ड्रायर - आवळा कॅंडी व सुपारी नाशिक - हिरवी मिरची, तृणांकुर, कांदा पात.

    या ड्रायरमध्ये वाळवलेल्या पदार्थाची चव, स्वाद आणि रंग टिकून राहतो. ज्या शेतकऱ्यांना सुकवणी प्रक्रियेसाठी ड्रायरची गरज आहे, त्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी विद्यापीठ तयार आहे. - डॉ. सुरेंद्र काळबांडे   (संपर्क : ७५८८७६३७८७)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com